जिल्ह्यात १६ नगरपरिषदा व २ नगरपंचायतींसाठी आज मतदान;मतदानासाठी मतदारांमध्ये उत्साह
जळगाव प्रतिनिधी जिल्ह्यातील १६ नगरपरिषदा आणि २ नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आज, सोमवार दि. २ रोजी मतदानाला सुरूवात झाली असून सकाळपासूनच मतदारांनी मतदान केंद्रांकडे मोठ्या संख्येने होणारी गर्दी मतदानाबाबतचा उत्साह दाखवणारी ठरत आहे. सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदानाची वेळ असून, गेल्या महिनाभर तापलेल्या प्रचाराचा ताप आता मतदान केंद्रांवर झालेल्या रांगा कमी-जास्त व्हाव्यात इतपत ओसरला आहे.
गेल्या काही आठवड्यांपासून घराघर प्रचार, पदयात्रा, लहानमोठ्या सभा, रॅल्या तसेच सोशल मीडियावरील प्रचार अशा विविध मार्गांनी सर्व प्रमुख पक्षांसह अपक्ष उमेदवारांनी मतदानापूर्वीची शेवटची जोरकस धडपड केली. आयोगाने १ डिसेंबर रात्री १० वाजेपर्यंत प्रचाराला मुदत दिल्याने अखेरच्या क्षणापर्यंत राजकीय वातावरण तापलेले दिसले.
या निवडणुकीत जिल्ह्यातील ४६४ सदस्यांसाठी मतदान होत असून, यापूर्वीच्या ९७७ मतदान केंद्रांऐवजी जामनेर नगरपरिषदेतील तीन प्रभाग बिनविरोध झाल्यामुळे आता ९६७ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया सुरू आहे. या निवडणुकीत नगरसेवकपदासाठी १४८८ आणि नगराध्यक्षपदासाठी ७६ उमेदवार रिंगणात असून, महिला मतदार आणि महिला उमेदवारांची उपस्थिती यंदा लक्षणीय आहे. अनेक प्रभागांमध्ये महिलांची संख्या पुरुषांपेक्षा अधिक असल्याने त्यांच्या मतांचा कल निर्णायक ठरणार आहे. अनेक सर्वसाधारण जागांवर महिला उमेदवार मैदानात असल्याने प्रचारातही महिला मोठ्या प्रमाणात केंद्रस्थानी राहिल्या.
दरम्यान, या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत केवळ उमेदवारांचे नव्हे तर जिल्ह्यातील मंत्री, माजी मंत्री, आमदार, खासदार यांच्याही प्रतिष्ठेची शाब्दिक लढाई रंगली आहे.
१२ जागांच्या निवडणुका पुढे ढकलल्या
निवडणूक प्रक्रियेदरम्यान राज्य निवडणूक आयोगाच्या ताज्या निर्देशांनुसार जिल्ह्यातील सहा नगरपरिषदांमधील १२ जागांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या प्रभागांमध्ये नव्याने ४ डिसेंबरपासून निवडणूक प्रक्रिया सुरू होणार असून, २० डिसेंबर रोजी मतदान आणि २१ डिसेंबर रोजी मतमोजणी होईल. अमळनेर नगरपरिषद प्रभाग १ ‘अ’, सावदा नगरपरिषद प्रभाग २ ‘ब’, ४ ‘ब’ व १० ‘ब’, यावल नगरपरिषद प्रभाग ८ ‘ब’, वरणगाव नगरपरिषद प्रभाग १० ‘अ’ व १० ‘क’, पाचोरा नगरपरिषद प्रभाग ११ ‘अ’ आणि १२ ‘ब’, तर भुसावळ नगरपरिषद प्रभाग ४ ‘ब’, ५ ‘ब’ आणि ११ ‘ब’ येथील प्रक्रिया तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे.
मतदान सुरळीत पार पडावे यासाठी प्रशासनाकडून आवश्यक तजवीज करण्यात आली असून, सर्व मतदान पथके नियोजित केंद्रावर दाखल झाली आहेत.