लोकशाही संपादकीय लेख
महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक २० नोव्हेंबरला एकाच दिवशी होणार असून २३ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. आता सर्वच पक्षांची धावपळ सुरू झाली आहे. महाविकास आघाडी व महायुतीतर्फे संयुक्त पत्रकार परिषदा घेऊन जागा वाटपाच्या फॉर्मुल्याची माहिती दिली. महायुतीमध्ये भाजप हा मोठा भाऊ असून भाजपाला यंदा १५५ ते १६० जागा आहेत. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला ८५ ते ९० आणि अजित पवारांना ४५ ते ५० जागा मिळतील असा फॉर्मुला असल्याची सांगण्यात आले. एकनाथ शिंदेंना २०२२ मध्ये मुख्यमंत्री पद देऊन भाजपने त्याग केला. आता एकनाथ शिंदे यांनी जागा वाटपाबाबत त्याग करावा, असे वक्तव्य केल्याचे वृत्त प्रसारित झाले आणि शिंदे शिवसेनेमध्ये एकच खळबळ उडाली. कारण २०२४ च्या निवडणुकीत भाजपच्या सर्वाधिक जागा युतीमध्ये निवडून आल्या तर मुख्यमंत्री पदावर भाजपच दावा करू शकते, हे निर्विवाद सत्य आहे. भाजपच्या १०५ जागा असताना आणि शिंदे यांच्या अवघ्या ४० जागा असताना सुद्धा एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करून भाजपने त्याग केला आहे. अमित शहांचे वक्तव्य योग्यच आहे. खरंतर त्यावेळी शिंदेंना उपमुख्यमंत्री केले असले तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदी बसले असते. परंतु माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना शह देण्यासाठी एकनाथ शिंदेंची लॉटरी लागली, हे कबूल करावेत लागेल. त्या वेळच्या निर्णयाने स्वतः देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा धक्का बसला होता. त्यामुळे ते मंत्रिमंडळात न राहता पक्षाचे काम करण्याची संधी द्या असे श्रेष्ठींकडे मागणी करीत होते. तथापि श्रेष्ठींच्या आदेश मानून त्यांनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारले. परंतु पहिले सहा महिने एकनाथ शिंदे नावालाच मुख्यमंत्री होते. देवेंद्र फडणवीस हेच राज्य चालवत होते. हळूहळू एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदावर कब्जा करीत गेले. त्यावेळी स्वतंत्रपणे निर्णय घेऊ लागले. परंतु लोकसभेच्या निवडणुकीत शिंदे शिवसेनेने १५ जागा लढवून सात जागांवर विजय मिळवून स्ट्राइक रेटमध्ये आघाडी घेतली, तेव्हा शिंदेंची बार्गेनिंग पॉवर वाढली. केंद्रात भाजपला पूर्ण बहुमत मिळाले नाही. त्यामुळे सुद्धा एकनाथ शिंदेंचा भाव वाढला. केंद्रात एनडीएच्या मित्रपक्ष सहकार्याने नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले. त्यामुळे एकनाथ शिंदे हे अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांना भेटण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांची मदत न घेता भेटू लागले. म्हणूनच विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदेंनी शंभर पेक्षा जास्त जागा मिळाव्यात यावर ठाम राहिले.
एकनाथ शिंदे यांची ताकद वाढल्याने त्यांची जागा वाटपाबाबतीत तडजोड तयार होत नव्हती. तेव्हा एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करून भाजपने त्याग केला. आता जागा वाटपात एकनाथ शिंदेंनी त्याग करावा हे वक्तव्य करून एकनाथ शिंदे यांना अमित शहा यांनी जणू इशाराच दिला आहे. त्याबाबतीत नुकत्याच झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत पत्रकारांनी शिंदेंना आणि दोघं उपमुख्यमंत्र्यांना त्यागाच्या संदर्भातला प्रश्न विचारला तर ‘अशी त्यागाची भाषा झालीच नाही’ म्हणून तिघांनी उत्तर देण्याचे टाळले. तथापि सोशल मीडियावरून त्यागाच्या संदर्भातील बातम्या जोराने व्हायरल होत आहेत. तातडीने शिंदे शिवसेनेचे प्रवक्ते अनिल शिरसाट त्याला उत्तर देताना म्हणाले, ‘भाजप पेक्षा जास्त एकनाथ शिंदे आणि त्यांचे सोबत शिवसेना सोडून आलेल्या आमदारांनी केला आहे.’ असे वक्तव्य करून अमित शहांच्या त्यागाचे वक्तव्य खोडून काढले. आमचा त्याग भाजप पेक्षा जास्तीचा आहे, असे ते म्हणताय. ही भाषा महाडचे आमदार भरत गोगावले यांनी करून प्रत्युत्तर दिले. एकंदरीत महायुती तिन्ही पक्षात सर्व काही अलबेला आहे. सत्तेसाठी पक्षाची फोडाफोडी झाली. आता विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीचे पक्ष अंतर्गत पक्षातील उमेदवार पाडापाडीचे राजकारण करतील असे चित्र दिसते आहे. २०२४ निवडणुकीनंतर समजा महायुतीची सत्ता आली, तर एकनाथ शिंदेंना भाजपवाले मुख्यमंत्री करतील याची शाश्वती वाटत नाही. एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री झाले नाही, तर त्यांची पक्ष संघटना त्यांना मजबूत करणे कठीण जाईल. पक्ष संघटना खिळखिळी होण्यासाठीच शक्यता आहे. यदा कदाचित महाविकास आघाडी सत्तेवर आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्थिती अत्यंत बिकटही होईल. म्हणून सत्ता आपल्याला आपल्या हाती राहावी यासाठी एकनाथ शिंदे अनेक योजनांवर योजनांची खैरात देत आहेत. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीला सत्ता मिळाली नाही तर एकनाथ शिंदे यांच्यापासून त्यांचे जे काही आमदार असतील ते दूर जातील असे स्पष्ट दिसून येत आहे. त्यामुळे २३ नोव्हेंबर रोजीच्या निकालाने अनेक गोष्टी स्पष्ट होणार आहेत…!