मोठी बातमी : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजला !
पहिल्या टप्प्यात राज्यातील 246 नगरपालिका, 42 नगरपंचायतीची निवडणूक
2 डिसेंबरला मतदान ,3 डिसेंबरला मतमोजणी ; आचारसंहिता लागू
मुंबई प्रतिनिधी I बहुप्रतीक्षित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा करण्यात आली असून पहिल्या टप्प्यात राज्यातील 246 नगरपालिका, 42 नगरपंचायतीची निवडणूक पार पडणार २ डिसेंबरला मतदान ,३ डिसेंबरला मतमोजणी आहे . तसेच ४ नोव्हेंबरपासून आचारसंहिता लागू करण्यात आली असल्याची माहिती राज्याचे निवडणूक आयोगाचे दिनेश वाघमारे यांनी आज मुंबई येथील पत्रकार परिषदेत दिली .
राज्यातील 29 महापालिका, 32 जिल्हा परिषदा, 42 नगर पंचायती, 336 पंचायत समिती, 246 नगरपालिकांची मुदत संपली असून त्यासाठी निवडणुका घेण्यात येणार आहे. त्याच्या पहिल्या टप्प्यात नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुका घेण्यात येणार आहेत.
राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी 31 ऑक्टोबरला प्रसिद्ध झाली आहे. त्यानुसार मतदान होणार आहे. त्यामध्ये एकूण 1 कोटी 7 लाख 3 हजार 576 मतदार असतील. त्यासाठी राज्यात एकूण 13 हजार कन्ट्रोल युनिट स्थापन करण्यात आले आहेत.
विभागनिहाय नगरपरिषद-नगरपंचायती निवडणूक कोकण – 17 नाशिक -49 ,पुणे -60 , संभाजीनगर -52 , अमरावती -45 , नागपूर -55
यंदा नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांसाठी खर्च मर्यादा वाढवण्यात आली आहे. त्यानुसार अ वर्ग नगरपालिकांच्या अध्यक्षपदासाठी 15 लाखांची मर्यादा तर क वर्ग नगरपालिकांसाठी 7 लाखांची खर्च मर्यादा ठरवण्यात आली आहे.
मतदारांच्या सोयीसाठी नवीन अॅपची निर्मिती करण्यात आली आहे. दुबार मतदानासंदर्भात योग्य खबरदारी घेतली आहे. संभाव्य दुबार मतदारांच्या पुढे डबल स्टारचे चिन्ह दाखवण्यात आले आहे. ज्या मतदारांच्या पुढे डबल स्टार असेल त्याच्याकडून दुसरीकडे मतदान करणार नाही असे डिक्लरेशन घेतलं जाईल.
एकूण नगरपरिषदा: २४६ (यात १० नवनिर्मित आणि २३६ मुदत संपलेल्या नगरपरिषदांचा समावेश)
एकूण नगरपंचायती: ४२ (यात १५ नवनिर्मित आणि २७ मुदत संपलेल्या नगरपंचायतींचा समावेश)
निवड होणार: ६८५९ सदस्य आणि २८८ अध्यक्ष
मतदार संख्या: १ कोटी ७ लाख
मतदान केंद्रे: १३,३५५
उमेदवारी अर्ज आणि आवश्यक कागदपत्रे –
अर्ज पद्धत: उमेदवारी अर्ज पूर्णतः ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जातील. यासाठी आयोगाने पोर्टल तयार केले आहे.
प्रक्रिया: संकेतस्थळावर अर्ज भरल्यानंतर त्याची प्रिंटआऊट संबंधित निवडणूक अधिकाऱ्याकडे जमा करणे बंधनकारक असेल.
जागा: एका प्रभागात एका उमेदवाराला अधिकाधिक ४ उमेदवारी अर्ज भरता येतील.
जात वैधता: प्रत्येक उमेदवारासाठी जात वैधता प्रमाणपत्र (Cast Validity Certificate) सादर करणे बंधनकारक आहे. ज्यांनी प्रमाणपत्रासाठी अर्ज केला आहे, त्यांना त्याची पावती सादर करून अर्ज भरता येईल.
मतदारांसाठी विशेष सुविधा व नियम
ईव्हीएमचा वापर: ही निवडणूक ईव्हीएमवरच होणार आहे.
मतदार याद्या: मतदारनिहाय याद्या ७ नोव्हेंबरला प्रसिद्ध केल्या जातील. मतदार यादी तपासण्यासाठी आयोगाच्या संकेतस्थळावर आणि मोबाईल ॲपवर ‘सर्च फॅसिलिटी’ उपलब्ध असेल.
दुबार मतदारांवर नजर: ज्या मतदान केंद्रामध्ये दुबार मतदार ओळखण्यासाठी विशेष स्टार व्यवस्था असेल. एकदा मतदान केल्यास स्टार दिसेल, अधिक स्टार दिसल्यास दुसऱ्या मतदान केंद्रावर मत देता येणार नाही.
विशेष व्यवस्था: मतदान केंद्रावर दिव्यांग, गरोदर, तान्ह्या बाळांना घेऊन येणाऱ्या महिला आणि ज्येष्ठांसाठी तसेच वीज, पाणी, सावली आणि शौचलयाची पुरेशी व्यवस्था केली जाणार आहे.
गुलाबी मतदान केंद्रे: काही मतदान केंद्रे गुलाबी असतील, जिथे सर्व स्टाफ महिलाच असेल.
मोबाईल बंदी: इमारतींमध्ये मोबाईल नेता येईल, पण मतदानाच्या ठिकाणी मोबाईल नेता येणार नाही.
नगरपरिषद: निवडणूक बहुसदस्यीय पद्धतीनुसार होईल. एका प्रभागात साधारणपणे २ जागा (विषम संख्या असल्यास ३ जागा) असतील. मतदारांना २-३ सदस्यांसाठी मतदान करावे लागेल.
नगरपंचायत: १ सदस्य व १ अध्यक्ष असतो, त्यामुळे मतदारांना दोन मते द्यावी लागतील.
या घोषणेमुळे आता राज्यात आचारसंहिता लागू झाली असून, पुढील महिन्यात होणाऱ्या या निवडणुकांमुळे राजकीय हालचालींना वेग येणार आहे.