जिल्ह्यातील शिवसेना आमदारांचा भ्रमनिरास

0

महाविकास आघाडीतील शिवसेनेचे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी 20 तारखेला सेनेशी बंडखोरी करून काही चौदा-पंधरा आमदारांसह सुरत गाठले. तेव्हा सर्वप्रथम जळगाव जिल्ह्यातील पाचोराचे आमदार किशोर आप्पा पाटील हे नॉटरिचेबल झाले. त्या पाठोपाठ पारोळ्याचे आमदार चिमणराव पाटील हे नॉटरिचेबल झाले. हे दोन्ही शिवसेनेच्या आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्यावर आपली निष्ठा व्यक्त केली. त्या वेळी जिल्ह्याचे पालकमंत्री आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील हे मात्र मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे समवेत बैठकीत सामील होते. परंतु चोपड्याच्या आमदार लता सोनवणे या सुद्धा नॉटरिचेबल झाल्या. तथापि त्या त्यांच्यावरील कोर्ट कारवाईमुळे त्या दिल्लीत गेल्या असल्याचे सांगण्यात येत होते. हे चार मंत्री शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आले असल्याने ते शिवसेनेचे आमदार म्हणून त्यांच्यावर शिक्कामोर्तब झाला आहे.

मात्र मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील हे अपक्ष म्हणून निवडून आले असले तरी ते महाविकासआघाडी शिवसेनेचे सहयोगी सदस्य बनले होते, आणि गेले काही वर्ष जळगाव जिल्ह्यात शिवसेना प्रमुख म्हणून काम केल्याने ते अपक्ष असले तरी स्वतः शिवसैनिक म्हणूनच वावरत होते. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर दोन दिवस त्यांनी वेट अँड वॉच भूमिका घेतली. पालक मंत्री गुलाबराव पाटील सुरत मार्गे स्वतंत्र चार्टड प्लेनने गुवाहाटीत पोचल्याची बातमी आली, आणि चंद्रकांत पाटील सुद्धा नॉटरिचेबल झाले. दुसऱ्या दिवशी त्यांनी सुद्धा उद्धव ठाकरे यांना ‘मुंबईत येतो’ असे सांगून ते ठाकरेंकडे न पोहोचता गुवाहाटीत शिंदे यांच्या गटात सामील झाले. म्हणजे चंद्रकांत पाटील कायदेशीर रित्या शिवसेनेचे आमदार नसले तरी अपक्ष आमदार म्हणून उद्धव ठाकरे यांची साथ सोडून शिंदेंसोबत गेले.

एकंदरीत जिल्ह्यातील अधिकृत शिवसेनेचे असलेले चार आमदार आणि अपक्ष असले तरी स्वतः शिवसेनेचे शिवसैनिक म्हणणारे चंद्रकांत पाटील हे पाचवे आमदार उद्धव ठाकरे यांची शिवसेना सोडून शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल झाले. त्यामुळे गेल्या आठ दिवसांपासून पालकमंत्र्यांसह हे पाचही आमदार आपल्या मतदार संघाला सोडून आसामच्या गुवाहाटी येथील रेसिडेन्शिअल ब्ल्यू या पंचतारांकित हॉटेलमध्ये बसलेले आहेत. आजपर्यंत त्यांच्या जवळून त्यांचे मोबाईल फोन सुद्धा शिंदे यांनी काढून घेतल्याने त्यांचा आपल्या आमदार संघाशी संपर्क ही नव्हता.

एकनाथ शिंदे यांच्या बंडात सर्वप्रथम सामील झालेले पाचोऱ्याचे आमदार किशोर आप्पा पाटील यांचा सुरतमध्ये शिंदे गटात फोटो झळकला. त्यानंतर लगेच जळगाव जिल्ह्यात विशेषतः पाचोरा भडगाव या त्यांच्या मतदारसंघात आमदार किशोर आप्पा यांचे नव्या मंत्रिमंडळात मंत्री होणार अशी चर्चा सुरू झाली. बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या पाचोरा कनेक्शन बाबतही चर्चेला ऊत आला. आपला नवस फेडण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी पाचोऱ्यात गुप्त दौरा केला होता. त्यावेळी आमदार किशोर पाटील यांनी शिंदे यांचे स्वागत केले होते आणि पूर्व दौऱ्यात ते त्यांच्या सोबत होते. त्यानंतर नगर विकास खात्याच्या वतीने पाचोरा नगरपालिकेला भरभरून विकास निधी दिला गेला, हे सर्वश्रुत आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांचे आमदार किशोर पाटील समर्थक बनले होते. त्यामुळे शिंदे यांच्या बंडानंतर सर्वप्रथम सामील झाल्यानंतर किशोर आप्पा मंत्री होणाऱ्या वावड्या उठल्या.

