एकनाथ शिंदे मुंबईला रवाना, राज्यपालांची भेट घेणार

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

शिवसेनेतून बंडखोरी केलेले नेते एकनाथ शिंदे हे गोव्यातून मुंबईकडे रवाना झाले आहेत. तसेच ते आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार आहेत. त्याआधी एकनाथ शिंदे गटाची ताज कन्व्हेशन हॉटेलमध्ये बैठक झाली. ”मी राज्यपालांना भेटण्यासाठी मुंबईला जात आहे. पुढचा निर्णय तुम्हाला सांगतो,” असे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

एकनाथ शिंदे मुंबईकडे रवाना

विशेष म्हणजे केवळ एकनाथ शिंदे आणि आमदार रविंद्र चव्हाण मुंबईकडे येण्यासाठी निघाले आहेत. अन्य आमदार गोव्यातच असल्याचे समजते. एकनाथ शिंदे यांचा गट काल गुवाहाटीवरुन गोव्यात दाखल झाला होता. त्यानंतर गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल रात्री एकनाथ शिंदे गटाच्या आमदारांची भेट घेतली. गोव्यातील ताज कन्व्हेंशन सेंटर येथे ही भेट झाली होती. बुधवारी रात्री अकराच्या सुमारास शिवसेनेचे सर्व ३९ आमदार व इतर अपक्ष आमदार ताज कन्व्हेंशन सेंटर येथे दाखल झाले होते. यानंतर रात्री उशिरा साडेअकराच्या दरम्यानच गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी त्यांची भेट घेतल्याचे समजते.

अफवांवर विश्वास ठेवू नका

दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी दोन ट्विट केली आहेत. भाजपसोबत कोणती आणि किती मंत्रीपदे याबाबत अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही, लवकरच होईल. तोपर्यंत कृपया मंत्रिपदाच्या याद्या आणि याबाबत पसरलेल्या अफवा यावर विश्वास ठेवू नका, असे आवाहन त्यांनी केले आहे. वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार, धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण, महाराष्ट्राचा सर्वांगिण विकास आणि आमदारांच्या मतदारसंघातील विकास कामे हाच आमचा फोकस असल्याचे त्यांनी ट्विट करत म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.