जिल्हा बँकेत खडसेंचा गेम कुणी केला?

0

लोकशाही संपादकीय लेख

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत २१ संचालकांपैकी १५ संचालक महाविकास आघाडीचे असताना अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत काँग्रेसचे ॲड. रवींद्र पाटील (Ravindra Patil) यांचा पराभव झाला कसा? आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर उमेदवार संजय पवार (Sanjay Pawar) विजयी होण्याचे कारण काय? तसेच राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांचा गेम कोणी केला? या प्रश्नाचे उत्तर शोधून अभ्यास केला, तर राष्ट्रवादीच्या संचालकांनीच एकनाथराव खडसे यांचा गेम केला असे म्हणावे लागेल. कारण २१ संचालकांपैकी राष्ट्रवादी काँग्रेसचे १० संचालक, काँग्रेसचे ३, शिवसेना ठाकरे गटाचे २ आमदार असे १५ जणांचे संख्याबळ असताना तसेच, विरोधी गटात शिवसेना शिंदे गटाचे ५ आणि भाजपचे भुसावळचे आमदार संजय सावकारे (Sanjay Savkare) असे ६ जणांचे संख्याबळ असताना १५ विरुद्ध ६ असे मतदान होऊन ॲड.. रवींद्र पाटील हे सहज अध्यक्षपदी विराजमान होऊ शकले असते. १५ पैकी महाविकास आघाडीची ५ मते फुटली. ती फुटलेली मते महाविकास आघाडीतील कोणती आहेत? याचा अभ्यास अथवा आत्मचिंतन एकनाथराव खडसेंनी केले तर, त्यांचा गेम कुणी केला हे सहज स्पष्ट होऊ शकते.

एकनाथराव खडसे म्हणतात ‘काँग्रेसची ३ मते फुटली आणि आमदार सावकरे यांनी आम्हाला मत दिले नाही.’ तरी सुद्धा शिवसेना शिंदे गटाचे ५, आमदार सावकरे १, काँग्रेस ३ आणि बंडखोर ठरणारे संजय पवार यांचे १ अशी मताची बेरीज केली तर एकूण १० संख्या होते. अकरावे मत फुटले ते कुणाचे? असा तर्क केला जातोय. एकनाथराव खडसेंना राष्ट्रवादीच्या संचालकांनी दगा दिला. परंतु महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गटाचे एक संचालक फुटले, असाही दावा केला जातो आहे. १५ संचालक संख्येने आपल्याकडे असताना राष्ट्रवादीच्या ॲड.. रवींद्र पाटील यांचा पराभव व्हावा, ही राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांच्यावर फार मोठी नामुष्की ओढावली आहे, असे म्हणता येईल. विधान परिषदेत राष्ट्रवादीतर्फे एकनाथराव खडसे यांची गटनेतेपदी निवड होऊन राज्य पातळीवर त्यांचा सन्मान पक्षातर्फे करण्यात आला असला, तरी जिल्हा पातळीवर मात्र जिल्हा बँकेत अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभव झाल्याने नाथाभाऊ बॅकफूटवर गेले आहेत. १५ संचालकांना एकत्र बांधून ठेवणे नाथाभाऊंना जमले नाही, एवढे मात्र निश्चित. त्याचा फायदा विरोधकांनी घेतला आणि त्यात ते सहज यशस्वी झाले. त्यामुळे नाथाभाऊंचा गेम विरोधकांनी नव्हे तर नाथाभाऊंच्या राष्ट्रवादीच्या संचालकांनी केला असे म्हणावे लागेल.

एकनाथराव खडसे हे अनुभवी, मुरब्बी राजकारणी असताना अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभूत होण्याच्या कारणाचा विचार केला, तर त्याला एकनाथराव खडसे हेच जबाबदार आहेत, असा राजकीय निरीक्षकांचा अंदाज आहे. पहिली गोष्ट म्हणजे बँकेचे चेअरमन असलेल्या गुलाबराव देवकरांच्या (Gulabrao Deokar)  चेअरमन पदाचा वर्षभरात राजीनामा घेतला, हीच मोठी चूक झाली. कारण गेल्या वर्षी गुलाबराव देवकऱ्यांची चेअरमन पदी निवड झाली, हीच मुळी नाट्यमय रित्या झाली. गुलाबरावांच्या जागी चेअरमन पदासाठी नाथाभाऊंची खेळी त्यावेळी यशस्वी होऊ शकली नाही. त्याचवेळी एकनाथराव खडसे यांच्या लक्षात यायला हवे होते की, आपल्या समर्थक उमेदवारांच्या नावाला राष्ट्रवादी पक्षात विरोध होतोय. गुलाबरावांचा राजीनामा घेतल्यानंतर ॲड. रवींद्र पाटील यांच्या नावाला महाविकास आघाडीचे संचालकांचा विरोध होता. त्यांच्यात एकमत नव्हते. केवळ एकनाथराव खडसे यांनी रवींद्र पाटलांच्या नावाला असलेला आग्रह पाहून संचालकांनी चुप्पी साधली आणि मतदान करताना आपला करिष्मा दाखवला.

ॲड. रवींद्र पाटलांनी आतापर्यंत पक्षातर्फे अनेक पदे उपभोगली आहेत. जिल्हा बँकेत ते अनेक वर्षे आहेत. जिल्हा परिषद अध्यक्षपदी देखील ते होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दुसऱ्यांदा झाले आहेत. तरीसुद्धा अध्यक्षपदासाठी त्यांचाच आग्रह नाथाभाऊंनी धरला, हे त्यांना भोवले. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रदीप देशमुख, माजी मंत्री सतीश पाटील हे इच्छुक होते. ॲड. रवींद्र पाटलांच्या ऐवजी राष्ट्रवादी काँग्रेसचे संचालक असते, तर चित्र वेगळे दिसले असते, असे जाणकारांचे म्हणणे आहे. महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गटाच्या संचालक महापौर जयश्री महाजन (Mayor Jayashree Mahajan) यांनाही अध्यक्षपदाची उमेदवारी दिली असती, तर चित्र वेगळेच असते. भाजपचे (BJP) भुसावळचे आमदार संजय सावकारे यांनी अपक्ष उमेदवारी लढवली. त्यावेळी त्यांना निवडून आणण्यात एकनाथराव खडसेंचा मोठा वाटा असल्याने अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ते महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मतदान करतील हा नाथाभाऊंचा आत्मविश्वास नडला. आगामी विधानसभा डोळ्यासमोर ठेवून संजय सावकरे यांनी भाजपशी पंगा घेण्याचे कारण काय? भले भाजपकडून त्यांचे तिकीट कापले जाईल अशी मोठ्या प्रमाणात चर्चा असली तरी आज ‘मी भाजपची एकनिष्ठ’ असल्याचे त्यांनी दाखवून दिले. एकंदरीत नाथाभाऊंच्या गेम विरोधकांऐवजी त्यांच्या पक्षाकडून झाला असेच म्हणावे लागेल…!

Leave A Reply

Your email address will not be published.