लोकशाही न्यूज नेटवर्क

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची बैठक बोलावली आहे. या बैठकीत विविध मुद्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे यांनी ही बैठक आज (दि. २९) सायंकाळी बोलावलेली आहे. त्यामुळं बैठकीत विधानपरिषद निवडणुकीसाठी शिवसेनेच्या दोन उमेदवारांच्या नावांबाबत अंतिम निर्णय होऊ शकतो. या बैठकीत पक्षातील नाराजी, पक्षातील नेत्यांची वक्तव्य याबाबत एकनाथ शिंदे भूमिका स्पष्ट करणार असल्याची माहिती देखील देण्यात आली आहे. शिंदेंच्या बैठकीत संजय गायकवाड यांच्या वक्तव्यांबाबत देखील चर्चा होण्याची शक्यता आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेची विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीला पक्षाचे नेते, उपनेते, महत्वाचे लोकप्रतिनिधी आणि प्रमुख पदाधिकारी यांची उपस्थिती असेल. शिवसेनेची बैठक संध्याकाळी नंदनवन या निवासस्थानी होणार आहे. आज होणाऱ्या बैठकीत विधान परिषद निवडणूक या हा विषय केंद्रस्थानी असेल.
महाराष्ट्राच्या विधानपरिषदेच्य 9 जागांसाठी निवडणूक झाली आहे, तर एका जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. विधानसभेतील सदस्यांच्या संख्याबळानुसार शिवसेनेच्या वाट्याला दोन जागा येणार आहे. शिवसेनेकडे 57 जागा असून सेनेच्या दोन जागा निवडून येऊ शकतात. यामुळं आजच्या बैठकीत एकनाथ शिंदे काय भूमिका घेतात आणि कोणाला संधी देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
विधानपरिषद निवडणुकीसाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून नीलम गोऱ्हे आणि बच्चू कडू यांच्या नावांची चर्चा सुरु होती. नीलम गोऱ्हे यांच्या नावाला विरोध करणारं पुण्यातील महिलाचं एक पत्र व्हायरल झालं होतं. तर, बच्चू कडू यांना संधी द्यायची असल्यास त्यांच्या प्रहार जनशक्ती पार्टीचं शिवसेनेत विलिनीकरण करुन घ्यावं, अशी भूमिका शिवसेनेतील काही नेत्यांनी घेतली होती. दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील आमदार संजय गायकवाड सातत्यानं वेगवेगळ्या कारणांमुळं वादात आहेत.
काही महिन्यांपूर्वी आमदार निवासामधील कॅन्टिनमधील कर्मचाऱ्यांना दमदाटी केल्यानं ते वादात अडकले होते. तर, काही दिवसांपूर्वी संजय गायकवाड यांनी कोल्हापूरमधील प्रशांत अंबी यांना फोन करुन वादग्रस्त वक्तव्य केली होती. त्यामुळं संजय गायकवाड यांच्यासह एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर टीका झाली होती. या सर्व प्रकरणांवर एकनाथ शिंदे काय भूमिका घेतात याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे.


