Friday, August 12, 2022

भाजपने एका दगडात मारले अनेक पक्षी..!

- Advertisement -

महाराष्ट्रातील तीन पक्षांचे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार काल कोसळले. आघाडी सरकार अल्पमतात आल्यानंतर विधिमंडळात विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जाण्याऐवजी उद्धव ठाकरे यांनी मुख्य मुख्यमंत्री पदाचा राजीनामा कालच दिला. त्यानंतर भाजप आणि शिंदे गटातर्फे सरकार स्थापन करण्याच्या जोरदार हालचाली सुरू झाल्या. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल यांची भेट घेऊन सरकार स्थापन करण्याबाबतचे पत्र दिले. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर शिंदे यांच्या उपस्थितीत फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली, आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपदी शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे हे राहतील आणि त्याला भाजपचा पाठिंबा राहील, सोबत देवेंद्र फडणवीस हे मंत्रिमंडळात सामील न होता बाहेर राहून सरकारवर नियंत्रण ठेवतील, असे सांगितले.

- Advertisement -

सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देणारा भाजपचा हा निर्णय म्हणजे शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून पाय उतार करून एका सर्वसामान्य शिवसैनिकाला भाजपतर्फे मुख्यमंत्री करून शिवसेनेला पर्यायाने उद्धव ठाकरेंना पहिला धक्का दिला. त्यानंतर हिंदुत्वाच्या विचारापासून दूर असलेले अथवा हिंदुत्वाला विरोध करणाऱ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीला या निर्णयाने सत्तेपासून खाली खेचले. सत्ता त्यांच्या हातातून हिरावून घेतली, हा काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दुसरा धक्का दिला. त्याचबरोबर महाविकास आघाडी सरकारचे किंग मेकर असलेले राष्ट्रवादीचे सर्वसर्वा शरद पवार यांना यानिमित्ताने तिसरा धक्का दिला. माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदापासून दूर ठेवून फडणवीस यांनीही भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने एक प्रकारे धक्काच दिला.

- Advertisement -

- Advertisement -

देवेंद्र फडणवीस सरकार मध्ये म्हणजे मंत्रिमंडळात सामील न होता मंत्रिमंडळाबाहेर राहून शिंदे सरकारवर नियंत्रण ठेवतील, असे खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांना सांगितले होते. तथापि काही वेळातच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांना एकनाथ शिंदे सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून सामील होण्यास संमती दिली. म्हणून जे पी नड्डा आणि अमित शहा यांचेकडून चक्रे फिरली आणि देवेंद्र फडणवीस यांना एकनाथ शिंदे सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून सामील होण्यास संमती दिली. म्हणून जेपी नड्डा आणि अमित शहा यांचे देवेंद्र फडणवीस यांनी आभार मानले. या सर्व घटना झपाट्याने आणि आश्चर्यकारक रित्या घडल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकटेच मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील असे खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले असले तरी राजभवनात मुख्यमंत्री शिंदे यांच्या समावेत देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.

देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी हा अनपेक्षित होता. संपूर्ण महाराष्ट्र या शपथविधीकडे दूरदर्शनवर आवाक होऊन पाहत होता. कारण ‘मी पुन्हा येईन.., पुन्हा येईन..’ असे म्हणणारे देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा येण्याची संधी मिळाली होती. त्यांचे स्वप्न साकार होणार होते; परंतु फडणवीस यांचे हे स्वप्न भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने पूर्ण होऊ दिले नाही. यामागे नेमके कारण काय ? या मागचे राजकीय गणित काय असावे ? भाजपचा हा निर्णय यशस्वी होईल काय ? हे आगामी काळच ठरवेल. परंतु केंद्रीय नेतृत्वाला देवेंद्र फडणवीस डोईजड होत होते, म्हणून त्यांना धक्का दिला गेला काय, असे अनेक तर्कवितर्क सध्या लढविले जात आहेत. हा निर्णय भाजपने महाराष्ट्राच्या हितासाठी घेतला, असे भाजप गोटातून सांगण्यात आले.

एकनाथ शिंदे यांचे सरकार दोन-अडीच वर्षे अजून सत्तेत राहील. दरम्यान महाराष्ट्रातील स्थानिक संस्थांच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत. विशेषतः मुंबई महानगरपालिका काबीज करणे, भाजपच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणार आहे. गेल्या पंचवीस वर्षापासून मुंबई महानगरपालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे. शिवसेनेच्या दृष्टीने मुंबई महानगरपालिका म्हणजे ‘सोने की चिडिया’ आहे असे म्हटले जाते. ती मुंबई महापालिका भाजपतर्फे काबीज करण्याचा प्रयत्न होईल आणि आता हे शक्य होणार आहे. कारण पाच वर्षांपूर्वी शिवसेना आणि भाजप तर्फे स्वतंत्रपणे महानगरपालिकेची निवडणूक लढवली होती. तेव्हा शिवसेनेचे 84 तर भाजपचे 82 नगरसेवक निवडून आले होते. आता तर मुंबईतील शिवसेनेचे काही आमदार, नगरसेवक शिंदे गटात सामील झालेले आहेत. त्यामुळे मुंबई महापालिकेची निवडणूक आता भाजपसाठी सोयीची झालेली आहे. मुंबई महापालिका शिवसेनेच्या ताब्यातून काढून घेतली की, शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसणार आहे. ठाणे महानगरपालिकेतील शिवसेनेचे नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी उभे आहेत. त्यामुळे ठाणे महापालिका सुद्धा उद्धव ठाकरेंच्या हातातून सुटणार आहे. हा ही एक धक्काच म्हणता येईल.

आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ढवळून निघणार आहेत. विस्कळीत झालेल्या शिवसेनेतील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकांत  फार मोठी कसरत करावी लागणार आहे. एकंदरीत महाराष्ट्र सारखे पुरोगामी विकसित राज्य विरोधकांच्या हातून हिसकावून घेतल्याने विरोधकांना मोठा धक्का बसला आहे. भाजपने एका दगडात अनेक पक्षी मारले. शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाच्या नावाची घोषणा करताना अथवा उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेताना देवेंद्र फडणवीस यांचा चेहरा पडलेला होता. त्यांच्या बॉडी लँग्वेज वरून ते खुश दिसत नव्हते. मूळ देवेंद्र फडणवीस यांचा जोश दिसून येत नव्हता. यावरून भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाच्या या निर्णयावर देवेंद्र फडणवीस समाधानी असल्याचे दिसत नव्हते. परंतु भाजपच्या या निर्णयावर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया कळली नाही. त्यांची प्रतिक्रिया सुद्धा महत्त्वाची म्हणता येईल.

असो… मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या जोडीचे अभिनंदन.. आणि आगामी कार्यासाठी दैनिक लोकशाहीच्या वतीने हार्दिक शुभेच्छा…!

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या