Thursday, August 11, 2022

खा. पाटलांची गिरणा परिक्रमा अंतिम टप्प्यात

- Advertisement -

जळगाव लोकसभा मतदार संघाचे खासदार उन्मेश पाटील यांनी 1 जानेवारी या नववर्षारंभापासून गिरणा नदीच्या पुनरूज्जीवनासाठी 300 कि.मि. ची परिक्रमा सुरू केली. गिरणा नदीच्या उगमापासून ते तापी नदीत गिरणेच्या संगमापर्यंत सुमारे 300 कि.मी. ची ही परिक्रमा आहे. प्रत्येक शनिवार आणि रविवारी गिरणा काठावरील गावांना खा. उन्मेश पाटील यांचे नेतृत्वात भेटी देऊन जनजागृती करण्यात येते.

- Advertisement -

सुरूवातीला गिरणा परिक्रमा सर्वसामवेशक असेल. त्यात सर्वपक्षीय कार्यकर्ते तसेच सामाजिक कार्यकर्ते सहभागी होतील असे जाहीर करण्यात आले होते. तथापि खा. उन्मेश पाटलांच्या नेतृत्वात या परिक्रमेला भाजपचे शिक्कामोर्तब झाले. त्यामुळे या परिक्रमेमध्ये इतर पक्षीयांचा समावेश झालेला नाही. त्यामुळे जरी खा. उन्मेश पाटील या परिक्रमेकडे राजकारण विरहित दृष्टीने पहात असतील, तरी त्याला भाजपचे लेबल लागले हे तितकेच खरे आहे.

- Advertisement -

- Advertisement -

खा. उन्मेश पाटील यांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने या परिक्रमेच्या माध्यमातून प्रयत्न करतात असा विरोधकांकडून आरोप होतोय. त्यातच परिक्रमेच्या शुभारंभालाच वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे परिक्रमा वादात सापडते की काय? असा प्रश्न निर्माण झाला होता. जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री दररोज गिरणा नदीच्या पुलावरून येतात – जातात. पण त्यांना गिरणा नदीतील अवैध वाळू चोरीचे ट्रॅक्टर दिसत नाही काय? हे वक्तव्य खा. उन्मेश पाटलांनी करायला नको होते. त्यामुळे महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येऊन दोन अडीच वर्षे झाली. त्या आधी भाजप- सेना युतीचे सरकार पाच वर्षे सत्तेत होते. तेव्हाही अवैध वाळू चोरी अशाच पध्दतीने चालू होती. त्यामुळे खा. उन्मेश पाटलांच्या या आरोपामुळे ते बॅक फूटवर गेले आणि विरोधकांची मिळणारी सहानुभूती गमावून बसले.

वाळू माफिया ही राजकारण्यांनीच दिलेली कीड आहे. राजकारणी मंडळी आपल्या स्वार्थापोटी वाळू माफियांना पोसतात. त्यांच्या पैशाच्या जोरावर राजकारण करतात. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी वाळू माफिया राज संपविण्यासाठी संकल्प करण्याची गरज आहे. वाळू माफिये जोपर्यंत आहेत तोपर्यंत गिरणा नदीच काय, इतर नद्याही बोडक्या होतील आणि भविष्यात पाण्याचे मोठे दुर्भिष्य होईल हे सत्य आहे. त्यासाठी राजकारण न करता राजकारण विरहीत नदीची जोपासना करण्याची आवश्यकता आहे.

खा. उन्मेश पाटील हे भाजपचे तरुण खासदार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आशीर्वादाने जळगाव लोकसभा मतदार संघातून प्रचंड मताधिक्याने विजयी झालेले आहेत. त्या आधी चाळीसगाव विधानसभा मतदार संघातून 2014 मध्ये आमदार म्हणून निवडून आलेले होते. आमदार म्हणून त्यांचे कार्य चांगले होते. चाळीसगाव विधानसभा मतदार संघात त्यांचा चांगला प्रभाव होता. चाळीसगाव तालुक्यातील तरुणांमध्ये ते लोकप्रिय होते. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना खासदारकीचे तिकीट मिळाले आणि खासदार झाले. खासदार म्हणून मात्र त्यांची लोकप्रियतेची तुलना आमदारकीशी केली जाते. पण खासदारकीच्या काळात ती धार बोथट झाली असे म्हणावे लागते.

बेरोजगार तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी जळगाव जिल्ह्यात ज्या योजना आणण्याचा प्रयत्न झाला पाहिजे तो होत नाही. जळगाव लोकसभा मतदार संघात जी विकासाची कामे रेंगाळली आहेत. त्यांना चालना देण्यासाठी त्यांचेकडून प्रयत्न होत नाही. केंद्रात प्रतिनिधीत्व करणारे खा.उन्मेश पाटील यांचा अभ्यास चांगला आहे. लोकांच्या प्रश्नांची त्यांना जाण आहे. परंतु तरसोद ते धुळे महामार्ग चौपदरीकरणाचे काम रखडले. त्यासाठी त्यांनी जो पुढाकार घ्यायला पाहिजे तो घेतल्याचे दिसत नाही.

जळगाव शहरातून जाणाऱ्या महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामालाही कमालीचा विलंब तर झालाच, त्याचबरोबर आकाशवाणी चौक, इच्छादेवी चौक आणि अजिंठा चौफुली येथे बनविण्यात आलेल्या सदोष रोटरी सर्कलमुळे अपघाताची समस्या मिटलेली नाही. येरे माझ्या मागल्या सुरूच आहे. शिवाजीनगर रेल्वे उड्डाण पुलाने तर विलंबाचा कहरच केलाय. जळगाव शहरातील जनता त्यामुळे त्रस्त झालेली आहे. खासदार म्हणून त्यांनी पुढाकार घेऊन त्याला गती देण्यासाठी काहीही केले नाही. जनतेच्या लोकप्रतिनिधींकडून अपेक्षा असतात त्यांचा मात्र अपेक्षा भंग होतोय.

आता गिरणा परिक्रमा अंतिम टप्प्यात आहे असे ते म्हणतात. गिरणा काठावरील गावातील ग्रामस्थांमध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी अध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांना ते भेटले. अध्यात्माच्या माध्यमातून गावातील ग्रामस्थांत परिवर्तन करण्याची संकल्पना चांगली वाटत असली तरी त्यात त्यांना कितपत यश येईल हे सांगणे कठीण आहे. गेल्या 3 महिन्यात गिरणा काठाने केलेल्या परिक्रमेतून त्यांना काय जाणवले आणि त्याची निष्पत्ती काय? याला महत्व द्यावे लागेल. म्हणून गिरणा नदीच्या पुनरूज्जीवनासाठी अध्यात्मिम गुरूच्या मार्गदर्शनाबरोबरच अवैध वाळूचा उपसा करणाऱ्या वाळू माफिया राज संपुष्टात आणणे गरजेचे आहे. त्यासाठी खा. उन्मेश पाटलांना पुढाकार घ्यावा लागेल.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या