आता हंगामी कामगारांनाही मिळणार आर्थिक सुरक्षा

खुशखबर : केंद्र सरकारने घेतला पुढाकार

0

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क 

विविध क्षेत्रांत हंगामी तत्त्वावर काम करणाऱ्या कामगारांना सामाजिक सुरक्षा देण्याचा केंद्र सरकारचा विचार असून त्यासाठी कायद्यात काहीएक तरतूद करण्याचे सरकारने ठरवले आहे. देशात सरकारी कर्मचारी, सरकारी आस्थापनांतून काम करणारे कर्मचारी आणि खासगी नोकऱ्यांमध्ये असलेले कर्मचारी असे कर्मचाऱ्यांचे तीन गट सध्या अस्तित्वात आहेत. मात्र एका ताज्या अहवालानुसार, देशात चालू वर्षअखेर ‘गिग’ कामगारांची संख्या सुमारे 35 कोटी होणार आहे. इतक्या मोठ्या संख्येने असलेल्या या कर्मचाऱ्यांसाठी सामाजिक सुरक्षा प्रदान करणे महत्त्वाचे आहे.

यासाठी केंद्र सरकार ‘गिग’ कामगारांची आवश्यकता व वापर सध्या होत असलेल्या क्षेत्रांतील कंपन्यांना ‘गिग’ कर्मचाऱ्यांसाठी त्यांना देण्यात येणाऱ्या मोबदल्यातून काही रक्कम सामाजिक सुरक्षितता निधी म्हणून कापून घेऊन ती कर्मचारी भविष्यनिर्वाह निधीमध्ये (ईपीएस) जमा करण्यास सांगण्याची शक्यता आहे. ‘गिग’ कर्मचाऱ्यांना मिळणारा मोबदला गृहित धरता त्यांची कर्मचारी भविष्यनिर्वाह निधीमध्ये साठणारी रक्कम पुरेशी नसेल, हे गृहित धरून सरकार यामध्ये 3 ते 4 टक्के रकमेची भरही घालण्याच्या विचारात आहे. ‘गिग’ कर्मचारी वेगवेगळ्या क्षेत्रांत आणि वेगवेगळ्या स्तरांवर कार्यरत आहेत. या कामगारांच्या मोबदल्यातून काही रक्कम बाजूला ठेवून ती ईपीएससाठी जमा करणे त्यांच्या रोजगारदात्यांना सहज शक्य आहे. या सर्वांचा तपशील घेऊन त्यानुसार योजना आखून ती लवकरच सक्रिय करण्यात येईल, असे कामगार मंत्रालयातील एका अधिकाऱ्याने सांगितले आहे. याखेरीज कामाच्या शोधात एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाणाऱ्या ‘गिग’ कर्मचाऱ्यांना सामायिक लेबर कोड देण्याचाही सरकारचा विचार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.