खडसेंचा ‘भाजप प्रवेश’ रखडला आता पुन्हा ‘राष्ट्रवादीत’ जाणार..?

0

लोकशाही संपादकीय लेख 

महाराष्ट्रातील भाजपचे जेष्ठ नेते माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शरद पवारांनी त्यांना राष्ट्रवादीतर्फे विधान परिषदेची आमदारकी देऊ केले. कन्या रोहिणी खडसे यांना राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश महिलांच्या अध्यक्षपदी नेमले. परंतु पाच महिन्यांपूर्वी लोकसभा निवडणुकीच्या आधी ‘ भाजपात घरवापसी करण्याची’ त्यांनी इच्छा व्यक्त केली.

दिल्लीचे वरिष्ठ नेते जे.पी. नड्डा, विनोद तावडे आणि अमित शहा यांनी त्यांच्या गळ्यात भाजपचे मफलर घालून भाजपात प्रवेश दिला, असे खुद्द एकनाथ खडसेंनी सांगितले. त्यावेळी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचे वारे वाहत होते. दिल्ली राजधानीत खडसेंचा भाजप प्रवेश झाला असला, तरी अद्याप पक्षाकडून महाराष्ट्राला काही कळविले नाही, असे भाजपचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन तसेच भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली होती. तेव्हाच महाराष्ट्र भाजपचा खडसेंच्या भाजप प्रवेशाला विरोध आहे, हे स्पष्ट झाले होते.

परंतु लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या काळात रावेर लोकसभा मतदारसंघात निवडणुकीला उभ्या असलेल्या रक्षा खडसेंच्या प्रचारावर परिणाम होऊ नये, म्हणून खडसेंच्या घरवापसीची चर्चा महाराष्ट्रात टाळली गेली. तथापि निवडणूक काळात त्यांच्या भाजप जाहीर प्रवेशाला गटबाजी वाढण्याचे कारण देऊन विरोध केला गेला. त्यामुळे एकनाथ खडसे यांनी रक्षा खडसेंचा जाहीर प्रचार न करता घरूनच प्रचार केला.

खडसे ओबीसी नेते असल्याने ओबीसी मतदारांची मते रक्षा खडसेंना मिळविण्यात नाथाभाऊंचा निश्चितच उपयोग झाला. लोकसभा निवडणुकीत रक्षा खडसे मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्या असल्या, तरी केंद्रात जे भाजपला मताधिक्य हवे होते ते मिळाले नाही. महाराष्ट्रात तर लोकसभा निवडणुकीत भाजपची दाणादाण उडाली. पाच महिन्यांपूर्वी एकनाथ खडसे यांनी भाजपात प्रवेश केल्याचे टाइमिंग सुनबाई रक्षा खडसेसाठी योग्य साधले होते. पाच महिन्यानंतर आता महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका तोंडावर असताना आपल्या वाढदिवसाचे निमित्त साधून माझ्या भाजप पक्ष प्रवेशाला राज्यात विरोध होत असल्यामुळे माझा भाजप पक्षप्रवेश जाहीर झाला नसावा, असे सांगून राष्ट्रवादी काँग्रेस सदस्यत्वाचा तसेच आमदारकीचा मी दिलेला राजीनामा अद्याप स्वीकारलेला नाही, त्यामुळे माझ्या भाजप प्रवेशाला विरोध होत असेल, तर मी परत राष्ट्रवादीत जाण्याचा विचार करतो आहे असे मोठे विधान काल एकनाथ खडसेंनी करून खळबळ उडवून दिली. त्यातच कालच्या त्यांच्या वाढदिवसानिमित्त जळगाव शहरात राष्ट्रवादी पक्षाच्या बॅनरवर खडसेंचे फोटो टाकून बॅनरबाजी केल्याने खडसे पुन्हा राष्ट्रवादीत जाणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

एकनाथ खडसे यांनी पाच महिन्यापूर्वी भाजप घरवापसी करण्याचा निर्णय जाहीर केल्याचे टाइमिंग आणि आताचे राष्ट्रवादीत जाण्याचे टाइमिंग पाहता त्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. लोकसभेत रक्षा खडसेंना निवडून आणण्यासाठी त्यांनी टायमिंग साधले आणि विधानसभेत कन्या रोहिणी खडसेंना मुक्ताईनगर विधानसभा मतदार संघातून निवडून आणण्यासाठी राष्ट्रवादीत पुन्हा जाण्याचे टाइमिंग चालले आहे. एकनाथ खडसे भाजपात राहिले असते तर मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात त्यांचे कट्टर राजकीय शत्रू आमदार चंद्रकांत पाटील यांच्या प्रचार करावा लागला असता.

मुलीच्या विरोधात त्यांना तो प्रचार करणे अवघड झाले असते. काही झाले तरी ‘ज्या नेत्याने महाराष्ट्रात भाजप वाढवली रुजवली त्या एकनाथ खडसेंचा भाजप प्रवेश म्हणजे चेष्टेचा विषय बनला आहे.’ तसे पाहता लोकसभा निवडणुकीत भाजपची झालेली दाणादाण आणि महाविकास आघाडीला मिळालेले यश पाहता आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचीच चलती राहणार आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी एकनाथ खडसेंना सर्व काही देऊ केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा न देण्याची मुभा खडसेंना शरद पवार यांनी दिली.. आणखी काय हवे?

यदाकदाचित यंदा विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी सत्तेवर आली आणि कन्या रोहिणी खडसे निवडून आल्या, तर रोहिणीचा मंत्रिमंडळात निश्चित समावेश होईल, यात शंका नाही. एकनाथ खडसेंची प्रकृती आता साथ देत नाही, अन्यथा तेच मंत्रिमंडळात राहिले असते. वरिष्ठ ज्येष्ठ नेते म्हणून सल्लागारांची भूमिका पार पाडण्यात त्यांचे मोलाचे कार्य राहिले आहे. एकंदरीत ज्या नेत्याने भाजपसाठी एवढ्या खस्ता खाल्ल्या त्यांची भाजप घरवापसी महाराष्ट्र भाजपने आनंदाने करायला हवी होती; परंतु जर एकनाथ खडसे भाजपात आले तर आपले काय होईल? असे गृहीत धरून त्यांच्या प्रवेशाला विरोध करणे हे भाजपसाठी घातक आहे.

त्यामुळे भाजपची महाराष्ट्रात फार मोठ्या प्रमाणावर पिछेहाट होते आहे. काँग्रेस मधले भ्रष्टाचारी नेते अशोक चव्हाण तुम्हाला चालतात, मग पक्ष बांधणीत ज्यांनी मोलाचे कार्य केले आहे, त्या एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशाला विरोध का? हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. यदाकदाचित महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सत्ता आली तर मग भाजपला पश्चाताप झाल्याशिवाय राहणार नाही.. पाहूया काय होते काळ काय ते ठरवेल…!

Leave A Reply

Your email address will not be published.