ही तर जळगाववासीयांची क्रूर थट्टाच…!

जळगाव (Jalgaon) मुख्य शहराला जोडणारा शिवाजीनगर रेल्वे उड्डाण पूल (Shivajinagar railway flyover). या पुलावरून शिवाजीनगरमध्ये राहणाऱ्या एक लाख लोकांचा शहरात येण्याचा हमरस्ता हा पूल कालबाह्य झाल्याने 3 वर्षापूर्वी नव्या शिवाजीनगर रेल्वे उड्डाण पुलाचा कार्यादेश निघाला. 19 फेब्रुवारी 2019 रोजी काम सुरू झाल्यानंतर दोन वर्षात हा पूल ठेकेदारांनी तयार करायला हवा होता. म्हणजे 19 फेब्रुवारी 2021 ला या पुलावरून वाहतूक सुरू व्हायला हवी. परंतु नकटीच्या लग्नाला सतराशेसाठ विघ्न म्हणतात. या वाक्प्रचाराची प्रचिती आली. पूल कमकुवत आहे म्हणून सहा महिने आधीपासून या पुलावरून मोठ्या वाहनांची वाहतूक बंद करण्यात आली. त्यामुळे शिवाजीनगर तसेच ग्रामीण भागातील या परिसरातून येणारी वाहतूक सुरत रेल्वेगेटकडून वळविण्यात आली. त्यामुळे वाहनधारकांना इंधनाचा खर्च वाढला. तसेच सुरत रेल्वे गेट बंद झाल्यावर वाहतूकीची कोंडी होत असे. उलट वेळ वाया जायचा. त्यानंतर 19 फेब्रुवारी 2019 पासून शिवाजीनगर रेल्वे उड्डाण पुलाच्या कामाला सुरूवात झाल्याने या पुलावरील संपूर्ण वाहतूक बंद करण्यात आल्यापासून ते आज तीन वर्षे पूर्ण झाली शिवाजीनगर वासीयांचे तसेच शहरातून शिवाजीनगरमध्ये जाणाऱ्यांचे हाल होताहेत.

एक वर्षापूर्वी हा पूल बांधून तयार व्हायला हवा. तेव्हा ठेकेदाराने महावितरणचे खांब हलविल्याशिवाय पुलाचे बांधकाम करणे शक्य नाही म्हणून हात वर केले. वास्तविक पूल बांधकामाची निविदा देण्यात आली. त्याचवेळी महावितरणचे पूल हलविण्याची जबाबदारी निश्‍चित व्हायला हवी होती ती झाली नाही. त्यासाठी ठेकेदाराला 6 महिन्याची मुदत वाढवून देण्यात आली. त्यानंतरही काम अपुरे असल्याने पुन्हा 6 महिन्याची मुदत वाढवून दिली गेली. 19 फेब्रुवारी 2022 ला हा पूल पूर्ण तयार होऊन वहातुकीसाठी खुला व्हायला हवा होता. परंतु अद्याप पुलाचे 30 टक्के बांधकाम होणे बाकी असून अजून किमान सहा महिने हा पूल तयार व्हायला लागतील. मेपर्यंत जळगाव शहरवासियांचे हाल होतील त्याची दखल कोण घेतो. आता तर म्हणे वाळू अभावी काम अडून बसले आहे. ठेकेदारांचे हे चोचले कशासाठी पुरविले जातात हे मात्र कळत नाही. शहराचे प्रतिनिधीत्व करणारे आमदार, खासदार, पालकमंत्री तसेच नगरसेवक एवढे उदासिन कशासाठी? त्यांना आपण ज्यांचे प्रतिनिधीत्व करतो, मतावर आपण निवडून येतो. याची जरासुध्दा खंत वाटत नाही. ही चिंतेची बाब असून शहरवासीयांची क्रूर थट्टा चाललीय.

