सरकार आल्यावर सर्व योजनांची चौकशी होणार !

मुक्ताईनगर मतदारसंघात गुन्हेगारी वाढली : ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसेंचे टीकास्त्र

0

जळगाव (राजेश यावलकर), लोकशाही विशेष

गेल्या अडीच वर्षांपासून महायुती सरकारने वेगवेगळ्या योजना आणल्या असल्या तरी त्या योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहचल्या नसून सत्ताधाऱ्यांनी त्यातून मलिदा लाटला आहे. केंद्र सरकारची जलजीवन मिशन योजना राबवितांना नियम पायदळी तुडविण्यात आले असून महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर या सर्व योजनांची चौकशी करण्यात येईल. मुक्ताईनगर मतदारसंघात गेल्या पाच वर्षात मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी वाढली असून त्याला विद्यमान आमदार खतपाणी घालत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (शप) पक्षाचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथराव खडसे यांनी ‘दै. लोकशाही’शी बोलतांना केला.

विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असून दै. लोकशाहीने श्री. खडसे यांच्याशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. श्री. खडसे म्हणाले की, गेल्या अडीच वर्षात महायुती सरकारने केवळ घोषणांचा पाऊस पाडला आहे, करोडो रुपयांच्या निधीची घोषणा केली मात्र प्रत्यक्षात एकही योजना कार्यान्वित झालेली नाही. केवळ पैसा गोळा करणे हाच धंदा महायुतीने केला असून त्या पैशांच्या भरवश्यावर ते आज मतांचे दान मागत आहेत, मात्र मतदार सुज्ञ असून तो महायुतीला धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही. केंद्र सरकारची जलजीवन मिशन ही योजना प्रत्येक घरापर्यंत पाणी पोहचविण्यासाठी आहे, मात्र या योजनेचे श्रेय आमदार घेत असले तरी त्यांनी तालुक्यात कुठे योजना कार्यान्वित झाली हे दाखवून द्यावे, माझे खुले आव्हान आहे की, त्यांनी एकाही गावात योजना पूर्ण झाल्याचे सिद्ध करुनच दाखवावे. बऱ्याच गावांमध्ये पाईप लाईन आहे, तर टाकी नाही; कुठे टाकी आहे तर पाईप लाईन नाही. दुरुस्त झालेले रस्ते या योजनेमुळे पूर्णत: खराब झाले त्या रस्त्यांची अद्यापही पुनर्दुरुस्ती झालेली नाही. मुक्ताईनगर मतदारसंघात गेल्या पाच वर्षात एकही योजना आली नाही उलटपक्षी होत्या त्या योजना बंद करण्याचे पाप आमदारांनी केले आहे.

 

आधी केले मग सांगितले….

राजकाणात मी आजपर्यंत एकही निवडणूक हरलो नाही. विकास हाच केंद्रबिंदू… सर्वसामान्यांचे हित हेच ध्येय माणून काम केले. माझ्या तीस वर्षांच्या कालखंडात तालुक्याचाच नव्हे तर जिल्ह्यात देखील वेगवेगळ्या योजना राबविण्यात आल्या आहेत. बेरोजगारीवर मात करण्यासाठी शेतीला पुरक व्यवसाय निर्माण करण्यावर आपण भर दिला. बोदवड उपसा सिंचन, वाघुर, गिरणा यासह अनेक योजनांगती देण्यात आली, त्यातून शेकडो एकर जमिन ओलीताखाली आली आहे. तालुक्यात शासकीय आयटीआयची निर्मिती करुन उच्च शिक्षणाची सुविधा उपलब्ध करुन दिली. विद्यमान आमदारांनी काय ‘दिवे’ लावले ते सांगावे असे खुले आव्हान श्री. खडसे यांनी दिले.

 

गुन्हेगारीचा कळस वाढला….

मुक्ताईनगर मतदारसंघात गेल्या पाच वर्षांपासून गुन्हेगारी प्रचंड प्रमाणात वाढली आहे. अपक्ष उमेदवारावर गोळीबार होणे हे दुर्दैवी आहे. पोलिस या प्रकरणाचा कसून तपास करीत असून लवकरच ‘दूध का दूध… पाणी का पाणी…’ होणार आहे. तालुक्यात गल्लोगल्ली सट्टा, पत्ता, मटका, दारु यांचे दुकाने थाटण्यात आले असून आमदारांचे या धंद्यांना पाळबळ असल्याची चर्चा देखील आहे. गुन्हेगारीला पाठबळ देणाऱ्या आमदारांना आता ‘विकासा’चे स्वप्न पडले असल्याचा टोलाही श्री. खडसे यांनी हाणला.

 

महिलांबद्दल ‘त्यांच्या’ मनात घृणाच…

‘लाडकी बहिण’ योजना राबवून महिलांना लाचार केले जात आहे. महिलांना सक्षम, स्वावलंबी करण्यासाठी, त्यांना स्वत:च्या पायावर उभे करण्यासाठी रोजगार उपलब्ध करुन देणे क्रमप्राप्त आहे, मात्र महायुती महिलांना लाचार करीत आहे. मुक्ताई नगर मतदारसंघाचे विद्यमान आमदार व त्यांच्या बगलबच्च्यांच्या मनात महिलांबद्दल घृणा असल्याचे वारंवार घडणाऱ्या घटनांमधून सिद्ध झाले आहे. आमदारांचे काही पंटर महिलांना फोनवरुन अपशब्द वापरत असल्याचा पुरावा आपल्याकडे असल्याचेही श्री. खडसे यांनी सांगितले.

 

विकासासाठी रोहिणीताईंची  उमेदवारी

गेल्या पाच वर्षांत मतदारसंघातील विकासाला ‘ग्रहण’ लागले असून सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. बेरोजगारी, सिंचन यांचे प्रश्न गंभीर झालेले आहेत. मुख्यमंत्र्यांनी केळी महामंडळाची घोषणा केली मात्र त्याचे काय झाले? घोषणांचा पाऊस पाडणारे मुख्यमंत्री व आमदार यांच्यामुळे दुष्काळाची छाया पसरली असून मतदारसंघाच्या सर्वांगिण विकासासाठी महाविकास आघाडीकडून ॲड. रोहिणी खडसे-खेवलकर यांची उमेदवारी आहे. महिला सक्षमीकरणासाठी महिला उमेदवाराला संधी देण्याची ‘सुवर्णसंधी’ मतदारांना प्राप्त झाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.