मधुकर साखर कारखान्याची अखेर बँकेकडून विक्री

0

लोकशाही संपादकीय लेख

42 वर्षांपूर्वी सहकारी तत्त्वावर ऊस उत्पादन शेतकऱ्यांच्या मालकीच्या स्थापन झालेल्या कारखान्याची जिल्हा सहकारी बँकेने खाजगी मालकाला विक्री केली. 42 वर्षानंतर अखेर ऊस उत्पादक शेतकऱ्यांची मालकी संपुष्टात आली. माजी मंत्री मधुकरराव चौधरी आणि माजी मंत्री सहकार महर्षी जे डी महाजन यांच्या प्रयत्नाने स्थापन झालेला कारखाना गेल्या दोन वर्षापासून डबघाईला आला आणि बंद पडला. जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सत्तर कोटी कर्ज थकले. त्यामुळे बँकेने सदर कारखान्याला कर्ज पुरवठा बंद केल्याने कारखान्याचे उत्पादन करणे संचालक मंडळाला शक्य झाले नाही. त्यातच जिल्हा बँकेने आपले सत्तर कोटी कर्ज मिळवण्यासाठी त्या कोर्टामार्फत ताब्यात घेतल्या. त्यानंतर सदर साखर कारखाना शेतकरी हितासाठी बँकेने भाडेतत्त्वावर चालवण्यास द्यावा, अशी संचालक मंडळाकडून वारंवार मागणी केली गेली. जिल्हा सहकारी बँक ही शेतकऱ्यांचे हित जपणारी बँक असल्यामुळे बँकेतर्फे हा कारखाना भाडेतत्त्वावर चालवण्यास देण्याच्या संचालक मंडळातील काही संचालक मंडळाचे सदस्य मनस्थितीत होते.

बँकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर सुद्धा त्या मताचे होते. परंतु जिल्हा बँक शेतकऱ्यांची बँक म्हणून ओळखली जात असली तरी बँकेचा व्यवसाय शेतकऱ्यांच्या कर्जाशी निगडित आहे. भाडेतत्त्वावर देऊन त्याचे व्यवस्थापन पहाणे शक्य नाही. त्यामुळे बँकेने बँकेचे कार्य करावे, इतर भानगडीत पडू नये. म्हणून संचालक मंडळात या मुद्द्यावरून दोन गट पडले. त्यामुळे बँकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकरांसह सर्व संचालक मंडळाच्या सदस्यांनी कारखान्याची विक्री करून आपले कर्जाचे पैसे परत मिळावे, असा निर्णय घेतला. त्यानंतर पहिल्यांदा मधुकर सहकारी साखर कारखाना विक्रीसाठी ऑनलाईन निविदा काढली. परंतु पहिल्यांदा निवेदला प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर दुसऱ्यांदा काढलेल्या निविदानंतर कारखान्याची विक्री करण्यात आली. त्यामुळे कारखान्याची विक्री करायची की भाडेतत्त्वावर द्यायचे यावर पडदा पडला. अखेर मधुकर सहकारी साखर कारखान्याची मशिनरीसह 27 हेक्टर जमिनीची विक्री केली गेली बाकी 27 हेक्टर जमीन कारखाना मालकीची बाकी असून आता त्या जमिनीची विल्हेवाट कशी लागेल हे लवकरच कळेल.

जळगाव जिल्हा हा सहकार क्षेत्राचा एकेकाळी बालेकिल्ला होता. शंभर वर्षे जुनी असलेले जिल्हा मध्यवर्ती बँक. दगडी बँक म्हणून या बँकेची ओळख. जिल्ह्यातील सहकारी संस्थांच्या अथवा प्रकल्पाच्या ठेवी या ठिकाणी जिल्हा बँकेत असल्याने आर्थिक दृष्ट्या सक्षम अशी बँक म्हणून तिच्याकडे पाहिले जायचे. परंतु मध्यंतरीच्या काळात सदर जिल्हा बँक सुद्धा डबघाईचा सामना करीत होती. आता कुठेतरी नफ्याकडे वाटचाल करते आहे. त्यामुळे मधुकर सहकारी साखर कारखाना जे टी महाजन सहकारी सूतगिरणीची विक्री करून कर्जाची रक्कम बँकेला मिळाल्याने ती नफ्याकडे वाटचाल करत आहे. म्हणून बँकेने मधुकर सहकारी साखर कारखान्याला आणि जे टी महाजन सूतगिरणी विक्रीतून कर्जाची रक्कम मिळाल्याने बँक नफ्यात आलेली आहे. त्यामुळे जिल्हा बँकेने घेतलेला कारखाना विक्रीचा निर्णय शहाणपणाचा होता, असे म्हणता येईल.

