सोयगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
सोयगाव शहरासह तालुक्यात शुक्रवारी (दि. ११) रात्री आठ वाजेपासून सुरू झालेल्या परतीच्या पावसाने शनिवारी (दि. १२) पहाटे चार वाजेपर्यंत संततधार मुसळधार पावसाने थैमान घातले होते. दरम्यान आठ तासात तालुक्यात सरासरी २६५ मी मी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे खरिपाच्या पिकांची माती झाली असून कपाशी, ज्वारी, बाजरी, मका, सोयाबीन ही पिके पूर्णपणे हातून गेली आहे.
शहरासह तालुक्यात शुक्रवारी रात्री पासून संततधार पावसाने थैमान घातले होते. यामध्ये घोसला शिवरावर ढगफुटीचा पाऊस झाल्याने शनिवारी दुपारी एक वाजेपर्यंत खटकाळीं नदीचा पूर सुरूच होता. दरम्यान कपाशीच्या पिकांची भिजून वाती झाल्या आहेत. मका व सोयाबीनला कोंब फुटले आहे. ज्वारी, बाजरी या पिकांची माती झाली आहे. अद्यापही महसूल आणि कृषीच्या पथकांनी पाहणी केलेली नसल्याने नुकसानीची आकडेवारी मिळाली नव्हती.
दरम्यान अतिवृष्टीची नोंद होवूनही शनिवारी शेतकऱ्यांच्या बांधावर एकही महसूल व कृषिचा कर्मचारी फिरकला नव्हता. त्यामुळे या कर्मचाऱ्यांवर शासनाचे नियंत्रण आहे की नाही असा संतप्त शेतकरी करत आहे. दरम्यान सोयगाव मंडळात सर्वाधिक ६८ मी मी पावसाची नोंद झाली आहे. या मंडळातही मंडळ अधिकारी, तलाठी, कृषी सहायक शनिवारी पाहणी साठी आलेले नव्हते. त्यामुळे ऐन विजया दशमीच्या दिवशी पिकांच्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली होती.
संततधार पावसामुळे सोयगाव, बनोटी मंडळात सर्वाधिक नुकसान झाले आहे कपाशी पिके पाण्यात बुडाली होती घोसला येथे ढगफुटी च्या पावसाने पिके वाहून गेली दरम्यान खटकाळी नदीचा पूर रात्री आलेला पूर सकाळी अकरा वाजेपर्यंत ओसरला नव्हता.
नुकसानीचे तक्रार पोर्टल बंद
परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीच्या ७२ तासांच्या आत पोर्टलवर तक्रारी करण्याचे कृषी आणि महसूल विभागाने शेतकऱ्यांना सांगितले. मात्र शनिवारी सकाळ पासून सदर शासनाचे पोर्टल बंद असल्याने शेतकऱ्यांना ७२ तासांच्या आत नुकसानीच्या तक्रारी करता आलेल्या नव्हत्या. याप्रकरणी तालुका कृषी अधिकारी मदन सिसोदिया यांचेशी संपर्क साधला असता सदर पीकविमा कंपनीला शनिवारी तातडीने पोर्टल सुरू करण्यात यावे यासाठी लेखी सूचना दिल्या असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
नांदा तांड्यात घर कोसळून एक गंभीर
दरम्यान सावळदबारा मंडळात झालेल्या अतिवृष्टीमुळे नांदा तांडा गावात कुटुंब गाढ झोपेत असताना घर अंगावर कोसळून अंकुश ज्योतिराम राठोड (वय३५) हे गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी रात्री दीड वाजेच्या सुमारास घडली आहे. अतिवृष्टीच्या संततधार पावसाने ज्योतिराम महारू राठोड यांचे घराच्या दोन्ही भिंती कोसळल्या. यामध्ये ऐकू राठोड हे गंभीर जखमी झाले. शनिवारी तलाठी विशाल शेलकर यांनी घटनेचा पंचनामा केला आहे. दरम्यान सोयगाव मंडळात झालेल्या अतिवृष्टीमुळे मका सोयाबीन ज्वारी बाजरी या पिकांना कोंब फुटली आहे कापशी ओली होऊन भिजून वाती झाल्या आहेत.
मंडळनिहाय पाऊस
सोयगाव-६८ मी मी
बनोटी-६५ मी मी
सावळदबारा-६६ मी मी
जरंडी-६५ मी मी