जळगाव येथे 2018 मध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात आले. सुरूवातीला जिल्हा सरकारी रूग्णालयात हे महाविद्यालय सुरू झाले. आज पाच वर्षे झाले तरी जिल्हा सरकारी रूग्णालयातच हे महाविद्यालय अद्यापपर्यंत सुरू आहे. त्यामुळे वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जे शिक्षणाचे इन्फ्रास्ट्रक्चर मिळायला पाहिजे ते मिळत नाही.
जिल्हा सरकारी रूग्णालयात अर्थात सिव्हिल हॉस्पिटलच्या जागेत भाड्याने हे महाविद्यालय सुरू झाले. तत्कालिन वैद्यकीय शिक्षणमंत्री व जळगाव जिल्ह्याचे पालक मंत्री गिरीश महाजन यांच्या कार्यकाळात या शासकीय महाविद्यालयाची देण असली तरी गिरीश महाजनांनी जळगावचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हे वैद्यकीय शिक्षणक्षेत्रातील एक आगळे – वेगळे महाविद्यालय असेल अशी अपेक्षा व्यक्त केली होती. त्यासाठी एकाच ठिकाणी वैद्यकीय शिक्षणाच्या सर्व शाखांचे शिक्षण दिले जाईल. म्हणजे शिक्षणाचे मेडिकल हब असेल अशी अपेक्षा व्यक्त केली होती. त्या दृष्टीने तशी योजनासुध्दा आखलेली होती.
जळगाव शहरापासून जवळच असलेल्या चिंचोली शिवारात 67 एकर जागासुध्दा या महविद्यालयासाठी उपलब्ध करून घेतली. ही सर्व जमीन शासकीय मालकीची असल्यामुळे त्यासाठी विशेष असा मोठा निधी जमिनीसाठी द्यावा लागला नाही. ही 67 एकर जमिन उपलब्ध होऊन सुध्दा तीन वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला. तथापि तेथे वैद्यकीय महाविद्यालयाचे फलकाव्यतिरिक्त काहीही प्रगती होऊ शकली नाही. या 67 एकर जागेत गेल्या तीन वर्षात मेडिकल हब बांधकामाची शून्य प्रगती झालीय.
वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख जळगावला एका लग्नकार्यासाठी आले होते. या कार्यक्रमाला जोडून त्यांनी जळगावच्या शासकीय मेडिकल कॉलेजच्या चिंचोली येथील 67 एकर जागेत होणाऱ्या बांधकामाचा आढावा घेण्याचे जाहीर करण्यात आले होते. मंत्री अमित देशमुख येणार म्हणून सकाळी 11 वाजेपासून सायंकाळी 4 वाजेपर्यंत वैद्यकीय खात्याचे सर्व अधिकारी, जीएमसीचे अधीष्ठाता तसेच सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी आणि दिल्लीच्या ज्या कंपनीला बांधकामाचे कंत्राट देण्यात आले आहे त्याचे अधिकारी ताटकळत मंत्री महोदयांची वाट पहात बसले होते. तथापि मंत्री महोदयांनी राजकीय नेत्यांच्या भेटी गाठी घेण्यात मग्न होते. ते दिवसभर चिंचोली येथील नियोजित जीएमसी मेडिकल हच्याजागेकडे फिरकलेच नाही. अशा पध्दतीने महाविकास आघाडी सरकारातील मंत्र्याकडून काम होत असेल तर जीएमसीचे भवितव्य कसे राहील? हा एक गंभीर प्रश्न म्हणावा लागेल.
जळगावला सरकारी वैद्यकीय महाविद्यालय सुरू होऊन पाच वर्षे झाली. जिल्हा सरकारी रूग्णालयात हे महाविद्यालय सुरू आहे. जिल्हा सरकारी रूग्णालयाच्या जागेत वैद्यकीय शिक्षणाचे धडे विद्यार्थी कसे गिरवत आहेत याची किमान पहाणी आणि चौकशी वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुखांनी केली असती तर वैद्यकीय महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना बरे वाटले असते. त्यानिमित्त विद्यार्थ्यांच्या ज्या काही अडी अडचणी आहेत त्या मंत्री महोदयांना समजल्या असत्या परंतु मंत्री महोदयांनी जळगावच्या सरकारी वैद्यकीय महाविद्यालयाला भेट देण्याऐवजी डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेज या खाजगी महाविद्यालयात भेट देऊन तेथील पहाणी केली. त्यांनी ही कृती जळगावकर सर्वसामान्यांच्या दृष्टीने योग्य नाही. म्हणूनच जळगावच्या सरकारी वैद्यकीय महाविद्यालय हे सर्वसामान्यांसाठी आपले वाटले पाहिजे. परंतु शासकीय योजनेच्या बोजवारा होत असेल तर त्याला शाश्वती दिल्याच्या बाबतीत जळगाव आहे.
अलिकडे लोकप्रतिनिधींकडून जनतेची अपेक्षा पूर्ण होत नाही. हे खेदाने म्हणावे लागते. डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात रूग्णांच्या संदर्भात ज्या सेवा दिल्या जातात. गंभीर अशा आजारांवर उपचार केले जातात. अवघड अशी शस्त्रक्रिया केल्यावर त्याचा प्रचार आणि प्रसार केला जातो. तशा पध्दतीची रूग्णांना सेवा दिल्या संदर्भातील जीमएमी तर्फे माहिती मिळत नाही. उलट पाण्याचे दोन वॉटर कूलर बंद पडलेले होते. वृत्तपत्रात बातमी प्रसारित झाल्यावर ते सुरू करण्यात आले. एकंदरीत जळगावच्या सरकारी वैद्यकीय महाविद्यालयातर्फे जिल्हा वासीयांच्या रूग्ण सेवेच्या अपेक्षा पूर्ण होणे अपेक्षित आहे.