कोरोना महामारीची राजकीय धुळवड…!

0

लोकसभा आणि राज्यसभेचे अधिवेशन सध्या सुरू आहे. केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशन असल्याने राष्ट्रपतीच्या अभिभाषणावर अर्थसंकल्प मांडण्यात आला. त्यानंतर अधिवेशनात राष्ट्रपतीच्या अभिभाषणावर चर्चा सुरू झाली. पंतप्रधानांचे राष्ट्रपतीच्या अभिभाषणाला उत्तर देण्याचे भाषण दोन्ही सभागृहात झाले. सुरूवातीला लोकसभेत आणि त्यानंतर राज्यसभेत पंतप्रधान मोदींचे भाषण झाले. दोन्ही सभागृहातील मोदींचे भाषण म्हणजे आतापर्यंतचे पंतप्रधान मोदी यांच्या भाषणाचा घसरलेला स्तर दिसून आला.

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर उत्तर देतांना देशाला उद्देशून देशातील अनेक प्रश्‍नांचा उहापोह करणे अपेक्षित होते. तथापि मोदी यांचे संपूर्ण भाषण महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षावर टीका करण्यात गेले. महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनी मुंबईतील उत्तरप्रदेश आणि बिहारमधून आलेल्या मजुरांना रेल्वेचे मोफत तिकीट काढून मुंबईहून उत्तरप्रदेश आणि बिहारला पाठवल्यामुळे देशात कोरोनाचा प्रसार वाढला. त्याला पूर्णत: महाराष्ट्रातील काँग्रेस नेते जबाबदार असल्याचा आरोप केला. पहिल्या दिवशी लोकसभेत जे भाषण केले त्याचीच रीघ राज्यसभेत पंतप्रधान मोदींनी ओढली. तशाच प्रकारचे भाषण राज्यसभेतही केले.

लोकसभा आणि राज्यसभेतील पंतप्रधानाच्या भाषणानंतर महाराष्ट्रातील विरोधी पक्षात विशेषत: काँग्रेसमध्ये हलकल्लोळ माजला. महाराष्ट्र काँग्रेसच्या वतीने भाजपच्या कार्यालयावर निदर्शने करून निषेध केला. हा तर महाराष्ट्राचा अपमान आहे. अशाप्रकारच्या घोषणांनी गेले दोन दिवस महाराष्ट्र दणाणून गेलाय. लोकसभेत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मोदींच्या भाषणांचा अत्यंत मुद्देसूदपणे खरपूस समाचार घेतला. पत्रकार परिषद घेऊन मोदींवर हल्लाबोल केला. मुंबईतील मजुरांमुळे उत्तरप्रदेश बिहार तसेच देशात कोरोना फैलावला म्हणणाऱ्या पंतप्रधानांनी रेल्वे कुणाच्या अखत्यारीत येते. श्रमिक रेल्वे मुंबई रेल्वे खात्यानी पाठविली ती कशासाठी? लॉकडाऊनमुळे व्यवसाय बंद पडल्याने कामगारांचे हाल होत होते. मुंबईहून पायी आपल्या बिहार – उत्तरप्रदेशातील गावाकडे निघालेल्या मजुरांचे बेहाल होत असतांना श्रमिक रेल्वे पाठविण्याचा निर्णय रेल्वे खात्याने घेतला. त्यात बसून जाण्याची व्यवस्था म्हणजे रेल्वे तिकीटाची व्यवस्थखफा काँग्रेसने केली. त्यात माणुसकी नाही का? याउलट काँग्रेसवर कोरोना प्रसाराचा आरोप करून बदनाम करणे हे पंतप्रधानांनी फक्त उत्तर प्रदेशाच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून केला एवढे मात्र निश्‍चित.

परंतु अशा सवंग आरोपाचा उत्तर प्रदेशातील निवडणुकीवर कसा परिणाम होईल हे निवडणूक निकालातून सिध्द होईलच त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात आगामी होत असलेल्या उत्तरप्रदेशासह पाच राज्यात भाजपाची लाट असून तेथे भाजपच बहुमताने सत्तेवर येईल असे भाकितही पंतप्रधानांनी केले. पंतप्रधानांनी दिल्लीच्या केजरीवाल शासनावरही टीका केली. आपच्या पॉलिसीमुळे कोरोना पसरला. दिल्लीच्या आप शासनावर टीका करण्याचे एकमेव कारण म्हणजे दोन वेळा दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत भाजपने सपशेल मार खाल्ला. केजरीवालने बाजी मारली आणि दिल्लीचे प्रशासनाने आपल्या कामातून जगाचे लक्ष वेधले आहे. त्यामुळे नवी दिल्ली प्रशासनावर मोदींनी केलेली आगपाखड समजू शकतो.

देशात महागाई शिगेला पोहोचलीय. जीवनावश्‍यक वस्तूंचे भाव कडाडले आहेत. सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. त्या संदर्भात पंतप्रधान काही बोलतील, काही निर्णय जाहीर करतील अशी पेक्षा होती. तथापी अपेक्षाभंग झाला. त्यामुळे सध्या होत असलेल्या पाच राज्यांच्या निवडणुका म्हणजे आगामी 2023 साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची रंगीत तालीम आहे. केंद्र शासनाने केलेल्या तीन कृषी कायद्यांना वापस घेऊन शेतकऱ्यांपुढे केंद्र शासन झुकले आहे. त्याचा परिणामसुद्धा सध्या होत असलेल्या पाच राज्यांच्या निवडणुकांवर होणार आहे यात शंका नाही.

जे काही निवडणूक मतदानपूर्व चाचणी रिपोर्ट जाहीर होत आहे. त्यावरून भाजपची दाणादाण उडाल्याचे स्पष्ट दिसून येते आहे. परंतु खरे रिपोर्ट आणि सत्य बातम्या सध्या मिडियातून येत नाहीत. त्याचे कारण मोदींचा मिडियावर असलेला अंकुश हे होय. परंतु सोशल मिडियाने मात्र मोदी मिडियाची धज्जी उडवलेली आहे. मोदींनी काँग्रेस वर आरोप करण्याच्या नादात बिचाऱ्या मजुरांची दाणादाण केलीय. मजूर म्हणताय आम्ही रेल्वेने आमच्या गावी गेलो परंतु तेथे आम्ही सूचनेनुसार 14 दिवस अथवा 21 दिवस होम कोरंटाईन होतो. त्यामुळे आमच्यामुळे कोरोनाचा प्रसार झाला असे म्हणणे हे अत्यंत चुकीचे आहे. मजुरांचा हा पलटवार या निवडणुकीत काय परिणाम करेल हेही दिसून येईल.

Leave A Reply

Your email address will not be published.