मनपात लिफ्ट कोसळल्यामुळे जळगावात खळबळ

दोघे थोडक्यात बचावले : भोंगळ कारभार पुन्हा चव्हाट्यावर 

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

जळगाव शहर महानगरपालिकेत खळबळजनक घटना घडली आहे.  महापालिकेच्या इमारतीतील 10 व्या मजल्यावरून लिफ्ट कोसळल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले. सुदैवाने ही लिफ्ट 10 व्या मजल्यावरून 9 व्या मजल्यावर कोसळल्याने दोघे थोडक्यात बचावले. मात्र लिफ्ट कोसळल्याने महापालिकेची इमारतही हादरली असून दरम्यान या लिफ्टमध्ये अडकलेल्या दोन जणांना लिफ्टचा दरवाजा तोडून बाहेर काढण्यात आले.

महापालिकेच्या सतरा मजली इमारतीतील लिफ्टचा अधिकाऱ्यांसाठी प्रवास आरामदायी असला तरी सर्वसामान्यांच्या जीवावर बेतणारा ठरत आहे. मनपात ६ लिफ्ट असून त्यापैकी ३ बंद आहे. या ठिकणी लिफ्टमन आहे मात्र तो फक्त व्हीआयपी लिफ्टसाठी असल्याने मनपाचा भोंगळ कारभार पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.

मेहरूण परिसरातील जावेद शेख हे मित्र जलील अहमद यांच्यासोबत मनपा कर्मचारी असलेल्या पत्नीच्या दाखल्यासाठी मनपातील दहाव्या मजल्यावर आले होते. काम आटोपून घरी जाण्यासाठी ते सर्वसामान्यांसाठी असलेल्या लिफ्टमध्ये शिरले; परंतु काही सेकंदातच त्यांना हादरा बसला. यावेळी झालेल्या आवाजाने नेमके काय झाले याचा अंदाज आला नाही; परंतु आवाज एवढा मोठा होता की खालच्या व वरच्या मजल्यांवरील कर्मचाऱ्यांची धावपळ सुरू झाली.

नवव्या मजल्यावर लिफ्ट अडकल्याचे समोर आल्यानंतर सुरक्षा रक्षकांना पाचारण केले. मेंटेनन्स कर्मचारी योगेश बागुल सहकाऱ्यांसह तातडीने दाखल झाले; परंतु १८ मिनिटे प्रयत्न करूनही लिफ्ट उघडत नसल्याने दरवाजा तोडून दोघांना बाहेर काढावे लागले. सुदैवाने अपघातात लिफ्टमध्ये अडकलेले दोन जण थोडक्यात बचावले आहे. लिफ्ट अर्ध्यात अडकल्याने तसेच लोड नसल्याने मोठी हानी टळली.

Leave A Reply

Your email address will not be published.