एकंदरीत जळगाव व जिल्ह्यातील सहकारी सहकार क्षेत्रात मात्र मोडीत निघाली. त्याचे एकमेव कारण म्हणजे मिस मॅनेजमेंट हेच होय. हेच एकमेव कारण म्हणता येईल. त्याचबरोबर सहकार संदर्भात शासनाचे धोरण त्याला काहीअंशी जबाबदार आहे. जिल्ह्यात सहकार क्षेत्रात एकूण सहा साखर कारखाने उभारण्यात आले. सहापैकी आज एकही साखर कारखाना सहकारी तत्त्वावर चालू नाही. चाळीसगावला बेलगंगा, कासोदा येथील वसंत सहकारी साखर कारखाना, फैजपूर येथील मधुकर सहकारी साखर कारखाना, चोपडा सहकारी साखर कारखाना, मुक्ताईनगर येथील मुक्ताई आणि रावेर येथील श्री क्षेत्र ओंकारेश्वर सहकारी साखर कारखाना हे सर्व सहकारी तत्त्वावर उत्पादक सभासदांची मालकी असलेले कारखाने आज खाजगी कंपन्यांच्या मालकीचे बनले आहेत.

जिल्ह्यातील सहकारी सूत गिरण्यांपैकी फक्त चोपडा सहकारी सूतगिरणी सहकार तत्त्वावर चालू आहे. बाकी सर्व सूतगिरण्यांचे दिवाळी निघाले आहे. जिल्ह्यात ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक चित्र कारखान्यामुळे बदलून जाईल, ही अपेक्षा मात्र फोल ठरली. ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे येरे माझ्या मागल्या आहे. तेच जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था झाली आहे. सहकार क्षेत्रात सूतगिरणीचे दिवाळी निघाले. चोपडा येथील सूतगिरणी माजी आमदार कैलास बापू यांच्या नेतृत्वात व्यवस्थित चालू आहे. तसेच मुक्ताईनगर येथील सूतगिरणी अजून नवीन असल्यामुळे त्याबाबत काही भविष्यवाणी वर्तवणे योग्य होणार नाही. तथापि एकनाथराव खडसे यांना सहकारचा दांडगा अनुभव असल्यामुळे त्या सूतगिरणीला भवितव्य चांगले आहे असे म्हणता येईल.

जिल्ह्यात सहकारी पतसंस्थांचे फार मोठे जाळे होते. परंतु दशकात या सहकारी पतसंस्थांचे दिवाळी निघालेले दिसते. अनेक ठेवीदारांच्या ठेवी बुडाल्या. सध्या कोर्ट-कचेऱ्यांचे थेटे ठेवीदार मारत आहेत. परंतु चुकीच्या आणि स्वार्थी व्यवस्थापनामुळे यांचे दिवाळी निघाले. एकंदरीत सहकाराचे जिल्ह्यातील अस्तित्व जणू संपुष्टात आले आहे. 42 वर्षांपूर्वी स्वर्गीय मधुकरराव चौधरी आणि सहकार महर्षी जे टी महाजन यांनी रावेर यावल तालुक्यात ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी उभारलेला सहकार क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या मालकीचा साखर कारखाना मात्र खाजगी व्यक्तीच्या कब्जात गेला आहे, हे दुर्दैवी म्हणता येईल.

Leave A Reply

Your email address will not be published.