मुक्ताईनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क:
गुटख्याच्या तस्करीतून मुक्ताईनगर पोलिसांना पंधरा लाख रुपयांची खंडणी मिळत असल्याचा खळबळजनक आरोप माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी मुक्ताईनगर येथील पत्रकार परिषदेत केला आहे.
मुक्ताईनगर येथे अधिकारी यायला नाखूष असून त्यामुळे गेल्या तीन महिन्यापासून पोलीस निरीक्षकाची जागा रिक्त आहे. कायम अधिकारी नसल्याने तालुक्यात चक्री, मटका, जुगार, गुटखा विक्री, गावठी दारू यासारखे अवैध धंदे खुलेआम सुरू आहेत. काल मुक्ताईनगर शहरात गुटखा असलेली गाडी पकडल्यानंतर त्यातील आरोपींना पोलिसांनी फरार होण्यासाठी मदत केल्याचा आरोप माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी केला आहे.
तसेच एका लोकप्रतिनिधीने पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना अश्लील शिवीगाळ केली असून त्या संदर्भात आपण सीसीटीव्ही फुटेज मागितले असता ते फुटेज करप्ट झाल्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रदीप शेवाळे यांनी सांगितले. प्रभारी पोलीस निरीक्षक गुंजाळ यांनी आपल्याला सदर सीसीटीव्ही फुटेज शेवाळे यांना दिल्याचे सांगितले असताना एका दिवसात फुटेज करप्ट कसे झाले? असा आरोपही त्यांनी यावेळी केला. अवैध धंदे व पोलिसांच्या गैर कारभाराविषयी जिल्हा पोलीस अधीक्षक तसेच महासंचालक यांच्याकडे वारंवार तक्रार करून देखील अद्यापही कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही. मुक्ताईनगर तालुक्यातील कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला असून लोकप्रतिनिधींच्या दबावात पोलीस अधीक्षक देखील हातबल झाले असल्याचा आरोप त्यांनी केला. याप्रसंगी पोलीस उपविभागीय अधिकारी प्रताप शिकारे यांना त्यांनी फोन करून खडसावले.
राज्यपालांनी प्रतिमा गमावली
राज्यपाल भगत सिंग कोशारी यांच्या राजीनाम्यावर जनतेने सुटकेचा निश्वास सोडल्याची प्रतिक्रिया खडसे यांनी दिली. त्यांची कारकीर्द ही वादग्रस्त होती. राज्यपाल पदाची प्रतिमा व प्रतिष्ठा त्यांनी गमावली असून महापुरुषांचे व छत्रपती शिवरायांबद्दल अनुद्गार काढून ते वादग्रस्त ठरलेले आहेत. त्यांच्या राजीनाम्यासाठी रस्त्यावर संघर्ष बघायला मिळाला. महाराष्ट्राच्या इतिहासातील ही पहिलीच घटना आहे. आपण स्वतः विरोधी पक्षनेते असताना व केंद्रात काँग्रेसचे सरकार असताना पी.सी अलेक्झांडर सारखा राज्यपालांचा याबाबत कार्यकाल वाढवून द्यावा अशी मागणी आपण केली होती. अशी आठवणही त्यांनी सांगितली.