कोरोना काळात जिल्ह्यात कोट्यावधींचा भ्रष्टाचार ?

0

कोरोना महामारीच्या काळात दोन वर्षात जळगाव जिल्ह्यातील ग्रामीण, उपजिल्हा आणि कुटीर रुग्णालयांमध्ये वैद्यकीय यंत्रसामग्री खरेदीत कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते दिनेश भोळे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन केला.

जिल्ह्यातील वरील रुग्णालयांमध्ये 60 टक्के वैद्यकीय यंत्रसामुग्री खरेदी केली नाही. परंतु खरेदी केल्याचे दाखवण्यात आले असल्याचे माहिती अधिकार कार्यकर्ते दिनेश भोळे यांनी सांगितले. हा भ्रष्टाचार वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केला असून त्यांच्यावर अद्याप कारवाई झाली नाही. 29 डिसेंबर रोजी सदर भ्रष्टाचारासंदर्भात दिनेश भोळे यांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती. पोलिसांकडून कारवाई होत नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर दिनेश भोळे यांनी न्यायालयात धाव घेतली.

न्यायालयात 1 एप्रिल रोजी सुनावणी होऊन संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा निर्णय न्यायालयाने दिला असल्याचे दिनेश भोळे यांनी सांगितले. एकंदरीत कोरोना काळात वैद्यकीय यंत्रसामग्री खरेदीच्या नावाखाली यंत्रसामग्री खरेदी न करता भ्रष्टाचार म्हणजे ही बाब अत्यंत गंभीर आहे. कोरोना काळात रुग्ण रुग्णालयात उपचार घेताना मृत्यूशी झुंज देत होते. यात काही जणांना आपले प्राण गमवावे लागले, तर अनेकजणांनी कोरोनावर मात करून सहीसलामत बरे झाले. अशा स्थितीत वैद्यकीय यंत्र खरेदीच्या नावाखाली भ्रष्टाचार करणे वरिष्ठ अधिकाऱ्यांना प्रेतावरच्या टाळूवरचे लोणी खाणारे अधिकारी अशी उपमा द्यावी लागेल.

एकूण जेवढी वैद्यकीय यंत्रसामुग्री खरेदी दाखवली आहे त्यापैकी 60 टक्के वैद्यकीय यंत्रसामग्री खरेदी केली नाही. त्या पैशांवर अधिकाऱ्यांनी डल्ला मारला हे स्पष्ट दिसून येते. कारण ग्रामीण उपजिल्हा रुग्णालय तसेच कुटीर रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी बिचारे वरिष्ठांच्या आदेशाचे पालन करतात. त्यामुळे ग्रामीण उपजिल्हा आणि कुटीर रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांना याचा थांगपत्ता सुद्धा नसेल. यामुळे जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांचा यात हात आहे. त्यापैकी भांडारपाल यांना हाताशी धरून हा वैद्यकीय यंत्रसामग्री खरेदीचा भ्रष्टाचार झाल्याचे दिसून येते.

कोरोना महामारीच्या कालावधीत जिल्ह्यात सुमारे दीड लाख रुग्णांवर उपचार झाले. त्यापैकी 2500 रुग्ण दगावले. बाकी सर्व रुग्ण बरे झाले. आज दोन वर्षानंतर जळगाव जिल्हा कोरोना मुक्त झाला, ही दिलासादायक बातमी असली तरी, कोरोनाच्या दोन वर्षाच्या कालावधीत वैद्यकीय यंत्रसामग्री खरेदी मध्ये कोट्यावधीचा भ्रष्टाचार उघडकीस येणे ही जिल्ह्याच्या दृष्टीने अत्यंत लांच्छनास्पद बाब आहे.

कोरोना महामारीच्या पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या लाटेत निस्वार्थपणे कोरोनाग्रस्त रुग्णांसाठी कोरोना योद्धा म्हणून सेवा देणाऱ्या कोरोना योध्यांसाठी मान खाली घालण्याची घटना अधिकाऱ्यांनी केली आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

कारण कसलीही अपेक्षा न करता कोरोना ग्रस्तांचा जीव वाचवण्यासाठी कोरोना योध्यांची धडपड होती. त्याबद्दल त्यांचा सन्मानही करण्यात आला. तथापि वैद्यकीय अधिकारी गलेलठ्ठ पगार घेऊन सेवा देत होते. ही सेवा देत असताना शासनाच्या पैशांवर डोळा ठेवून तो गिळंकृत करण्याची त्यांची वृत्ती घाणेरडी म्हणावी लागेल. त्यांचे कोणीही समर्थन करणार नाही. वैद्यकीय यंत्रसामुग्री खरेदी झालेल्या भ्रष्टाचार प्रकरणी न्यायालयाच्या आदेशाआधीच पोलिसांकडून कारवाई व्हायला हवी होती. परंतु दुर्दैवाने ती होऊ शकली नाही. याबाबत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी विशेष लक्ष घालून या अधिकाऱ्यांचा पर्दाफाश करण्यासाठी पुढाकार घ्यावा. कारण जिल्ह्याचे तत्कालीन निवृत्त सर्जन डॉक्टर चव्हाण आणि सरकारी मेडिकल कॉलेजचे डीन डॉक्टर खैरे यांच्यातील वाद यामुळे झाला होता हे दिसते.

Leave A Reply

Your email address will not be published.