मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
चितोडे वाणी समाजाचा ओबीसी यादीत समावेश करण्यासंदर्भात आपण शासनस्तरावर प्रयत्न करु असे प्रतिपादन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केले. दै. लोकशाही निर्मित ‘चिवा’ आयकॉन कॉफी टेबल पुस्तकाचे प्रकाशन मुंबर्इ येथील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे झाले त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर प्रसिद्ध अभिनेते प्रदीप वेलणकर, अभिनेत्री दिप्ती भागवत, आमदार अमोल जावळे, संपादिका शांता वाणी, व्यवस्थापकीय संपादक कमलाकर वाणी, समूह संचालक राजेश यावलकर, संचालिका शुभांगी यावलकर उपस्थित होते.

प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दै. लोकशाही निर्मिती 22 मान्यवरांच्या जीवनावर आधारीत कॉफी टेबल पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते चिवा आयकॉनला शेला, मोतीमाळ, श्रीफळ, प्रेरणादायी पुस्तक व भव्य ट्रॉफी देवून सत्कार करण्यात आला.
श्री. नार्वेकर म्हणाले की, ओबीसी आरक्षणाच्या मागणीवर सकारात्मक भूमिका घेतली जार्इल, वाणी समाजाचा ओबीसी यादीत समावेश करण्यासंदर्भात शासनस्तरावर आवश्यक ती कारवाई करण्यात येईल आणि समाजाला अपेक्षित परिणाम मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू, असे आश्वासन त्यांनी दिले. लोकशाहीसारख्या वृत्तपत्रांचे विशेष कौतुक आहे, भारतीय संविधानाने माध्यमांना दिलेल्या ‘चौथ्या स्तंभा’च्या दर्जाचा उल्लेख करत समाजातील चांगल्या कामांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचे अत्यंत महत्त्वाचे कार्य सातत्याने केले आहे. समाजात कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान व गौरव करणे ही देखील समाजाला प्रेरणा देणारी प्रक्रिया आहे. भारत हा बहुभाषिक, बहुसांस्कृतिक देश असून येथे हजारो भाषा, विविध परंपरा आणि संस्कृती आढळतात. दर 50 किलोमीटरवर भाषा व जीवनशैली बदलत असली तरी भारतीय नागरिक गेली 76 वर्षे एकात्मतेने राहात आहेत, ही देशाची मोठी ताकद आहे. या एकात्मतेला बळकटी देण्यात माध्यमांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. लोकशाही बळकट करण्यासाठी नागरिकांचा विश्वास जपणे आवश्यक आहे. लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही आमच्या जबाबदाऱ्या योग्य पद्धतीने पार पाडू शकतो, यामागे नागरिकांचा विश्वास आणि सहकार्य महत्त्वाचे असते, असे त्यांनी स्पष्ट केले.
देशाच्या आर्थिक प्रगतीचा आढावा घेताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचा उल्लेख करत भारत सध्या जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला असून 2027 पर्यंत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचेल, असा विश्वास व्यक्त केला. 2047 पर्यंत भारत विकसित राष्ट्र बनेल, हा संकल्प पूर्ण करण्यासाठी सर्व समाजघटकांनी योगदान देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
कर्तृत्वाचा ठसा मोठा!
वाणी समाजाबद्दल बोलताना श्री. नार्वेकर म्हणाले की, समाजाची संख्या कमी असली तरी त्यांचा कर्तृत्वाचा ठसा मोठा आहे. समाजातील अनेक व्यक्तींनी सामाजिक तसेच राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कार्य केले असून देशाच्या प्रगतीत मोलाचे योगदान दिले आहे, पुढील काळातही हा समाज सेवाभावाने कार्य करत राहील आणि देशाच्या विकासात आपली भूमिका अधिक प्रभावीपणे बजावेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. महाराष्ट्राचा लोकप्रतिनिधी म्हणून, तसेच विधानसभा अध्यक्ष म्हणून, आपल्याला जेव्हा मदत लागेल तेव्हा मी आपल्या पाठीशी उभा राहीन, असे आश्वासन दिले.

