एकनाथ खडसेंची राजकीय निवृत्तीची घोषणा

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर  राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राजकारणातून निवृत्ती जाहीर केली आहे. विधानसभा निवडणूक २०२४ प्रचाराच्या शेवटच्या दिवशी त्यांनी व्हिडिओच्या माध्यमातून कार्यकर्त्यांशी व मतदारांशी संवाद साधला. त्यावेळी बोलताना ते भावूक झाले. ‘यापुढं निवडणूक न लढवण्याचा निर्णय मी घेतला आहे. मी तुमच्यासोबत अनेक वर्षे आहे. तुम्ही अनेक वर्षे मला आधार दिलात आणि आशीर्वाद दिलात. तुमच्या सुख-दु:खात मी सहभागी झालो आहे. जात-धर्म न बघता मी सर्वांना मदत केली आहे.

जळगावच्या मुक्ताईनगर मतदारसंघाची एकनाथ खडसे यांनी १९८९ ते २०१९ या कालावधीत सलग सहा वेळा भाजपचे आमदार म्हणून धुरा संभाळली. युती सरकारच्या काळात त्यांनी अनेक मंत्रिपदं भूषवली होती. तसेच विरोधी पक्षनेतेपदही भूषवलं होतं. मात्र, फडणवीस मुख्यमंत्री असताना  भोसरी भूखंड घोटाळ्याचे आरोप झाल्यानंतर त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. तेव्हापासून त्यांच्या राजकीय कारकिर्दीला उतरती कळा लागली. पक्षात कुठलीही संधी नसल्याचं स्पष्ट झाल्यानंतर खडसे यांनी २०२० मध्ये भाजपला सोडचिठ्ठी दिली आणि अखेर तीन वर्षांनंतर अविभाजित राष्ट्रवादीत प्रवेश केला. राष्ट्रवादीमध्ये फूट पडून अजित पवार यांनी भाजपशी हातमिळवणी केल्यानंतर त्यांनी शरद पवार यांच्या पक्षासोबत राहणं पसंत केलं होतं.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.