शासनाचे लक्ष वेधणारी आदिवासी महिलांची परिषद

0

लोकसंघर्ष मोर्चाच्यावतीने आज जळगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या समृध्द महिला संकल्प परिषद प्रचंड प्रमाणात यशस्वी झाली. या परिषदेला आदिवासी शेतकरी महिलांची उपस्थितीने सर्वांचे लक्ष वेधले. दिनांक 15 एप्रिल रोजी झालेल्या या परिषदेच्या यशाचे श्रेय लोकसंघर्ष मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा प्रतिभा शिंदे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या टिमला द्यावे लागेल. रखरखत्या उन्हात भरदुपारी जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यात एकूण 15 हजार आदिवासी महिला शेतकरी आणि काही आदिवासी शेतकरी बांधव या महिला परिषदेला उपस्थित होत्या.

स्थानिक शिवतीर्थ मैदानावर झालेल्या या समृध्द महिला संकल्प परिषदच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे उपस्थित होते. व्यासपिठावर अर्धा डझनमंत्री त्याचबरोबर जिल्ह्यातील काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे आमदार व इतर नेते उपस्थित होते. कोरोना महामारीनंतरच्या दोन वर्षांनंतर पहिल्यादांच झालेली आदिवासी महिला शेतकऱ्यांची परिषद प्रचंड प्रमाणात यशस्वी झाली. या परिषदेत लोकसंघर्ष मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा प्रतिभा शिंदे यांचे सर्वांनीच तोंडभरुन कौतुक केले. प्रतिभा शिंदे यांनी परिषदेत आदिवासी महिला शेतकऱ्यांच्या सन्मानार्थ एकूण सहा ठराव मांडले. त्यात आदिवासी महिला शेतकऱ्यांच्या सातबारापासून ते वन हक्क जमिनी नावावर झाल्याच पाहिजे, आदिवासी महिला शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी शासनाने सहकार्य करावे.

रोजगार हमी योजनेत त्यांना काम मिळावे आदी ठराव टाळ्यांच्या कडकडाटात मंजूर झाले. हे ठराव मांडतांना लोकसंघर्ष मोर्चाच्या अध्यक्षा प्रतिभा शिंदे यांनी महाविकास आघाडी सरकारचे विशेषतः महाविकास आघाडीचे नेते शरद पवार यांचे मिळणाऱ्या सहकार्याद्दल आभार मानले. याचाच अर्थ महाविकास आघाडी सरकार आणि महिला शेतकऱ्यांच्या मागण्या संदर्भात सकारात्मक असल्याचे त्यांनी जाहीर केले. कोरोना महामारीच्या कालावधीत दोन वर्षे सर्व सार्वजनिक कार्यक्रम ठप्प होते. कोरोनानं स्त्री ही महिलांची परिषद प्रचंड प्रमाणात यशस्वी झाली आणि महाविकास आघाडी सरकारने सकारात्मक पाऊल उचलल्याने आदिवासी महिला शेतकऱ्यांना आपल्याकडे खेचून घेतले. एवढा मोठा आदिवासी महिलांचा जनसमुदाय महाविकास आघाडीने आपल्या प्रति सहानुभूति मिळविली आहे असे म्हटले तर ती अतिशोक्ती होणार नाही. एवढा मोठा जनसमुदाय मिळाल्यानंतर व्यासपिठावरुन आदिवासी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, पालकमंत्री गुलाबराव पाटील, कृषी मंत्री दादा भुसे, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी लोकसंघर्ष मोर्चाच्या अध्यक्षा प्रतिभा शिंदे यांचे कौतुक केले आणि सर्व मागण्या मान्य होतील असे आश्वासन दिले.

समृध्द महिला संकल्प परिषद ही राजकारण विरहित परिषद असली तरी या जनसमुदायासमोर बोलतांना जयंत पाटील यांनी महागाई वाढण्यास केंद्र सरकार कसे जबाबदार आहे, याचे उदाहरण देऊन केंद्र शासनावर हल्ला चढवला. प्रत्येक आदिवासी महिलेसाठी स्वयंपाकाचा गॅस देण्याची योजना केंद्र सरकारने जाहीर करून अवघ्या 400 रूपयात गॅस देण्याचे जाहीर केले. परंतु 400 रूपयाला मिळणारा गॅस आता 1 हजार रूपयाला मिळत असल्याने आमच्या आदिवासी महिलांना ते विकत घेणे परवडणारे नाही. म्हणून जंगलातील लाकडाचा उपयोग करून यापूर्वी त्या स्वयंपाक करायच्या. त्या आता गॅस परवडत नाही म्हणून पुन्हा लाकडाचा उपयोग करीत आहेत. हे दुर्दैव म्हणावे लागेल.

गॅसच्या किंमतीबरोबरच पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती आकाशाला भिडल्या असल्याने त्याचा परिणाम इतर वस्तूंची महागाई वाढण्यात होत असल्याची टीका जयंत पाटलांनी करून केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. तेव्हा उपस्थित महिलांनी त्याला दाद दिली. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारकडून महागाईच्या मुद्यांवर आदिवासी महिलांची मने जिंकली एवढे मात्र निश्चित. समृध्द महिला हक्क परिषद 2022 याचे अध्यक्षस्थान भूषविणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी केलेले भाषण सर्वांना अंतर्मुख करणारे ठरले.

या परिषदेत मांडलेले ठराव आणि त्यातील मागण्यासंदर्भात शरद पवार यांनी आदिवासी विभागाशी संबंधित सर्व विभागाची एक संयुक्त बैठक घेण्यात येईल असे जाहीर केले. या संयुक्त बैठकीत या परिषदेत मांडलेल्या सर्व मागण्यांच्या संदर्भात चर्चा करून त्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात येईल, असे सांगितले. त्याचबरोबर आदिवासींचे जे प्रलंबित प्रश्न आहेत ते तातडीने सोडवण्यासंदर्भात महाविकास आघाडी सरकार पाऊल उचलण्यात येईल असे जाहीर करून शरद पवारांनी टाळ्यात घेतल्या आणि आगामी निवडणुकांच्या दृष्टीने जाणून सुरूवात केली असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.