लोकशाही संपादकीय लेख

मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच राहणार, शरद पवारांसोबतच राहणार, असे वक्तव्य करून एकनाथराव खडसे यांनी भाजप प्रवेशाबाबत एकदाचा पूर्णविराम दिला आहे. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी खडसे यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली, त्यांचे स्वागत केले आणि त्यांच्याशी चर्चा केली. यावरून एकनाथराव खडसे यांची घरवापसी निश्चित असल्याच्या चर्चेला उधाण आले होते. परंतु, विनोद तावडे यांची ती सदिच्छा भेट होती. त्यांनी माझ्या तब्येतीची विचारपूस केली, असे एकनाथराव खडसे यांनी पत्रकारांना सांगितले.
ही चर्चा एवढ्यावरच न थांबता घरवापसी, म्हणजे भाजप प्रवेशाच्या सूरसकथा सुरूच राहिल्या. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत, ज्यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्लीत बोलावून भाजप प्रवेशाची ऑफर दिली होती, तसे ठरलेदेखील होते. परंतु, स्थानिक नेत्यांनी गृहमंत्री अमित शाह यांना ब्लॅकमेल केले. “जर त्यांनी भाजप प्रवेश केला, तर आम्ही स्थानिक नेते भाजपचा प्रचार करणार नाही.” त्यावेळी अमित शाह म्हणाले, “स्थानिक नेते असे म्हणत असतील, तर तूर्त तुम्ही लोकसभा निवडणुकीत भाजपचा प्रचार करा. नंतर पाहू.”
लोकसभा निवडणुकीनंतर स्थानिक नेत्यांचा वेगळाच सूर आला. “वरिष्ठांनी नाथाभाऊंना प्रवेश देण्याचे आम्हाला काही माहीतच नाही.” या वादात मी पुन्हा भाजप प्रवेश करण्याचे टाळले. आता मला भाजप प्रवेश करायचा नाही, असे मी यावेळी म्हणालो होतो. पुढे विधानसभेच्या निवडणुका आल्या. त्यावेळी मुक्ताईनगर मतदारसंघातून माझी कन्या रोहिणी खडसे यांना राष्ट्रवादीची उमेदवारी जाहीर झाली. त्यात तिचा पराभव झाला, हा भाग वेगळा. पण अशा रीतीने ४० वर्षे ज्यांनी भाजपसाठी, भाजपच्या विचारांसाठी रक्ताचे पाणी केले, त्यांच्या बाबतीत स्थानिक नेते असा विचार करत असतील, तर भाजप प्रवेश करून काय कामाचे?
आता गिरीश महाजन म्हणतात की त्यांची दिल्लीला हॉटलाइन आहे. त्यांचे कोणत्याही वेळी भाजपमध्ये प्रवेश होऊ शकतो. आम्ही त्यांच्यापुढे लहान माणसे आहोत, आम्ही काय बोलणार? यावर खडसे यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की, हे वक्तव्य कोणत्या उद्देशाने केले, हे तपासून पाहायला पाहिजे. परंतु, गिरीश महाजन हे माझ्यापेक्षा पक्षात लहानच आहेत.
१९९० साली ते सरपंच असताना जामनेर मतदारसंघ बहुल मराठा समाजाचा असून ती जागा शिवसेनेची होती. शिवसेनेची असलेली जामनेरची जागा गिरीश महाजनांसाठी भाजपची करून घेण्यात माझा मोठा वाटा होता. भुसावळची भाजपची जागा शिवसेनेला देऊन जामनेरची जागा भाजपकडे घेण्याचे कार्य मी केले. त्यावेळी महाजन म्हणाले की, “हे जे तू करतो आहेस, ते काही ठीक नाही.” परंतु, जामनेरची जागा भाजपला मिळाल्यामुळे गिरीश महाजन यांची वाट सुकर झाली आणि ते निवडून आले, हे मात्र ते सोयीस्करपणे विसरत आहेत, असा टोला एकनाथराव खडसे यांनी लगावला.