तथापि त्यांचे पाठोपाठ पारोळ्याचे आमदार चिमणराव पाटील हेही उघडपणे शिंदेच्या बंडात सामील झाले. चिमणराव पाटील आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे शिवसेनेचे मतभेद होते याची जिल्ह्यात सर्वांना कल्पना असल्याने आणि ते एक सीनियर आमदार असल्याने चिमणराव पाटील आणि किशोर आप्पा पाटील हे त्यांचे मंत्री होणार अशा वावड्या उठविण्यात आल्या. या वावड्यामुळे पाचोरा भडगाव आणि एरंडोल पारोळा मतदार संघातील मतदारांमध्ये एक वेगळेच उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. परंतु हा त्यांचा उत्साह तात्पुरता ठरला कारण त्यानंतर दस्तुरखुद्द पालक मंत्री गुलाबराव पाटील हे स्वतः साक्रीच्या अपक्ष आमदार मंजुळाबाई गावित यांना घेऊन गुवाहाटीच्या रेसिडेंट हॉटेलमध्ये शिंदे गटात सामील झाले. गुलाबराव पाटील एकनाथ शिंदे यांच्या बंडात  सामील होतील असे जिल्ह्यातील नागरिकांना स्वप्नातही वाटले नव्हते.

परंतु माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा संदेश घेऊन चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण गुलाबराव पाटलांच्या बंगल्यावर पोहोचले आणि त्या तातडीने गुलाबराव पाटलांचे मनपरिवर्तन झाले. देवेंद्र फडणवीस आणि गुलाबराव पाटील यांची मैत्री सर्वश्रुत आहे. महा विकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर नव्या मंत्रिमंडळात गुलाबराव हे मंत्रिपदावर कायम राहतील, असे आश्वासन फडणवीसांकडून मिळाल्याचे सुत्रांकडून कळते. त्यामुळे गुलाबराव पाटलांच्या शिंदे गटातील एन्ट्रीमुळे आमदार किशोर आप्पा आणि चिमणराव पाटील यांचा भ्रमनिरास झाला असणार, हे सिद्ध करण्याची गरज नाही. परंतु शिंदे गटाचा प्रवास सुद्धा खडतर असून कायद्याच्या कचाट्यात सापडला आहे. त्यामुळे मंत्री पदाची स्वप्ने पाहणाऱ्या जिल्ह्यातील काही आमदारांचा भ्रमनिरास होईल अशी शक्यता निर्माण झाली आहे. त्याचबरोबर गुलाबराव पाटील आणि किशोर आप्पा पाटील यांच्या मतदार संघातील शिवसैनिकांची आक्रमकता त्यांना भोवणार आहे.

आता नव्या शिवसैनिकांना संधी मिळणार असल्याने त्यांच्या जोशही वाढलेला आहे. एकनाथ शिंदे यांचे बंड फसले तर स्वतःला शिवसैनिक म्हणणारे आमदार चंद्रकांत पाटील यांची सुद्धा उद्धव ठाकरे यांच्या जवळची पत उरणार नाही. आपल्या मुक्ताईनगर मतदारसंघातील भाजपचे सहकार्य मिळवण्यासाठी त्यांनी केलेली ही धडपड त्यांचे आगामी भवितव्य ठरवणार आहे. चोपड्याचे आमदार लता सोनवणे यांच्या बंडा विषयी घेतलेली भूमिका त्यांचे पती माजी आमदार चंद्रकांत पाटील हेच खरे सूत्रधार आहेत. त्यामुळे संधी मिळेल त्या गटात जाऊन फायदा कसा मिळेल हे ते पाहतात. परंतु आगामी निवडणुकीत त्यांची दंडेलशाही मतदारसंघात कुचकामी ठरेल, असे आज तरी चित्र दिसून येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.