लोकशाही न्यूज नेटवर्क
पाचोरा येथे आयोजित शिवसेना निर्धार मेळाव्यात शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या भाजपवर जोरदार टीका केल्याने खळबळ उडाली. यावेळी किशोर पाटील यांनी विकासकामांसाठी निधी मिळत नसल्याची तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच बंडखोरी करणाऱ्यांना पक्षात घेऊन त्यांना प्रोत्साहन दिल्याच्या मुद्द्यावरुन त्यांनी थेट जाहीर सभेत भाजपचे वाभाडे काढले. यामुळे महायुतीतील वाद पुन्हा एकदा उफाळून आल्याचे स्पष्ट झाले आहे.
आमदार किशोर पाटील यांनी विकास निधीच्या वाटपावरून महायुती सरकारला घरचा आहेर दिला. महायुतीच्या एक वर्षाच्या काळात एक फुटकी कवडीसुद्धा आमदारांना मिळालेली नाही. वर्षभरात निधी न मिळाल्याने आम्हाला फक्त पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचाच आधार आहे. अतिवृष्टीमुळे माझ्या मतदारसंघातील विकासाची भर वर्षभरात काढू शकत नाही. त्यामुळे पालकमंत्र्यांनी जिल्हा नियोजनच्या ५ टक्के निधीमधून किमान ५० टक्के निधी हा आपल्या मतदारसंघाला द्यावा, अशी मागणी किशोर पाटील यांनी केली. गेल्या वर्षभरापासून असंही आम्हाला एक रुपया भेटलेला नाही, पुढे काय भेटेल ते माहिती नाही,” असे म्हणत त्यांनी निधीबाबत राज्य सरकारवर तीव्र नाराजी व्यक्त केली.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ‘बंडखोरी करणाऱ्यांवर पाच वर्षे हकालपट्टी होईल असे चंद्रपूरच्या सभेत म्हटले होते. मात्र, माझ्या मतदारसंघात विधानसभा निवडणुकीवेळी ज्यांनी बंडखोरी केली, त्यांच्यावर कारवाई न करता, उलट त्यांना पदाच्या रूपाने शाबासकी दिली जात आहे. ज्यांनी बंडखोरी केली, त्यांना मी फोन करायचो, पण ते फोन उचलत नव्हते, असे किशोर पाटील यांनी सांगितले. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून सरकारला खडसावले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेली एक रुपयात पिक विमा योजना यावर्षी बंद झाल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. “हा पिक विमा चालू राहिला असता, तर शेतकऱ्याला शासनाकडे हात पसरवण्याची गरज आली नसती. तुम्ही तो बंद केला आणि आज शेतकरी हवालदील झाला,” असे ते म्हणाले.
शेतकरी आंदोलनावरून त्यांनी बच्चू कडू यांचे आभार मानले. आता ३० जूनची तारीख देऊ नका. शेतकरी आज त्रस्त झाला आहे, त्यामुळे तात्काळ कर्जमाफी करा, असेही किशोर पाटील यांनी म्हटले. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामाचे भरभरून कौतुक केले. आजपर्यंतच्या इतिहासातला पहिला मुख्यमंत्री मी पाहिला, ते म्हणजे एकनाथ शिंदे. त्यांनी अडीच वर्षांच्या मुख्यमंत्री काळात एका दिवसाच्या नायक चित्रपटातील मुख्यमंत्र्यासारखं काम केलं. लाडक्या भगिनींना’ सुरू केलेले १५०० रुपयांचे मानधन ग्रामीण भागातील बहिणींसाठी खूप मोलाचे आहे. शिंदे यांनी १५०० रुपयांचे मानधन २१०० रुपये करणार असल्याचे सांगितले होते, पण ते पुन्हा मुख्यमंत्री झाले नाही हे दुर्दैव आहे, असेही ते म्हणाले.