रेल्वे प्रवाशांची समस्या सोडवणे आवश्यक…!

0

कोरोनामुळे लॉकडाऊन केल्यानंतर रेल्वे वाहतूक बंद केली गेली. त्यानंतर रेल्वे खात्याच्या वतीने हळूहळू काही एक्सप्रेस रेल्वेगाड्या सुरू करण्यात आल्या. त्यानंतर सर्वच एक्सप्रेस रेल्वे गाड्या सुरू झाल्या. परंतु रिझर्वेशन शिवाय या गाड्यांमध्ये प्रवास करणे शक्य नाही. अद्यापही रिझर्वेशन शिवाय प्रवाशांना प्रवास करता येत नाही. सर्वसामान्य प्रवाशांना जनरल तिकीट काढून प्रवास करता येत नाही. त्यामुळे ऐन वेळी रेल्वेने प्रवास करण्याचे रेल्वे प्रवासी अद्याप वंचित आहेत. जळगाव जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांचा विचार केला तर भुसावळ मुंबई आणि भुसावळ सूरत या दोन्ही पॅसेंजर रेल्वे गाड्या अद्याप सुरू करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे भुसावळ मुंबई आणि भुसावळ सुरत, गुजरातमध्ये जाणाऱ्या सर्वसामान्य रेल्वे प्रवाशांची अद्याप कुचंबना सुरू आहे.

जळगाव जिल्ह्यात नाशिक ते भुसावळ दरम्यान दररोज अपडाऊन करणाऱ्यांची संख्या हजारो पेक्षा जास्त आहे. महाराष्ट्र एक्सप्रेस रेल्वे त्यांच्यासाठी अत्यंत सोयीस्कर अशी आहे. परंतु तिच्या वेळेमध्ये बदल केल्यामुळे त्या गाडीचा अपडाऊन करणाऱ्यांसाठी उपयोग नाही. महाराष्ट्र एक्सप्रेसची वेळ पूर्ववत करावी आणि अपडाऊन करणाऱ्यांसाठी मासिक पासची उपलब्धता करून मिळावी ही मुख्य मागणी अपडाऊन करणाऱ्यांची आहे. परंतु महाराष्ट्र एक्सप्रेसची वेळ पूर्ववत का केली जात नाही ? हे मात्र कळत नाही. तसेच अपडाऊन करणाऱ्यांसाठी मासिक पास उपलब्ध का केली जात नाही ? हेही कळायला मार्ग नाही.

त्याचबरोबर रेल्वे जनरल तिकीट उपलब्ध न करण्यामागचे रेल्वे खात्याचे धोरण काय आहे ? हेही कळत नाही. कारण एसटीच्या प्रवास रेल्वे पेक्षा कितीतरी पटीने महाग आहे. रेल्वेने जिथे पंचवीस रुपये भाडे लागते तेथे एसटीने प्रवास करताना शंभर रुपये मोजावे लागतात. सर्वसामान्यांच्या खिशाला ही बाब परवडण्यासारखी नाही. त्यामुळे रेल्वे खाते अजून कोरोना महामारी आणि लॉकडाऊन मधून अद्याप बाहेर पडलेली नाही. जळगाव जिल्ह्यातील जनता रेल्वे पॅसेंजर गाडीचा सुरू करण्याची मागणी करत आहे. परंतु आमचे रेल्वे मंत्रालय याची दखल घेत नाही. यामागचे कारण काय ? हे कळत नाही.

खाजगी वाहतूकीद्वारे वाहतूक करणे परवडणार नाही. म्हणून रेल्वे सारखी वाहतूक अत्यंत महत्त्वाची आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे असताना ती प्रवाशांच्या गैरसोयीची करण्याचे कारण काय ? प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी विमान वाहतूक सेवा सुरू करण्याचा निर्णय केंद्र केंद्राने घेतला आहे. हा निर्णय स्तुत्य असला तरी त्याला प्रवासी उपलब्ध होत नाही, ही खंत आहे. जळगाव ते मुंबई विमान सेवा सुरू झाल्यापासून कधीच नियमित सुरू आहे, असे होत नाही. शेवटी विमानाने जाणाऱ्यांची ज्यांची क्षमता आहे त्यांचे विमान निश्चित सुरू करावे. परंतु जो सर्वसामान्य गोरगरीब आहे त्यांच्या खिशाला हे परवडणारे नाही. त्यांच्यासाठी रेल्वेची सुविधा करावी ही मागणी रास्त आहे.

जळगाव जिल्ह्यातील चाळीसगावचे भाजपा आमदार मंगेश चव्हाण यांनी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब यांची भेट घेऊन जळगाव जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांच्या मागण्यांचे निवेदन देऊन चर्चा केली.

रेल्वे प्रवाशांच्या या मागण्यासंदर्भात प्रामुख्याने जळगाव जिल्ह्यातील दररोज हजारो चाकरमानी दररोज हजारो चाकरमानी अपडाऊन करतात. त्यांच्या मागण्या मांडल्या. त्यांच्या त्या मागण्या रास्तही आहेत. चाकरमान्यांना अपडाऊनसाठी सोयीस्कर रेल्वे एक्स्प्रेस म्हणजे महाराष्ट्र एक्स्प्रेस होती. त्याच्या वेळेत बदल झाल्यामुळे अपडाऊन करणाऱ्यांसाठी ही गाडी आता काहीच उपयोगाची नाही. त्यामुळे महाराष्ट्र एक्स्प्रेसची वेळ पूर्ववत करावी अशी मागणी आ. मंगेश चव्हाण यांनी मंत्री महोदयांकडे केली. त्याचबरोबर अप डाऊन करणाऱ्यांसाठी मासिक पास पूर्ववत सुरू करावी ही मागणी सुध्दा केली. त्याचबरोबर आता नुकतीच सुरू करण्यात आलेली भुसावळ – इगतपुरी मेमू रेल्वे ही मुंबईपर्यंत असावी किंवा कल्याणपर्यंतही करावी अशी मागणी केली आणि ती मागणी सुध्दा रास्त आहे.

बंद असलेल्या भुसावळ, मुंबई, भुसावळ – सुरत या रेल्वे पॅसेंजर पूर्ववत सुरू करून सर्वसामान्य प्रवाशांना दिलासा देणे गरजेचे. रेल्वे प्रवाशांच्या मागण्यांचा एक भाग म्हणून पाचोरा – जामनेर रेल्वे अर्थात पी.जे.रेल्वे अद्याप बंदच आहे. गरिबांची गाडी म्हणून पी.जे. रेल्वे ओळखली जाते. त्यासाठी कृती समितीद्वार आंदोलन सुध्दा सुरु आहे. पी.जे. सुरू व्हावी म्हणून कृती समितीच्यावतीने रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेऊन पी.जे. सुरू करण्याची मागणी केली. परंतु आश्वासन देऊन तोंडाला पाने पसुली गेली. त्यामुळे गरिब रेल्वे प्रवाशांचे कुचंबणा होतेय. ती थांबवावी अशी मागणी होतेय ती पूर्ण करा एवढेच आवाहन.

Leave A Reply

Your email address will not be published.