आ. शिरीष चौधरी यांचा वाढदिवस आदर्श पद्धतीने साजरा

0

यावल रावेर विधानसभा मतदार संघाचे काँग्रेसचे आमदार शिरीष चौधरी यांचा 63 वा वाढदिवस 23 मे रोजी साजरा झाला. 23 मे रोजी सकाळपासून संध्याकाळपर्यंत मतदारसंघात विविध उपक्रम पार पडले. पाल येथे आदिवासींसाठी भव्य रोगनिदान व उपचार शिबिर घेण्यात आले. त्या रोगनिदान व उपचार शिबिराचे उद्घाटन स्वतः आ. शिरीष चौधरी यांनी केले.

सकाळी 11:30 वाजता फैजपूर येथे धनाजी नाना चौधरी महाविद्यालयात यावल आणि रावेर तालुक्यातील दिव्यांग बांधवांचा मेळावा घेण्यात आला. या मेळाव्याच्या माध्यमातून यावल रावेर मतदार संघातील दिव्यांग बांधवांच्या समस्यांवर चर्चा झाली. बांधवांना तीन चाकी सायकलीचे वाटप करण्यात आले. दिव्यांग बांधवांसाठी आरोग्य तपासणी व रोग निदान शिबीर घेण्यात आले. दिव्यांगांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासनातर्फे मिळणाऱ्या निधीचा सदुपयोग यानिमित्ताने करण्यात आला.

आ.शिरीष चौधरी यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त कसलाही बडेजाव न करता समाजातील दुर्लक्षित घटक दिव्यांग यांना मदतीचा हात देण्याचा प्रयत्न स्तुत्य म्हणावा लागेल. राजकीय स्पर्धेमध्ये मंत्र्यांवर लक्ष ठेवून सध्या राजकीय पक्षाची रेलचेल चाललेली आपण पाहतो. परंतु सेवेची परंपरा असलेल्या चौधरी कुटुंबाचा आदर्श आ. शिरीष चौधरी यांनी कायम ठेवला, ही बाब कौतुकास्पद म्हणावी लागेल.

वाढदिवसाचे निमित्त साधून कर्मचाऱ्यांचा भव्य मेळावा घेऊन आपली राजकीय बाजू भक्कम करण्याचा अनेक जण प्रयत्न करतात. तथापि आ. शिरीष चौधरी यांनी सेवेची परंपरा आपले आजोबा कै. धनाजी नाना चौधरी आणि पिताजी कै. मधुकरराव चौधरी यांच्याकडून घेऊन ती कायम ठेवली हे विशेष. शिरीष चौधरी यांच्या वाढदिवसानिमित्त यावल रावेर तालुक्यातील दिव्यांगांचा सर्वे करून त्यांचा मेळावा घेण्याचे श्रेय आमदार शिरीष चौधरी यांचे सुपुत्र धनंजय चौधरी यांना द्यावे लागेल. कारण आपल्या पिताजींच्या वाढदिवशी यावल रावेर तालुक्यातील दिव्यांगांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करून त्यांची पालक म्हणून कोणीतरी दखल घेतोय याचा आनंद दिव्यांग बांधवांनी व्यक्त केला.

दिव्यांगांचे अनेक प्रश्न आहेत. ते शरीराने दिव्यांग असले तरी त्यांच्यात जिद्द आहे. त्यांच्या मनाची उभारी पाहता त्यांना आधाराची गरज आहे. तो आधार देण्याचा प्रयत्न आमदारांनी आपल्या वाढदिवसानिमित्ताने दिल्याबद्दल दिव्यांग मेळाव्याचे आयोजन आ. शिरीष दादा यांचे सुपुत्र धनंजय चौधरी यांना धन्यवाद दिले पाहिजे. धनंजय चौधरी हे वकिलीचे शिक्षण घेत आहेत. अद्याप राजकारणात यांची एन्ट्री झालेली नाही. परंतु विद्यार्थी असलेल्या या तरुणाचे विचार पाहता चौधरी कुटुंबाचा वारसा पुढे नेईल त्यादिशेने त्याचे पाऊले पडत आहेत हे विशेष.

आ. शिरीष चौधरी यांच्या 63 व्या वाढदिवसानिमित्त यावल तालुक्यातील 63 काँग्रेस कार्यकर्त्यांनी रक्तदान करून रक्तदान हे श्रेष्ठदान आहे आणि समाजाला रक्ताची गरज असल्याचा आदर्श घालून दिला. यावल तालुक्यातील काँग्रेसचे नेते जि. प. सदस्य प्रभाकर आप्पा सोनवणे यांचे नेतृत्वात 63 काँग्रेस कार्यकर्त्यांनी रक्तदान केले. सध्या राजकारणा संदर्भात चांगले बोलले जात नाही. राजकारणाचा दर्जा दिवसेंदिवस घसरत चाललाय. अशी परिस्थिती असताना राजकारणाचे व्यावसायिकीकरण झाले, असा आरोप होत असताना 63 काँग्रेस कार्यकर्त्यांनी आपल्या आमदाराच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान करून आदर्श निर्माण केल्याचे पाहून कुठे तरी राजकारणातही आशेचा किरण दिसून येतो. ही अत्यंत मोलाची बाब म्हणावी लागेल. त्यामुळे राजकारण पूर्णपणे बरबटलेले नाही, याचा यावल तालुक्यातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आदर्श धडा घालून दिला असेच म्हणावे लागेल. या रक्तदानाचे श्रेय प्रभाकर आप्पा सोनवणे यांना द्यावे लागेल.

आ. शिरीष चौधरी यांनी मतदार संघातील कुंभारखेडा येथेही रोग निदान व उपचार शिबिराचे उद्घाटन करून या शिबिराचा फायदा कुंभारखेडा परिसरातील ग्रामस्थांनी घेतला हे विशेष. सर्वसामान्यांसाठी रोगनिदान व उपचार शिबिराच्या माध्यमातून फायदा होतो. तो सेवा भाव आमदार शिरीष चौधरी यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने अमलात आणला. अशाच पद्धतीने इतर राजकीय आणि सामाजिक कार्यकर्ते व नेत्यांनी आपल्या वाढदिवस साजरा केला तर जनतेला त्याचा लाभ होऊ शकतो. वाढदिवसाच्या निमित्ताने यावल रावेर मतदार संघातील यावल रावेर आणि फैजपूर या तीन मोठ्या शहरांसाठी प्रत्येकी एक छोटी ॲम्बुलन्स, जेणेकरून त्याचा समाजासाठी उपयोग होईल अशा तीन ऍम्ब्युलन्सचा प्रस्ताव शासनाकडे देण्यात आला आहे. ते प्रस्ताव मंजूर होण्याच्या मार्गावर आहेत. त्या ॲम्बुलन्सचे लवकरच लोकार्पण करण्यात येईल अशी घोषणा आ. चौधरी यांनी यावेळी केली. एकंदरीत राजकीय नेत्यांचा वाढदिवस विविध लोकोपयोगी पद्धतीने साजरा करून आ. शिरीष दादांनी आदर्श घालून दिला.

Leave A Reply

Your email address will not be published.