वर्चस्व सिध्दतेसाठी खडसे – पाटील वाद

0

जळगाव जिल्हयातील मुक्ताईनगर बोदवड विधानसभा मतदार संघात माजी मंत्री एकनाथराव खडसे आणि विद्यमान आमदार चंद्रकांत पाटील यांचेत बारीक-सारीक गोष्टीवरुन एकमेकावर आरोप-प्रत्यारोप हा नित्याचा विषय बनलेला आहे. आमदार चंद्रकांत पाटील यांनी 2019 मध्ये खडसेंची कन्या रोहिणी खडसे खेवलकर यांचा पराभव केला. 2019 साली भाजप-सेना युती असल्याने शिवसेना जिल्हा प्रमुख असलेले चंद्रकांत पाटील यांची शिवसेनेतर्फे निवडणूक लढवायची इच्छा होती तथापि युती धर्मामुळे त्यांना शिवसेनेतर्फे उमेदवारी मिळाली नाही. भाजपच्या रोहिणी खडसे यांना शिवसेनेचा पाठींबा होता. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांनी अपक्ष उमेदवारी जाहीर करुन अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढविली. यावेळी भाजपच्या रोहिणी खडसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ॲड. रविंद्रभैय्या पाटील यांचेत प्रमुख लढत होईलच आणि तिसरे अपक्ष उमेदवार म्हणून चंद्रकांत पाटील लढतील असे चित्र होते.

तथापि नाथाभाऊ यांना भाजपने तिकीट नाकारल्यानंतर राष्ट्रवादीतर्फे नाथाभाऊंना उमेदवारी देण्याच्या संदर्भात जोरदार हालचाली झाल्या. शरद पवार आणि अजित पवार यांनी तशी व्यूहरचना केली होती. तथापि ऐनवेळी एकनाथराव खडसे यांनी राष्ट्रवादीची ऑफर नाकारली आणि भाजपतर्फे कन्या रोहिणी खडसेंचा प्रचार करुन त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे ॲड. रविंद्र पाटील यांची उमेदवारी ऐनवेळी माघार घेऊन अपक्ष उमेदवार चंद्रकांत पाटलांना पाठींबा जाहीर केला. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची युती होतीच. शिवाय काँग्रेसला एकनाथराव खडसे आणि त्यांच्या घराण्यातील उमेदवार नकोच होता. त्यामुळे अपक्ष उमेदवार चंद्रकांत पाटील यांना राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा जाहीर पाठिंबा मिळाला. त्याला एकनाथराव खडसेंचा भाजपतंर्गत विरोध असल्याने भाजपचा छुपा पाठिंबा चंद्रकांत पाटलांना मिळाला.

शिवसेनेचे चंद्रकांत पाटील हे जरी अपक्ष असले तरी ‘शिवसेना -भाजप युती मीच तोडली’ असे 2014 च्या विधानसभा निवडणुकीत जाहीर वक्तव्य करणारे नाथाभाऊ शिवसेनेच्या ब्लॅकलिस्टमध्ये होते. त्यामुळे शिवसेनेचा जाहीर नसला तरी आतून पूर्णपणे पाठिंबा चंद्रकांत पाटलांनाच होता. त्यामुळेच अपक्ष उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी रोहिणी खडसे यांचा दोन हजाराच्या आत मताधिक्याने काठावर पराभव करुन विजयी झाले. चंद्रकांत पाटलांच्या सुदैवाने 2019 च्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेस महाविकास आघाडीचे सरकार सत्तारुढ झाले आणि चंद्रकांत पाटलांनी क्षणाचाही विलंब न लावता शिवसेनेला आपला पाठींबा जाहीर केला. त्यामुळे आ. चंद्रकांत पाटील हे सत्तारुढ सरकारचे आमदार झाले.

एकनाथराव खडसेंचे दुर्दैव म्हणजे कन्या रोहिणी खडसे यांचा पराभव झाला. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. भाजपतर्फे एकनाथराव खडसेंचा छळ सुरु झाला.त्यानंतर त्यांनी 40 वर्षे ज्या भाजपशी एकनिष्ठ होते त्याला रामराम ठोकून शरद पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामुळे खडसे यांचे मतदार संघातील राजकीय प्रतिस्पर्धी आ. चंद्रकांत पाटील आणि एकनाथराव खडसे हे दोघे सत्तारुढ महाविकास आघाडीचे घटक बनले. असे असले तरी मुक्ताईनगर -बोदवड मतदार संघात खडसे-पाटील यांच्यात विळा भोपळयाचे नाते वाढतच गेले. त्यांचेतील वाद विकोपाला गेला.

आमदार म्हणून चंद्रकांत पाटील यांनी एखादी गोष्ट केली की, त्याला काऊन्टर अटॅक खडसेंकडून होतो. त्याचे एकमेव कारण म्हणजे मुक्ताईनगर-बोदवड मतदार संघात नाथाभाऊ यांना आपले वर्चस्व हवे आहे. त्यासाठी आमदार चंद्रकांत पाटील आणि एकनाथ खडसे हे जरी सत्तारुढ पक्षाचे घटक असले तरी त्यांच्यातला विस्तव जात नाही. आ. चंद्रकांत पाटील हे सुध्दा इरेला पेटलेले आहेत. ते म्हणतात मला मुक्ताईनगर-बोदवडच्या मतदारांनी निवडून दिले आहे. त्यांच्यासाठी तसेच या मतदार संघासाठी मी जिवाचे रान करुन विकासनिधी आणतोय. मी केलेला विकास खडसे यांना रुचत नाही म्हणून ते सातत्याने वाद घालतात. तो निधी आपला, विकासाची कामे मीच करतोय. असा दावा करुन मतदार संघात केवीलवाणा प्रयत्न करताय असा आरोप चंद्रकांत पाटील करताय.

त्यामुळे शत्रूचा शत्रू तो आपला मित्र या तत्वाप्रमाणे भाजपचे गिरीश महाजन यांना भाजपतर्फे अप्रत्यक्षरीत्या मदत करतात. मुक्ताईनगर- बोदवड मतदारसंघात भाजपला स्थान मिळाले नाही तरी खडसेला ते स्थान मिळू नये असा प्रयत्न करताहेत. त्यामुळे एकनाथराव खडसे हे स्वत:च्या अस्तित्वासाठी आ. चंद्रकांत पाटलांवर आरोप करताहेत असा सर्वसाधारण समज आहे. परंतु पाटील खडसे यांचेतील वाद वाढतच राहील आणि त्याचा फायदा खडसे विरोधक घेतील एवढे मात्र निश्चित.

Leave A Reply

Your email address will not be published.