वाढदिवस सोहळ्यातील शक्तिप्रदर्शनाचा अन्वयार्थ

0

महाविकास आघाडी सरकारमधील पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा वाढदिवस मोठ्या प्रमाणात साजरा झाला. दिनांक 5 जून रोजी दिवसभर त्यांना शुभेच्छा देण्यासाठी जिल्हाभरातून पाळधी येथे शुभेच्छुकांची रांग लागली होती. त्यानंतर सायंकाळी पाळधीत झालेल्या अभिष्टचिंतन सोहळ्याला प्रचंड गर्दी उसळली होती. ही गर्दी पाहून गुलाबराव भारावून गेले होते. सत्कार सोहळ्यामध्ये गुलाबराव पाटलांवर स्तुतीसुमने वाहणारी भाषणे झाली. त्यानंतर सत्काराला उत्तर देताना खान्देशची मुलुख मैदान तोफ कशी धडाडणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होते.

जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून गेल्या अडीच पावणेतीन वर्षात केलेली कामे, आतापर्यंतच्या पालकमंत्र्यांनी केलेल्या कामाची तुलना गुलाबरावांनी केली आणि आपले काम कसे सरस आहे हे स्पष्ट केले. मग निम्न तापी प्रकरण प्रकल्पासाठी 400 कोटी रुपये आज पर्यंत कोणत्याच पालकमंत्र्यांनी मंजूर केले नाही, जिल्ह्यातील 500 जिल्हा परिषद शाळांना वॉल कंपाऊंड बांधून देण्याचे काम आतापर्यंत कोणीच केले नाही, ते गुलाब रावांनी केले. जळगाव महानगरपालिकेसाठी 125 कोटी रुपयांचा विकास निधी मंजूर केल्याचे त्यांनी सांगून जिल्हा नियोजन आणि विकास मंडळामार्फत जळगाव जिल्ह्यातील शेतीसाठी सर्वाधिक ट्रांसफार्मरसाठी निधी देण्याचे काम गेल्या अडीच वर्षाच्या कालावधीत झाल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच पाणी पुरवठा मंत्री म्हणून येत्या वर्षभरात बिसलरीचे स्वच्छ पिण्याचे पाणी देण्याचा संकल्प असल्याचे गुलाबराव यांनी सांगितले; आणि ते नाही दिले तर मी राजीनामा देईल, असे सांगतात उपस्थितांकडून टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत झाले. त्याच बरोबर स्वतःच्या मतदारसंघातील धरणगाव या तालुक्यातील ठिकाणी सध्या दहा दिवसाला पाणी दिले जात आहे, याची प्रामाणिक कबुली दिली. अभिष्टचिंतन सोहळ्यासाठी झालेली गर्दी ही तीस वर्षाच्या माझ्या राजकीय तपश्चर्येचे फळ असल्याचेही गुलाबराव पाटील यांनी मान्य केले. त्याच बरोबर एक टपरीवाला ते आमदार, राज्यमंत्री आणि आता कॅबिनेट मंत्री पदाच्या दर्जापर्यंत पद मिळावे, त्याचे श्रेय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे असल्याचे त्यांनी सांगितले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी हे शक्तिप्रदर्शन आवश्यकही आहे.

गुलाबराव पाटील हे फर्डे वक्ते आहेत. मुंबईच्या शिवतीर्थ मैदानावर कै. बाळासाहेब ठाकरे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणाआधी गुलाबराव यांनी आपल्या भाषणांनी उपस्थित शिवसैनिकांची मने जिंकली आहेत. परंतु त्या मानाने पाळधी येथे काल त्यांच्या वाढदिवसानिमित्त जे भाषण झाले ते तितकेसे प्रभावी झालेले नाही. ते त्यांच्या विधानसभा मतदारसंघात चार वेळा निवडून आले. एक वेळा पराभूत झाले याचा लेखाजोखा मांडला. त्याचबरोबर पहिल्यांदा विधानसभेची निवडणूक जिंकणे सोपे असते, दुसऱ्यांदा निवडून येणे थोडं कठीण असते, तिसऱ्यांदा निवडून येणे त्यापेक्षा कठीण असते आणि चौथ्यांदा निवडून येणे महाकठीण असते, हे गुलाबराव यांनी उपस्थित गर्दी समोर का सांगितले? हे मात्र कळायला मार्ग नाही.

परंतु आगामी निवडणुकीत त्यांना प्रतिस्पर्धी उमेदवाराची भीती वाटते काय? अशी पाल अनेकांच्या मनात चुकचुकली. कारण मधल्या काळात पाच वर्ष आमदारकी नसताना त्यांचे प्रतिस्पर्धी तत्कालीन राज्यमंत्री व पालकमंत्री गुलाबराव देवकर यांनी केलेली विकास कामे अद्याप मतदार संघातील जनता विसरलेली नाही. त्यामुळे गुलाबराव पाटलांना गुलाबराव देवकर यांची भीती वाटते काय ? असाही प्रश्न उपस्थित होतो. अभिष्टचिंतन सोहळ्याच्या झालेल्या गर्दीत शिवसेनेचे दर्दी किती होते ? याचाही शोध घेणे आवश्यक आहे. कारण राज ठाकरे यांच्या सभेला होणाऱ्या गर्दीचा त्यांना निवडणुकीत आतापर्यंत फायदा झाल्याचे दिसत नाही.

त्याबरोबर जिल्ह्यात शिवसेनेचे पालकमंत्र्यांसह पाच आमदार आहेत. त्यापैकी पारोळ्याचे चिमणराव पाटील आणि चोपड्याचे चंद्रकांत सोनवणे यांची अनुपस्थिती मात्र उपस्थितांना खटकली. चंद्रकांत सोनवणे यांचे समजू शकतो, परंतु आमदार चिमणराव पाटलांच्या अनुपस्थिती नेत्यांचे राजकीय शत्रुत्व अधोरेखित करणारी आहे. गुलाबराव पाटील यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यात मुख्यमंत्री बनण्याचा झालेला उल्लेख खटकणारा आहे. अभी दिल्ली बहुत दूर है या उक्तीप्रमाणे राज्यातील शिवसैनिकांत संभ्रम निर्माण होतोय. मुख्यमंत्री पदाचे स्वप्न जाऊद्या; परंतु 12 आमदार माझ्या खिशात आहे म्हणून मला मुख्यमंत्री करा असे म्हणणाऱ्या सुरेश दादा जैन यांचे काय झाले, हा इतिहास समोर आहे.

धुळ्याचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रोहिदास पाटील यांचे स्वप्न स्वप्नच राहिले. त्याचबरोबर जळगाव जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे हे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असताना त्यांचे काय झाले, हे ताजे उदाहरण म्हणता येईल. तेव्हा अभिष्टचिंतन सोहळ्यात मुख्यमंत्रीपदाचा विषय छेडला जायला नको होता, हा त्यांना त्यांच्या हितचिंतक समर्थकांचा प्रेमाचा सल्ला द्यावासा वाटतो. पालकमंत्री म्हणून मीच श्रेष्ठ असे म्हणून घेणे ही दर्पोक्ति नव्हे काय…!

Leave A Reply

Your email address will not be published.