शंभर कोटीच्या निधीच्या चर्चेचे गुऱ्हाळ किती दिवस?

0

 

लोकशाही संपादकीय लेख

 

जळगाव शहराचे आमदार राजू मामा भोळे यांच्या प्रयत्नाने शहराच्या रस्त्यांसाठी शंभर कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला गेला. दोन महिन्यापूर्वी त्याला शासनाने मंजुरी दिली आणि तसे शासनाचे पत्र महापालिकेला प्राप्त झाल्याचे सांगण्यात आले. शहरातील एकूण 23 भागात सिमेंटचे रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने केले जाणार आणि त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मनपाचे सहकार्य घेतले जाणार असे सांगण्यात आले. 100 कोटी रुपये निधी जळगाव शहराच्या रस्त्यासाठी आणण्याचा गाजावाजा आमदार महोदया ंनी पालकमंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन तसेच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचे फोटो टाकून वृत्तपत्रात मोठ मोठ्या जाहिराती प्रसिद्ध करण्यात आल्या. परंतु त्यानंतर प्रत्यक्ष रस्त्याच्या कामाला सुरुवात अद्याप झालेली नाही. परंतु रस्ते सिमेंटचे करायचे की डांबरी यावरच खल सुरू झाला आहे. सिमेंटचे रस्ते करणे शक्य नाही, कारण अद्याप 70 टक्के मलनित्सरण पॉईंट टाकण्याचे काम बाकी आहे. सिमेंटचे रस्ते केले तर ते पुन्हा फोडणे अवघड जाणार. म्हणून डांबरी रस्तेच करायचे असा एक सूर सुरू आहे. तरीसुद्धा घोडे कुठे अडले? हे कळत नाही. दोन महिने झाले कामच सुरू होत नाही. याबाबत काल आमदार राजूमामा भोळे यांनी सांगितले की शंभर कोटी रुपये निधी पैकी 50 कोटी रुपयांचा रस्त्यांच्या कामाचे एस्टिमेट तयार आहे. 50 कोटी रुपयांचे एस्टिमेट नंतर तयार होणार असून आता लवकरच पन्नास कोटी रुपयांच्या रस्त्यांच्या कामाला सुरुवात होणार आहे. पावसाळा तोंडावर आलेला असताना या रस्त्यांच्या कामाची निविदा केव्हा निघेल? आणि त्यानंतर कामाला सुरुवात केव्हा होईल? याची शाश्वती काय? पावसाळ्यात डांबरी रस्ते केले जात नाही. त्यासाठी पुन्हा चार महिन्यांचा ब्रेक पावसामुळे लागेल. तेव्हा पावसाळ्यामुळे रस्त्यांची कामे होणे शक्य नाही. पावसाळ्यानंतर रस्त्याच्या कामाला सुरुवात होईल. जळगाव शहरातील खराब रस्त्यांना कंटाळलेल्या नागरिकांना झुलवत ठेवण्याचा तर हा प्रकार नाही ना? अशा प्रकारची शंका निर्माण होत आहे.

 

काल अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आढावा बैठक झाली आणि शंभर कोटी रुपयांच्या निधीतून रस्त्याच्या कामाला गती देण्याचा निर्णय बैठकीत झाला असे आमदार राजू मामा भोळे यांनी वृत्तपत्रांना माहिती दिली असली तरी प्रत्यक्षात त्या निधीवर रस्त्यांच्या कामाला सुरुवात झाला तो सुदिन म्हणावा लागेल. कारण आतापर्यंत अनेक आश्वासने दिली गेली, परंतु प्रत्यक्षात ती पाळली गेली नाहीत. गेल्या दोन-तीन महिन्यात मागील 43 कोटींच्या निधीतून जे डांबरीकरण रस्ते झाले आहेत त्याबाबत दर्जाच्या बाबतीत रस्त्यांची कामे समाधानकारक नसल्याची ओरड सुरू आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महापालिका यांचे समन्वय नसल्याने रस्त्यांच्या कामाला विलंब होतो आहे. दोन डिपारमेंट मधल्या सामंजस्याअभावी विकासाची कामे रखडून पडत आहेत. त्यासाठी योग्य तो समन्वय घडवून आणण्याची गरज आहे. तसा समन्वय घडवून आणला गेला तरच रस्त्याची कामे योग्य गतीने मार्गी लागतील. अन्यथा इच्छा देवी चौक ते डी मार्ट रस्त्याचे जे झाले तसेच होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तयार करण्यात आलेले सिमेंट रोड ड्रेनेज, नळ कनेक्शन आदींचे कारण देऊन पुन्हा फोडले गेले. त्यामुळे जळगाव शहराच्या खराब रस्त्यांची आज जणू गिनीज बुक मध्ये नोंद होणे बाकी आहे. निवडणुका तोंडावर असल्याने फक्त प्रसिद्धीच्या देखावा केला जातोय. मनपा प्रशासन, लोकनियुक्त नगरसेवक व अधिकारी यांचे योग्य असे समन्वय नाही. महापालिकेत कर्मचाऱ्यांअभावी कामे होण्यास विलंब होत असल्याचे सांगण्यात येते. त्यातच अनेक वर्षापासून एका विभागात कर्मचारी ठाण मांडून बसल्याने कामात निष्काळजी असल्याने त्यांना बदलण्याची मोहीम आयुक्त मॅडम यांनी हातात घेतली आहे. त्यांना त्यात कितपत यश येईल हे दिसेलच…!

Leave A Reply

Your email address will not be published.