लोकशाही संपादकीय लेख
जळगाव शहरातील रस्त्यांचे तीन तेरा झालेले असताना शहरातून जाणाऱ्या महामार्गाला दोन्ही बाजूंनी समांतर रस्ते नसल्यामुळे अपघाताला निमंत्रण मिळते. तसेच शहरातील नागरिकांच्या वाहतुकीची कुचंबना होते आहे. शहरातून जाणारा महामार्ग क्रमांक सहाचे खोटे नगर ते कालिंका माता मंदिरापर्यंत सुमारे साडेसहा किलोमीटरचे चौपदरीकरण झाले. अनेक अपघातांच्या मालिकानंतर तसेच अनेक वर्षाच्या मागणीनंतर गेल्या दीड वर्षांपूर्वी त्याचे चौपदरीकरण झाले. अपघातावर नियंत्रण आणण्यासाठी या महामार्गाचे चौपदरीकरण झाले आणि तीन ठिकाणी अंडर पास रस्ते करण्यात आले. परंतु आकाशवाणी चौक इच्छा देवी चौक आणि अजिंठा चौफुली येथे ओव्हर ब्रिजची मागणी असताना तेथे रोटरी सर्कल करून वेळ मारून देण्यात आली असली तरी, हे तिन्ही रोटरी सर्कल्स सदोष झाल्यामुळे तेथे अपघाताची मालिका सुरूच आहे. तसेच तिन्ही चौकात सकाळ आणि संध्याकाळच्या वेळी वाहनांच्या बहुगर्दीमुळे वाहतुकीची कोंडी होणे हा नित्याचा भाग बनला आहे. त्यामुळे शहरातून जाणाऱ्या महामार्गाचे चौपदरीकरण झाल्याचे समाधान असले तरी तांत्रिकदृष्ट्या हा रस्ता सदोष बनला असल्याने जळगावकरांच्या नशिबी अद्याप पाचवीला पुजलेले आहे, असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. त्यातच शिव कॉलनी येथे ओव्हर ब्रिज न केल्याने तिथली समस्या सतत रस्ता क्रॉस करताना जाणवते. जीव मुठीत धरूनच दुचाकी स्वार तसेच कारवाले रस्ता क्रॉस करतात. त्यामुळे शिव कॉलनी जवळ महामार्ग हा अपघाताचा स्पॉट बनलेला आहे. चार महिन्यांपूर्वी इंजीनियरिंगची विद्यार्थिनी आपल्या भावाबरोबर दुचाकीवरून जात असताना त्याच ठिकाणी मालट्रकने तिला चिरडले. त्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला. त्यामुळे अपघात टाळण्यासाठी केलेला महामार्ग सदोष झाल्याने ते अपघाताला निमंत्रण देणारे ठरत आहे.
नव्या महामार्ग चौपदरीकरणाचे केंद्रीय मंत्री वाहतूक केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन झाले तेव्हा उद्घाटन करण्यापूर्वी नितीन गडकरींनी या चौपदरीकरणाची पाहणी केली. त्यानंतर उद्घाटन पर भाषणात त्यांनी ‘खोटे नगर ते फाट्यापर्यंत संपूर्ण ओव्हर ब्रिज करणे आवश्यक आहे. भविष्यात लोकसंख्या वाढल्यानंतर आता केलेले चौपदरीकरण अपुरे पडणार’ असल्याचे स्वतः स्पष्ट केले. ‘खोटे नगर ते तरसोद फाटा या महामार्गाचे योग्य पद्धतीने प्रस्ताव सादर केले असते तर मी त्याला त्याचवेळी मंजुरी दिली असती’ अशा शब्दात त्यांनी जळगावच्या लोकप्रतिनिधी व बांधकाम अधिकाऱ्यांचे कान टोचले. जळगाव जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी अल्पसंतुष्ट आहेत, हेच गडकरींच्या भाषणाने सिद्ध केले. आमचे खासदार आमदारांनी आपले कसब वापरून जी विकासाची कामे करायला हवी, ती का केली जात नाहीत? हा एक गहन प्रश्न आहे. परंतु तुटकुंजा विकासाचे श्रेय घेण्यासाठी मात्र प्रत्येक जण चढाओढ करीत राहतो, हे दुर्दैवाने म्हणावे लागेल. हे सत्य नाकारता येणार नाही. उलट राजकारणातील दोन एकमेकांच्या विरोधात विकास कामांच्या बाबतीत तक्रारी करून होणाऱ्या विकास कामांनाही अडसर निर्माण करतात. परंतु ‘माझ्याजवळ पैशांची कमी नाही. योग्य पद्धतीने रस्त्यांचे प्रस्ताव आपण आणावे, ते रस्ते मी करून द्यायला तयार आहे’, असे वारंवार नितीन गडकरी सांगतात. परंतु त्याचा फायदा घेण्यास आमचे लोकप्रतिनिधी कमी पडतात. त्यामुळे शहरातून जाणारे हे महामार्ग चौपदरीकरण सदोष बनले आहे.
जळगाव महानगरपालिकेच्या कारभारावर एक दृष्टिक्षेप टाकला तर महापालिकेवर निवडून आलेले लोकप्रतिनिधी आणि महापालिकेचे प्रशासकीय अधिकारी यांचे समन्वय नसल्याने गेल्या पंधरा वर्षापासून महापालिकेतर्फे नागरी सुविधा बरोबरच विकासाची कामे खोळंबून पडलेली आहेत. अमृत पाणीपुरवठा योजना आणि मलनीत्सारण योजनेच्या खोदाईमुळे रस्त्याची चाळणी झाल्याने, तसेच महानगरपालिकेकडे पुरेसे उत्पन्न आणि निधी उपलब्ध नसल्याने शहरातील रस्त्यांची कामे कासव गतीने होत आहेत. निधी अभावी रस्त्याची कामे होत नाही हे समजू शकतो, परंतु महापालिका प्रशासनाचे जे नियमित कार्य आहे, ते का केले जात नाही? या प्रश्नाचे उत्तर कोण देईल? शहरातून जाणाऱ्या महामार्गाला दोन्ही बाजूंनी समांतर रस्त्यांसाठी असलेली जमीन अतिक्रमणधारकांनी व्यापून टाकलेली आहे. हे अतिक्रमण काढण्याची जबाबदारी महापालिकेची असताना ती का काढली जात नाही? घोडे कुठे अडवले जाते आहे? ते अतिक्रमण काढले तर समांतर रस्ते होऊ शकतात; अन्यथा शक्य नाही. त्यामुळे आता प्रशासकीय राज असल्याने अतिक्रमणाचा सफाया करून समांतर रस्त्यांचा मार्ग मोकळा करता येऊ शकतो. त्यासाठी पालकमंत्री तसेच लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेणे आवश्यक आहे…!