एकनाथ शिंदे दिलदार नेते, त्यांचा मान राखावा !

सेनेच्या नेत्याची मागणी : महायुतीतील तिढा सुटणार

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

 

संपूर्ण राज्य अजूनही मुख्यमंत्री कोण होणार याची प्रतीक्षा करत आहे. कारण, महायुतीकडून आत्तापर्यंत ना मुख्यमंत्री ना उपमुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. अजूनही महायुतीच्या नेत्यांमध्ये याबाबत चर्चा सुरु आहे. तर, दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनीही प्रकृतीचे कारण देत सर्व सभा रद्द केल्या तसेच, त्यांनी भेटीगाठीही टाळल्या. त्यानंतर भाजपचे संकटमोचक म्हणजेच गिरीश महाजन यांनी शिंदेंची भेट घेतली आहे. या बैठकीत शिंदेंची नाराजी दूर करत महायुतीतील तिढा सोडवण्याचा प्रयत्न महाजनांनी केल्याचे सांगण्यात येत आहे. तर, यादरम्यान अजित पवार यांनी सुपुत्र पार्थ पवारांसह थेट दिल्ली गाठत अमित शाहांची भेट घेतल्याने चर्चांना उधाण आले आहे.

महायुतीच्या मंत्रिमंडळाबाबत अजूनही निर्णय झालेला दिसत नाही. अनेक बड्या विभागांबाबत अद्याप निर्णय झालेला नाही, असे एकंदरीत चित्र दिसत आहे. कारण, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिंदे गटाकडून गृह खात्यासह तीन मोठ्या मंत्रिपदांची मागणी केली जात असून, त्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. महाराष्ट्रात मुख्यमंत्रिपदाच्या मुद्द्यावरुन जो तिढा निर्माण झाला आहे, त्याबाबत शिवसेना नेते दीपक केसरकर यांनी आपली प्रतिक्रिया दली आहे. काहीही झाले तरी सरकार स्थापन होत आहे. शपथविधी सोहळा 5 डिसेंबरला निश्चित करण्यात आला आहे. एकनाथ शिंदे यांच्यामुळे राज्यात सरकार स्थापन होत नाहीये, हे म्हणणे चुकीचे आहे. भाजपने निरीक्षकांची नियुक्ती केली आहे, त्यामुळे लवकरच मुख्यमंत्रिपदाची घोषणा केली जाईल, असे केसरकर म्हणाले.

पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांचा निर्णय अंतिम असेल, हे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. गृहखाते हे एकट्या गृहमंत्र्यांना चालवता येत नाही. हे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री संयुक्तपणे चालवतात. राज्यांमध्ये गृहखात्याचे सर्व अधिकार मुख्यमंत्र्यांकडे असतात. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होण्याची 99 टक्के शक्यता आहे. एकनाथ शिंदे हे दिलदार नेते आहेत, त्यांचा मान राखायला हवा, असेही केसरकर म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.