जळगाव जिल्ह्यात नगरपरिषद मतदानाला प्रतिसाद; दुपारपर्यंत १६% मतदान
यावल, फैजपूर व रावेर आघाडीवर; अनेक ठिकाणी महिलांची लक्षणीय उपस्थिती, शांततेत मतदान प्रक्रिया सुरू
जळगाव प्रतिनिधी – जळगाव जिल्ह्यातील नगरपरिषद व नगरपंचायतींच्या निवडणुकीत २ डिसेंबर रोजी सकाळपासून मतदानाने जोर पकडला असून, विविध शहरांमध्ये वेगवेगळ्या प्रमाणात मतदानाची नोंद होत आहे. जिल्ह्याच्या निवडणूक विभागाने दिलेल्या अद्ययावत आकडेवारीनुसार पुरुष, महिला आणि इतर मतदार मिळून ८८ लाखांहून अधिक मतदारांपैकी सुमारे १६ टक्के मतदारांनी दुपारपर्यंत मतदानाचा हक्क बजावला आहे.
जळगाव जिल्ह्यातील १६ नगरपरिषद आणि दोन नगरपंचायतींसाठी एकूण ८८१५१० मतदार नोंदणीकृत असून, त्यापैकी पुरुष ४४६५३८, महिला ४३४८८९ आणि इतर ८३ मतदारांचा समावेश आहे.
कोठे किती मतदान? – शहरनिहाय टक्केवारी
दुपारपर्यंत मिळालेल्या आकडेवारीत काही ठिकाणी अपेक्षेपेक्षा चांगला मतदान प्रतिसाद दिसून आला, तर काही शहरांत मतदान मंद गतीने सुरू आहे.
यावल येथे सर्वाधिक २५.४५% मतदान नोंदले गेले असून महिलांची उपस्थिती विशेष लक्षणीय ठरली आहे.
रावेरमध्येही दणदणीत प्रतिसाद देत २०.०२% मतदान झाले.
शेंदुर्णी येथे ६.४९%, तर मुक्ताईनगरमध्ये ५.२०% मतदान झाल्याची नोंद.
फैजपूरने ३४.२०% मतदानासह चांगला प्रतिसाद मिळवला आहे.
जामनेर, भुसावळ, पाचोरा, अमळनेर येथे मध्यम गती
जामनेरमध्ये सकाळपासून मतदानासाठी नागरिकांनी ओढा धरला असला तरी दुपारपर्यंत केवळ १५.५८% मतदान झाले.
भुसावळमध्ये १६.३७%, पाचोरामध्ये ११.६८% आणि अमळनेरमध्ये १५.७४% मतदान झाल्याचे सांगण्यात येत आहे.
चोपडा, सावदा, भडगाव मतदानात वाढ
चोपडामध्ये १४.०९%, सावद्यात १३.०१% आणि भडगावमध्ये १२% मतदान झाले असून दुपारी ३ नंतर गती वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
एरंडोल, धरणगाव, नशिराबाद – दुपारपर्यंतची नोंद
एरंडोलमध्ये २१.८२%, धरणगावमध्ये ६.९७%, तर नशिराबादमध्ये १५.०५% मतदान झाल्याचे अधिकृतरीत्या सांगण्यात आले आहे.
जिल्ह्यात आजचा मतदानाचा वेग समाधानकारक
जिल्ह्यात सकाळी सुरुवातीला मंद गती असलेल्या मतदानात दुपारपर्यंत वाढ होताना दिसून आली. विविध शहरांमध्ये पोलिस बंदोबस्त कडक ठेवण्यात आला असून, मतदान प्रक्रिया शांततेत व सुरळीत सुरू असल्याची माहिती निवडणूक विभागाकडून देण्यात आली.
दुपारनंतर मतदानाचा वेग वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली जात असून, जिल्ह्यात समाधानकारक मतदान होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.