जिल्हाधिकारी अभिजित राऊत दोन वेळा शिवाजीनगर उड्डाण पुलाच्या बांधकाम स्थळी जाऊन पायी पायपीट करून पहाणी केली. दोन वेळा 6-6 महिन्यांची मुद्दतवाढ दिल्यानंतर वेळेत काम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या तरीसुध्दा ठेकेदार श्रीश्री कन्स्ट्रक्शन कंपनीचे संचालक जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनांना केराची टोपली दाखवतात याचे कारण काय ? पाणी कुठे मुरतेय ? आत तर जिल्हाधिकारी संबंधित शासकीय विभागाला पत्र देवून विचारणा केलीय. परंतु त्याचा ठेकेदारावर काहीही परिणाम होत नाही असे दिसते.

शिवाजी नगर पुलाच्या विलंबावर सर्वत्र चर्चेचा विषय बनलाय. अवघे 25 कोटी रुपयांच्या पुलाचे बांधकाम करण्याचा ठेकेदाराला अनुभव नाही काय ? त्यांच्या अनुभवाच्या कमतरतेमुळे त्याला बांधकामाचा अंदाज आला नाही का ? अशा ठेकेदाराला यापुढे काम देतांना दहावेळा विचार व्हायला हवा. किंबहुना अशा ठेकेदाराला काळ्या यादीत टाकायला तशी कारवाई केली तरच इतर ठेकेदारांना त्याचा वचक बसेल. शहरातून जि.प. तहसिल कार्यालय तसेच बळीराम पेठेत जाण्यासाठी दुचाकी धारकांना तारेवरची कसरत होतेय. रेल्वे स्टेशनकडून जि.प.कडे येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांची तीच अवस्था आहे. आधीच शहरातील रस्त्यांचे तीन तेरा झाले असतांना ह्या पुलाचे काम रखडल्याने त्यात आणखी भर पडली.

जळगाव शहरातील नागरिकांची सर्व बाजूने हाल होताहेत. महानगरपालिकेवर सत्तातर झाल्यानंतर नवीन शिवसेनेच्या सत्ताधाऱ्यांकडून फार मोठ्या अपेक्षा वाढल्या होत्या. परंतु त्या अपेक्षांवर पूर्णपणे पाणी फिरतेय. शिवाजी नगर उड्डाण पुलाचे ठेकेदाराकडून होत असलेल्या कामावर सुपर व्हिजन करणारे आमचे बांधकाम विभाग करतेय काय ? त्या विभागाच्या अधिकाऱ्यांनाही ठेकेदाराने गोलमाल केलेय का ? याबाबतीत महानगरपालिका प्रशासनाकडून काही अपेक्षा करणे फोल ठरणार आहे. कारण आधीच ते टक्केवारीच्या फेऱ्यात अडकलेले आहेत. त्यामुळे महापालिका प्रशासन बरबटलेले असेच म्हणावे लागेल.

महापालिकेतील सत्ताधारी नगरसेवक आणि विरोधी नगरसेवक आपसात एकमेकांवर टीका करण्यात मग्न आहेत. त्यामुळे नागरिकांच्या सोयी-सुविधांकडे लक्ष द्यायला त्यांना वेळच नाही. त्यामुळे जळगाव शहराच्या नागरिकांचा कुणी वालीच उरला नाही. शहराचे आमदार वॉर्डातील किरकोळ कामाचे श्रेय घेण्यासाठी धडपड करीत आहेत. उन्हाळ्याला अजून सुरुवात नाही तरी शहरातील सावखेडा परिसरात पिण्याच्या पाण्याची ओरड सुरु झाली. सावखेडा परिसरातील संतप्त महिलांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर हंडा मोर्चा निघाला होता हे कशाचे द्योतक आहे. महानगरपालिका म्हणते वाघूर धरण शहराला दोन वर्षे पुरेल एवढा पाणी साठा आहे. त्यामुळे जळगावकरांना पिण्याच्या पाण्याची चिंता नाही असे सांगितले जाते. तेव्हा पाणी टंचाई कशी ? पाणी वितरण व्यवस्था सुधारण्याची गरज आहे. ती सुधारणार केव्हा?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here