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी एकनाथराव खडसे यांच्या घरवापसी संदर्भात जी प्रतिक्रिया दिली, ती का दिली हेच कळत नाही. तेरा खात्यांचे मंत्री असताना त्यांनी पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात प्रवेश केला. आणि पिक्चरमध्ये आता नट हवा तसा दिसत नाही म्हणून शेरोशायरी केली. त्यावर एकनाथराव खडसे म्हणाले की, “अकाली वृद्धत्व आल्यासारखे काही माणसे वागतात. त्याला काय म्हणावे?” तिकडे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे माजी मंत्री अनिल भाईदास पाटील यांनीसुद्धा नको ते बोलले. त्याबद्दल एकनाथराव खडसे यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
अशा प्रकारे एकनाथराव खडसे यांच्या घरवापसीबद्दल, म्हणजेच भाजप प्रवेशाबद्दल उलटसुलट प्रतिक्रिया येत आहेत. अशातच त्यांनी मुख्यमंत्री बदलासंदर्भात जे वक्तव्य केले, ते धक्कादायक आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रात गेल्यावर चंद्रशेखर बावनकुळे किंवा एकनाथ शिंदे यापैकी कोणीही मुख्यमंत्री होणार नाही. कारण देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे मित्र गिरीश महाजन यांच्या नावाची शिफारस करतील आणि गिरीश महाजन हे मुख्यमंत्री होतील, असे वक्तव्य करून एकनाथराव खडसे यांनी जोरदार धक्का दिला आहे.
एकंदरीत, एकनाथराव खडसे यांच्या भाजप प्रवेशावरून एवढे रणकंदन माजले. आता ते म्हणतात, “मी राष्ट्रवादीतच राहणार, शरद पवारांसोबतच राहणार. मी भाजप प्रवेश करणार नाही. परंतु, माझ्या अनेक कार्यकर्त्यांची इच्छा आहे की आपण भाजपमध्ये प्रवेश केला पाहिजे. त्या कार्यकर्त्यांसाठी मी मैदान खुले सोडले आहे. कारण त्यांचे पुनर्वसन करणे महत्त्वाचे आहे.”
सध्या माझे अमृत महोत्सवी वर्ष आहे. तो अमृत महोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करायचा, अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. त्यामुळे माझ्या अमृत महोत्सवी वाढदिवसाबाबत निमंत्रण देण्यासाठी मी अनेक नेत्यांच्या भेटी घेत आहे. त्यापैकीच एक भेट म्हणजे उद्धव ठाकरे यांची ‘मातोश्री’वर जाऊन घेतलेली भेट. त्यांना अमृत महोत्सवी वाढदिवसाचे निमंत्रण दिले. तेव्हा ते म्हणाले की, “निश्चितच मी अमृत महोत्सवी वाढदिवसाला येईन.” तरीही काही नेते त्याचे भांडवल करतात की, “होय, मी शिवसेना तोडली,” असा शब्दप्रयोग करण्यात येतो. हे दुर्दैव आहे, असे खडसे म्हणाले. त्यामुळे तूर्तास तरी एकनाथराव खडसे यांच्या घरवापसीचा, म्हणजेच भाजप प्रवेशाचा प्रश्न मागे पडला आहे. आता अमृत महोत्सवी जन्मदिवस कशा पद्धतीने मोठ्या प्रमाणावर साजरा करता येईल, यासाठीच प्रयत्न करायचे आहेत, असेही खडसे म्हणाले.
राजकारण फार विचित्र असते. आजचे शत्रू उद्याचे मित्र होऊ शकतात. अशा प्रकारे एकनाथराव खडसे यांचे राजकारण सुरू आहे. मात्र, त्यांच्या भाजप वाढीतील योगदानाचे कौतुक करावे लागेल. गेली ४० वर्षे त्यांनी रक्ताचे पाणी करून भाजप संघटना वाढवण्यासाठी प्रयत्न केले आहेत. खुद्द भाजपमधील ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणतात की, “एकनाथराव खडसे यांनी गेल्या ४० वर्षांत भाजपसाठी जे केले, ते मोलाचे आहे. त्यांचे ऋण फेडलेच पाहिजे.” त्यामुळे खडसे यांचे भाजप वाढीतील योगदान विसरता येणार नाही. सध्या महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर एकनाथराव खडसे यांचे नाव पुन्हा एकदा चर्चेत असून, सोशल मीडियावरही सर्वत्र ‘नाथाभाऊ’च दिसत आहेत.


