शेतकऱ्यांच्या मदतीऐवजी सरकार ‘गंमत’ करण्यात व्यस्त!
‘दगडी बँक’ विक्री विरोधात जनआंदोलन उभारणार : ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांचा ‘लोकशाही’शी संवाद
शेतकऱ्यांच्या मदतीऐवजी सरकार ‘गंमत’ करण्यात व्यस्त!
‘दगडी बँक’ विक्री विरोधात जनआंदोलन उभारणार : ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांचा ‘लोकशाही’शी संवाद
दीपक कुलकर्णी जळगाव
राज्यातील अनेक भागांप्रमाणेच जळगाव जिल्ह्यातील शेतकरी देखील यावर्षीच्या अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या ओल्या दुष्काळाचा गंभीर फटका सहन करत आहे. पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकऱ्यांपुढे आता आर्थिक संकट उभे ठाकले आहे. अशा कठीण परिस्थितीत सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे आवश्यक असतानाही, महायुतीचे सरकार केवळ दिखाऊ मदत जाहीर करून शेतकऱ्यांची थट्टा करत आहे, अशी जोरदार टीका राष्ट्रवादी (शप) गटाचे ज्येष्ठ नेते तथा आमदार एकनाथराव खडसे यांनी दै. लोकशाहीशी बोलतांना केली.
श्री. खडसे म्हणाले की, शेतकऱ्याला फक्त पाच हजार रुपयांची मदत आणि थोडासा गहू-तांदूळ देऊन सरकार आपली जबाबदारी संपवते आहे. हे अत्यंत लाजिरवाणे आहे. रयतेचे राज्य म्हणून मिरवणाऱ्या सरकारकडून अशा प्रकारची ‘किंचित’ मदत अपेक्षित नव्हती. शेतकरी पुरता होरपळला आहे आणि सरकार त्याच्या गंमतीतच अडकून पडले आहे. ओल्या दुष्काळामुळे केवळ पिकांचे नुकसानच झालेले नाही, तर शेतकऱ्याचा संपूर्ण आर्थिक आधारच ढासळला आहे. कर्ज फेडणे तर दूरच, नव्याने शेती करण्यासाठी देखील शेतकऱ्याकडे पैसा नाही. सरकारने सरसकट कर्जमाफी जाहीर करावी, अशी मागणी त्यांनी केली. हेक्टरी 50 हजार रुपयांची मदत थेट शेतकऱ्याच्या खात्यात जमा करावी, म्हणजे तो पुन्हा उभा राहू शकेल. केवळ घोषणा करून किंवा कागदोपत्री मदतीचा फार्स करून हे संकट मिटणार नाही. प्रशासनाच्या अहवालांच्या अधीन न राहता, सरसकट पद्धतीने मदत दिली पाहिजे. अन्यथा जनतेचा उद्रेक होईल, असा इशाराही त्यांनी दिला.
‘दगडी बँक’ विक्रीला विरोध
जिल्हा बँकेच्या मालकीची ‘दगडी बँक’ विकण्याचा काही संचालकांचा प्रयत्न आहे. त्यांनी या निर्णयाला तीव्र विरोध दर्शवत सांगितले की, ही बँक फक्त आर्थिक व्यवहाराची जागा नसून, ती जळगावच्या ऐतिहासिक वारशाचा भाग आहे. ‘दगडी बँक ही केवळ एक इमारत नाही. ती आपल्याला आपल्या इतिहासाची आठवण करून देणारी वास्तू आहे, त्या इमारतीशी शेतकऱ्यांच्या भावना जुळल्या आहेत. काही संचालक या बँकेची इमारत विकून स्वतःचा फायद्याचा सौदा करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला. चेअरमन संजय पवार हेच या विक्री प्रक्रियेचे सूत्रधार आहेत आणि त्यामुळे त्यांच्या हेतूंवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, असे खडसे यांनी स्पष्ट केले. इमारतीचा काही भाग खराब झाला आहे हे खरे, पण तो भाग दुरुस्त केला जाऊ शकतो. त्यामुळे संपूर्ण इमारत विकण्याची गरजच नाही. अशा ऐतिहासिक वास्तूंचे जतन करणे हे आपले कर्तव्य आहे. परंतु विक्रीच्या नावाखाली हा वारसा गमावण्याचा डाव रचला जात आहे याला मी याला कटाक्षाने विरोध करणार असेही श्री. खडसे यांनी सांगितले.
लवकरच लोढा प्रकरणाचे फटाके फुटणार!
हनीॅप प्रकरणी अटकेत असलेला प्रफुल्ल लोढा प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाला. मी हे प्रकरण उचलून धरल्याने माझ्या जावयाला बोगस प्रकरणात अडकविण्यात आले. मात्र त्या प्रकरणात त्यांना क्नीनचिट मिळाली असून लवकरच प्रफुल्ल लोढा प्रकरण पुराव्यानिशी बाहेर काढले जार्इल असे श्री. खडसे यांनी सांगितले. अंधेरी व साकिनाका येथे या प्रकरणी गुन्हे दाखल असून राज्यातील एक मंत्री यात गुंतला असून त्याचा चेहरा समाजासमोर आणला जार्इल असेही श्री. खडसे यांनी ठासून सांगितले.