धरणगावचा पाणी प्रश्न पुन्हा पेटला…!

0

 

लोकशाही संपादकीय लेख

 

पाणीपुरवठा मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मतदारसंघातील धरणगाव या तालुक्याच्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची समस्या अद्यापही मिटलेली नाही. ये रे माझ्या मागल्या या म्हणी प्रमाणे २२ दिवसानंतर धरणगावकरांना पाणी मिळत असल्याने धरणगावकर संताप्त होणे साहजिक आहे. त्यातच महाराष्ट्राचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील हे अख्या महाराष्ट्राच्या जनतेला पिण्याचे पाणी देण्याचे नियोजन करीत असले तरी, आपल्या मतदारसंघातील धरणगावचा पिण्याच्या पाणी प्रश्न सोडवू शकले नसल्याने मतदार संघाचे प्रतिनिधी प्रतिनिधित्व करणारे पाणीपुरवठा मंत्री आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर धरणगावकरांचा रोष असणे साहजिक आहे. गेल्या सुमारे चार वर्षापासून गुलाबराव पाटील यांच्याकडे पाणीपुरवठा खाते आहे. धरणगावचा पिण्याच्या पाणी प्रश्न अचानक उद्भवलेला नाही. चार वर्षांपूर्वी सुद्धा देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळात गुलाबराव पाटील राज्यमंत्री होते. त्यामुळे पाण्यासारखा संवेदनशील प्रश्न ज्या तडफेने सोडवायला हवा होता, त्याकडे पद्धतशीरपणे दुर्लक्ष झाले आहे. ३० जानेवारी २०२३ रोजी धरणगाव शहरातील महिलांच्या मेळाव्यात संबोधन करताना गुलाबराव पाटलांनी आपल्या भगिनींना एक एप्रिल २०२३ पासून दोन दिवसात पाणी पिण्याचे पाणी भेट देण्याची घोषणा केली. एप्रिल महिना संपून मे महिना अर्धा संपत आला. परंतु दोन दिवसाआड पाणी देण्याच्या गोष्टीचे काय झाले? ज्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर मंत्री महोदयांनी घोषणा केली असणार? चुकीची माहिती पुरवणाऱ्या अधिकारी त्यांच्या जबाबदारीतून मुक्त होऊ शकत नाही. अधिकाऱ्यांवर मंत्री महोदयांचा वचक नाही, असेच म्हणावे काय? महाराष्ट्र जीवन प्राधिकरण संस्थेमार्फत धरणगाव शहराला पाईपलाईन टाकण्याचे काम होत आहे. धरणगाव शहराच्या पाणीपुरवठ्याची जबाबदारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडेच आहे. शहरात रस्ते पडून पाईपलाईन टाकण्याचे काम ७० टक्के झाले असून अध्याप ३० टक्के काम बाकी आहे. धरणगाव शहरात जी पाईपलाईन टाकली जातेय त्याच्या दर्जा विषयी शंका कुशंका व्यक्त केल्या जात आहेत. एकतर शहरातील रस्ते फोडले गेले. शहरवासीयांना चालणे मुश्किल झाले आहे. त्याच त्यातच बहुतेक गटारी चोकअप झाल्याने गटारी तुंबल्या आहेत. अशा अवस्थेतून धरणगावकरांवर संकट ओढवले असताना २२ दिवसापासून नळाला पाणी मिळत नसल्याने संतापाची लाट उसळणे शक्य आहे. गेल्या वर्षभरापासून धरणगाव नगरपालिका प्रशासनाच्या ताब्यात आहे. प्रशासनाची शहराच्या संदर्भात जी सतर्कता हवी, ती दिसत नाही. त्यांच्यावर लोकप्रतिनिधींचा जो वाचक हवा तो नाही. १ एप्रिल पासून शहराला दोन दिवसाआड पाणीपुरवठा होईल हे कुठल्या आधारावर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अधिकाऱ्यांनी सांगितले? त्या अधिकाऱ्यांना पालकमंत्र्यांनी जाब विचारायला पाहिजे. नाही तरी जळगाव शहर आणि जिल्ह्यातील विकास कामे वेळेवर पूर्ण होणार नसल्याचा जणू शापच आहे. त्याला जबाबदार आमचे लोकप्रतिनिधी आहेत. धरणगावच्या पाणीपुरवठ्याच्या विलंबाचे कारणही त्याचाच एक भाग आहे, एवढे मात्र निश्चित.

 

धरणगाव शहरात २८ कोटी रुपये खर्चून नवीन पाईपलाईन टाकण्यात येत आहे. दोन दिवसात पाणीपुरवठा शहराला करण्यात यावा म्हणून नव्याने जलकुंभ उभारण्यात आले आहेत. तापी नदीतील धावडा येथे पाणी उपसा करण्यात येतो. तेथून धरणगावला पाणीपुरवठा होतो. तथापि दोन उन्हाळ्यात धावडा येथील तापी नदीतील डोहातील पाणी आटते. त्यामुळे डोहातच पाणी नाही. तर धरणगाव शहरवासीयांना पाणी कुठून मिळणार? धरणगाव शहरासाठी अंजनी नदीवर पिंपरी जवळ एक पाणी उपसा सेंटर आहे. हे दोन्ही उपसा सेंटरमध्ये पाणी कमी असल्याने धरणगाव शहरात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. परंतु पाणी त्यांचाही स्थितीमध्ये ज्या गांभीर्याने आणि संवेदनशीलतेने पाहिले पाहिजे तसे पाहिले गेले नाही. हे दुर्दैवाने मान्य करावे लागेल. पालकमंत्री गुलाबराव पाटील सुद्धा धरणगावच्या पाणीटंचाईकडे दुर्लक्ष का करतात? हे मात्र कळत नाही. त्याचा फायदा विरोधक घेत आहेत. पाणीवाला मंत्री म्हणून ओळख असलेल्या पालकमंत्री गुलाबराव पाटलांवर विरोधक टीका करत आहेत. धावडा पाणी उपसा केंद्र तसेच अंजनी नदीवरील पिंपरी येथील पाणी उपसा केंद्र पाणी कमी असताना शहरातील नादुरुस्त हँड पंप सुरू करण्याच्या दृष्टीने प्रयत्न व्हायला हवे होते. ते का होऊ शकले नाही. याचा जाब मंत्री महोदयांनी अधिकाऱ्यांना विचारायला पाहिजे. मंत्री महोदय याबाबत का कारवाई करत नाहीत? हे मात्र कळायला मार्ग नाही. २०२४ मध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत. ही निवडणूक गुलाबराव पाटलांसाठी सहज सोपी राहणार नाही. त्यातच कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळाच्या निवडणुकीत जळगाव बाजार समितीत महाविकास आघाडीने बहुमत प्राप्त करून गुलाबरावांना धक्का दिला. धरणगाव बाजार समिती सत्ता प्राप्त केली असली तरी गुलाबरांच्या खंदे समर्थकांचा झालेला पराभव त्यांच्या जिव्हारी लागला आहे, यात शंका नाही. त्यामुळे धरणगाव वासियांच्या पाणी टंचाईवर तातडीने उपाययोजना आवश्यक आहे. ट्रॅक्टरने पाणीपुरवठा करून पाणीटंचाई दूर करावी. कारण मे महिन्याचे वाढते तापमान आणि संपूर्ण महिना पाणीटंचाई राहणारच आहे…!

Leave A Reply

Your email address will not be published.