कोरोना साथ रोगानंतरचा विजयादशमीचा उत्साह

0

लोकशाही संपादकीय लेख 

गेले दोन वर्ष कोरोना महामारीमुळे सर्व धर्मीयांचे सण साजरे करण्यावर मर्यादा आलेली होती. किंबहुना सामूहिकरित्या सण साजरे करण्यावर बंदीच घालण्यात आली होती. कोरोना साथ रोगाचा मुकाबला करण्यासाठी देशात महाराष्ट्रात तसेच जळगाव जिल्ह्यातील सर्व धर्मीयांनी संयमीपणे सण उत्सव साजरे केले. त्यामुळे कोरोनाचा मुकाबला करून कोरोनाला हद्दपार करण्यात यश मिळाले. याबद्दल सर्व धर्मियांचे मनःपूर्वक अभिनंदन केले पाहिजे.

कोरोनाच्या नियंत्रणासाठी प्रशासनाने ज्या सूचना जे आदेश पारित केले त्यांचे तंतोतंत नागरिकांकडून पालन करण्यात आले. मुस्लिम बांधवांनी रमजान रोजी घरातच साजरे केली. रमजानची नमाज सामूहिक रित्या दर्ग्यावर अथवा मशिदीमध्ये साजरी करण्याऐवजी प्रत्येकाने आपापल्या घरातच कुटुंबा समवेत रमजान ईदचे नमाज पठण केले आणि कुटुंबात रमजान ईद साजरी करून सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले.

त्याचप्रमाणे हिंदू समाजाचे दसरा दिवाळीचे सण-उत्सव सामूहिक रित्या अथवा धुमधडाक्यात साजरे करण्याचा मोह टाळला. दसऱ्याला सामूहिकपणे रावण दहन केले जाते. परंतु सामूहिकपणे रावण दहन साजरा केला गेला नाही. दिवाळीत फटाक्यांचा सामूहिक जल्लोष झाला नाही. गणेशोत्सवात सामूहिक गणेशोत्सव साजरा करण्याचे बंधन पाळले गेले. घरी बसवण्यात येणाऱ्या मूर्तीची उंची किती असावी, तसेच सामूहिक ठिकाणी बसवण्यात येणाऱ्या मंडळाच्या मूर्तीची उंची किती असावी, मंडळाचे ठिकाणी होणाऱ्या भाविकांच्या गर्दीची मर्यादा पाहून सोशल डिस्टेंसिंगचे पालन केले गेले. धार्मिक सण उत्सव साजरी करताना सर्व धर्मीयांनी नियमांचे पालन केले.

प्रशासनाने दिलेल्या सूचना पाळल्या. त्यामुळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला पराभूत करण्यास यश आले. त्याचे सर्व श्रेय सर्वधमीयांच्या नागरिकांना दिले पाहिजे. तसेच प्रशासनाच्या वतीने जिल्ह्यात योग्यरीत्या प्रशासन हाताळले. त्यात जळगाव जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय यंत्रणांनी संयमाने प्रशासन हाताळले. सुरुवातीला कोरोनाची पहिली लाट आली तेव्हा प्रशासनाची सुद्धा धांदल उडाली होती. अचानकपणे आरोग्य यंत्रणेवर ताण पडल्याने कोरोना रोगांच्या उपचारात गोंधळ उडाला. दवाखाने हाउसफुल झाले. घरात एकाला कोरोनाची लागण झाली की लगेच उपचारासाठी कुटुंबातही गोंधळ उडाला.

यावेळी लॉकडाऊन घोषित झाल्यामुळे मजूर वर्ग आणि हातावर पोट असलेल्यांचे हाल होत असल्याचे पाहून अनेक सामाजिक संस्था, सामाजिक कार्यकर्ते मदतीला धावून आले. त्यांच्या जेवणाची निशुल्क व्यवस्था केली गेली. अनेकांनी गोरगरिबांना किराणाखीचे वाटप केले. कोरोनाच्या लॉकडाऊन काळातील ही घटना कोणीही विसरू शकणार नाही. पोलीस यंत्रणेवर 24 तास ड्युटीचा ताण पडला. काही पोलीस कर्मचारी अधिकारी कोरोनाचे बळी ठरले. काही डॉक्टर आणि काही परिचारिकांना सुद्धा करोनाने ग्रासले. एकंदरीत नको ते दिवस असे म्हणावे लागले. परंतु या बाबींना जनतेने खंबीरपणे साथ देऊन त्याला हद्दपार केले. आता कोरोना मुक्त झाला असला तरी केव्हाही डोके वर काढणार नाही, याची काळजी घेऊन दसरा हा सण उत्सवात साजरा करून भारतीय संस्कृतीचे जतन करा.

यंदाच्या गणेशोत्सव सुद्धा उत्साहात व शांततेत साजरा झाला. भाविकांमध्ये जल्लोष होता. दहीहंडीच्या उत्सवात सुद्धा सर्व मोठ्या प्रमाणात सहभागी झाले. मुंबईसारख्या ठिकाणी दहीहंडी उत्सवाचा युवकांमध्ये उत्साह संचारलेला असतो. दस्तूर खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दहीहंडीच्या गोविंदाच्या दही हंडीला खेळाचा दर्जा दिला. त्यामुळे दहीहंडी फोडणाऱ्या गोविंदांना नोकरीत पाच टक्के आरक्षण दिले जाईल, याची घोषणा मुख्यमंत्री शिंदे यांनी केली. दहीहंडी फोडताना जे गोविंदा अपघात होऊन जखमी होतील, तसेच दुर्दैवाने यांचा मृत्यू होईल अशा गोविंदांना विमाचे संरक्षण दिले असल्याची घोषणा केली. अर्थात सर्वत्र लोकप्रियता मिळवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घाईघाईने घोषणा केल्या असतील तरी महाराष्ट्राची विशेष मराठी अस्मिता आणि संस्कृती जपण्याचा त्यांचा हेतू चांगला आहे, असेच म्हणावे लागेल.

दसऱ्याला जळगाव जिल्ह्यात गेल्या दोन वर्षात सामूहिक रावण दहन केले गेले नाही. तथापि यंदा 50 फुटी रावण दहनाचा सामुहिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला. एकंदरीत विजयादशमी सणाचा उत्सवही भाविकांमध्ये संचारलेला दिसून येतो आहे. ही चांगली गोष्ट आहे. तरीसुद्धा रावणाचे दहन का करतो यामागे हेतू समजून घ्यावा. जे जे अमंगल, जे जे असुर आहे त्यांचे दहन रावण रुपी पुतळा जाळून करण्यात येते. आणि जे जे मंगल आहे, त्याचा आपण स्वीकार करावा. म्हणजे असुराचा वध करून मंगलमय वातावरणाची निर्मिती करावी ही यामागे धारणा असून विजयादशमीच्या सर्वांना दैनिक लोकशाहीच्या वतीने हार्दिक शुभेच्छा.

Leave A Reply

Your email address will not be published.