रेल्वे राज्यमंत्री दानवेंच्या कामाची अजब तऱ्हा

0

रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे महाराष्ट्राचे विशेषतः जळगाव लगत असलेल्या जालन्याचे आहेत. त्यामुळे मध्य रेल्वेचे एक देशातील मोठे जंक्शन असलेल्या भुसावळचा विकास आणि विस्तार व्हायला हवा. त्याच बरोबर भुसावळ ते मनमाड दरम्यान टाकण्यात येणाऱ्या तिसऱ्या रेल्वे लाईनच्या कासवगतीने सुरू असलेल्या कामाला गती मिळाली पाहिजे. तथापि गेल्या तीन वर्षात अद्याप भुसावळ जळगाव दरम्यानच्या तिसऱ्या लाईनचे काम पूर्ण झाले नाही. लॉकडाऊन पासून बंद असलेल्या भुसावळ मुंबई, भुसावळ सुरत पॅसेंजर आणि भुसावळ देवळाली शटल या रेल्वे गाड्या अद्याप सुरू झालेल्या नाहीत. त्यामुळे सर्वसामान्य रेल्वे प्रवाशांचे हाल होत आहेत.

पाचोरा ते जामनेर अर्थात पी जे रेल्वे अध्याप सुरू झालेली नाही. ती सुरू करावी म्हणून प्रवाशांचे आंदोलनही सुरू आहे. प्रवासी आंदोलकांच्या कृती समितीच्या वतीने रावसाहेब दानवे यांची दिल्लीला भेट सुद्धा घेतली. याप्रसंगी जळगाव जिल्ह्यातील दोन्ही खासदार उपस्थित होते. त्यांनी सुद्धा पी जे रेल्वे सुरू करण्याची मागणी केली. रावसाहेब दानवे यांनी आश्वासन दिले. लवकरच पी जे रेल्वे सुरू होईल असे सांगितले. पण ते आश्वासन हवेतच विरले. रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे जालन्याचे प्रतिनिधित्व करतात. म्हणून लोकसभा मतदारसंघातून ते लोकसभेवर निवडून आलेले आहेत. तथापि जालन्यालगत असलेल्या जळगाव जिल्ह्यातील रेल्वेने प्रवाशांकडे मात्र त्यांचे दुर्लक्ष आहे असेच म्हणावे लागेल.

महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्यांमध्ये केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री यांचा आदर्श इतर मंत्र्यांनी घ्यायला हवा. पण तसे होताना दिसत नाही. आपल्या कामाची छाप केंद्रात पडतांना दिसत नाही. देशात रेल्वे वाहतुकीचे जाळे पसरले आहे. महाराष्ट्रात कोकणात रेल्वे सुरू होण्याची शक्यता नव्हती. तथापि तत्कालीन रेल्वेमंत्री मधु दंडवते यांनी चंग बांधला आणि कोकणात रेल्वे सुरू झाली. कोरोना महामारीच्या काळात बंद झालेल्या रेल्वेगाड्या अद्याप सुरू झाल्या नसल्याने जळगाव जिल्ह्यातील प्रवाशांचे हाल होत आहेत. पण रेल्वे राज्यमंत्री दानवेंकडून याची दखल घेतली जात नाही. भाजपचे चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी त्यांची भेट घेऊन या संदर्भात दानवे यांच्याशी चर्चा केली. मागण्यांचे निवेदन दिले, पण अद्याप रेल्वे मंत्रालयाकडून काहीही हालचाली होत नाही.

जळगाव जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांच्या समस्या सोडवल्या जात नाहीत. भुसावळ मनमाड दरम्यानचे तिसरी रेल्वे लाईन टाकण्याचे काम कासवगतीने सुरू असताना त्याला गती दिली जात नाही. परंतु जळगाव जालना ही 172 किलोमीटर अंतराची रेल्वे सुरू करण्यासाठी त्याचे हवाई सर्वेक्षण करण्यात येणार असून 14 ते 17 मेच्या दरम्यान विमानाद्वारे सर्वेक्षण केले जाणार आहे. त्यासाठी साडेचार कोटी रुपये खर्च निर्धारित करण्यात आल्याची माहिती रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली आहे. जळगाव जालना ही रेल्वे निश्चितच सुरू झाली पाहिजे. त्या रेल्वेला कोणाचाही विरोध होणार नाही. विरोध करण्याचे काही कारणही नाही. ते सुरु झाले पाहिजे.

तथापि जळगाव जिल्ह्यातील रेल्वे प्रवासी आपल्या पॅसेंजर गाड्या अभावी वंचित आहेत. त्यांची समस्या आधी सोडवणे आवश्यक आहे. त्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष का केले जात आहे, हे कळत नाही. जळगाव जालना सुरू करण्याचे आमिष दाखवून रेल्वे प्रवाशांच्या तोंडाला पाने पुसण्याने जळगाव जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांचे प्रश्न सुटणार नाहीत. जळगाव जालना रेल्वेच्या बजेटमध्ये कसलीही तरतूद नाही. हवाई सर्वेक्षणाच्या नावाखाली साडेचार कोटीच्या निधीचा चुराडा होणार आहे. या निधीतून टक्केवारी मात्र उकळली जाईल. या टक्केवारी साठीच हवाई सर्वेक्षण करण्याचे ठरवले असावे. कारण बंद असलेल्या पाचोरा जामनेर रेल्वे सुरू करण्यासाठी 25 कोटी रुपये लागणार आहेत, असे सांगण्यात येते. रेल्वे खात्यातर्फे हे 25 कोटी मंजूरही करण्यात येतील असे खुद्द रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी कृती समितीच्या शिष्टाचार मंडळात सांगितले. तरीसुद्धा ही रेल्वे सुरू होण्याच्या दृष्टीने कसल्याच हालचाली होताना दिसत नाही.

पी जे रेल्वे सुरू होणार म्हणून प्रवाशांना आशेवर ठेवण्यापेक्षा ही रेल्वे सुरू होणार नसेल तर तसे जाहीर करावे. म्हणजे रेल्वे प्रवासी आशेवर राहणार नाहीत. परंतु रेल्वे सुरू होणार असल्याचे गाजर दाखवून त्यांची दिशाभूल करू नका. त्यांची फसवणूक करू नये एवढेच या निमित्ताने सांगावेसे वाटते. एकंदरीत रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या कामाची पद्धत जळगाव जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांना रुचत नाही. जळगाव जालना रेल्वे पुढे सुप्रसिद्ध अजिंठा लेणी आणि जालना जिल्ह्यातील सुप्रसिद्ध राजुरचे गणपती मंदिर पर्यटकांसाठी सोयीचे होणार आहे. तथापि ही रेल्वे सर्वेक्षण झाल्यावर त्यांच्या मंजुरीनंतर तातडीने काम सुरू करण्याच्या दृष्टीनेही प्रयत्न झाले पाहिजेत. असो.. जळगाव जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांच्या समस्या तातडीने सोडविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावे, एवढेच या निमित्ताने रेल्वे प्रवाशांच्या वतीने मागणी करण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.