Sunday, November 27, 2022

शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपूल विलंबाचा तमाशा

- Advertisement -

जळगाव शहरातील शिवाजीनगरला जोडणाऱ्या शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपुलाच्या विलंबाचा तमाशा आता थांबला पाहिजे. दोन वेळा सहा सहा महिन्याची मुदत वाढ देऊन एप्रिल 2022 मध्ये पुलाचे बांधकाम पूर्ण होऊन रहदारी साठी खुला होणार, असे अखेरचे सांगण्यात आले होते. मात्र आता ऑगस्टपर्यंत या पुलाचे बांधकाम रखडणार असल्याचे नुकतेच सांगण्यात आले आहे. गेल्या दोन वर्षांपासून या पुलाचे बांधकाम रखडल्यामुळे शिवाजीनगर वासीय तसेच या परिसरातील ग्रामीण भागातील जनतेला मात्र नाहक त्रास होत आहे.

- Advertisement -

गेल्या तीन वर्षात कंत्राटदारांनी या पूल बांधकामाची अनेक कारणे दिली. आता निधी उपलब्ध नसल्याचे कारण पुढे करून पुढच्या बांधकामास विलंब होत आहे, असे कंत्राटदार आदित्य खटोड यांनी आपल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे. एक तर श्री श्री कन्स्ट्रक्शन कंपनीला एवढे मोठे काम करण्याचा अनुभव नसल्याने पुलाच्या बांधकामास विलंब होत असल्याचे खरे कारण आहे. यासाठी जळगावकरांच्या जीवाशी खेळ खेळणाऱ्या कंत्राटदाराला केवळ दंड आकारून चालणार नाही. त्यांना काळ्या यादीत टाकले पाहिजे. तरच पुढे आणखी असा त्रास जनतेला भोगावा लागणार नाही.

- Advertisement -

- Advertisement -

आज शिवाजी नगर उड्डाणपुलाच्या विलंबामुळे जनतेला होणाऱ्या त्रासाची मोजदाद कशी होणार ? या पुढच्या विलंबामुळे सर्व श्रमिक बांधकाम विभागाशी संलग्नित सर्व संस्था उघड्या पडलेल्या आहेत. पूर्वी अर्धे बांधकाम होते तेव्हा वीज वितरण कंपनीचे पोल काढणार कोण? कंत्राटदाराला दिलेल्या निविद्यात त्याचा उल्लेख नसल्याने हे विजेचे खांब काढल्याशिवाय पुढचे काम पूर्ण होऊ शकणार नाही, असे सांगून काम बंद ठेवण्यात आले. त्यानंतर खांब काढण्याचे काम दुसऱ्याला कंत्राटदाराला दिले गेले. खांब काढल्यावर कामाला सुरुवात झाली. त्यानंतर रेती नसल्याचे कारण पुढे करण्यात आले. त्यामुळे काम बंद पडले. अशा प्रकारची विविध कारणे पुढे करून तब्बल दीड वर्ष कामाला विलंब झाला. या कंत्राटदारावर नियंत्रण ठेवणाऱ्या शासकीय संस्था आणि त्यांचे अधिकारी हे काम करीत होते.

खरं तर शिवाजीनगर उड्डाण पुलाच्या बांधकामास विलंब होण्यास कंत्राटदार जबाबदार आहेत. त्याचबरोबर कंत्राटदारांवर नियंत्रण ठेवणाऱ्या सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी सुद्धा तितकेच जबाबदार आहेत. त्या अधिकाऱ्यांवर सुद्धा कारवाई होणे आवश्यक आहे. जिल्हा प्रशासनाचे प्रमुख म्हणून जिल्हाधिकारी यांनी देखील या पूल विलंबाच्या बाबतीत कठोर पाऊल उचलण्याची आवश्यकता होती. ती त्यांनी उचलली नाही, हे खेदाने म्हणावे लागेल. त्यानंतर आमचे लोक प्रतिनिधी सुद्धा यासाठी जबाबदार आहेत. जनतेचे प्रतिनिधित्व करणारे लोकप्रतिनिधी जनतेच्या प्रति जबाबदार बनतात. निवडणुकीत जनतेच्या मतावर निवडून येताना जनतेला आम्ही संवेदनशील राहू म्हणून टाहो फोडून सांगतात आणि एकदा निवडून आले की जनतेच्या समस्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात. म्हणून लोकप्रतिनिधींना शिक्षा फक्त जनताच देऊ शकते. आगामी निवडणुकीत अशा लोकप्रतिनिधींना घरचा रस्ता दाखवणे हीच खरी शिक्षा होऊ शकते.

एकंदरीत गेल्या तीन वर्षांपासून शिवाजीनगर उड्डाणपुलाच्या संदर्भात प्रसार माध्यमांनी जेवढ्या बातम्या प्रसारित केल्या तेवढ्या बातम्या आज पर्यंत कधीही झाल्या नाहीत. परंतु असे होऊन सुद्धा कंत्राटदार, सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी, लोकप्रतिनिधी यांना कसलेही सोयरेसुतक नाही. शिवाजीनगर पुलाचे बांधकमा संदर्भात जश्या तक्रारी येत आहेत, तशा पद्धतीच्या औरंगाबाद- जळगाव महामार्गाच्या संदर्भात येत आहेत. कुसुंब्यापासून अजिंठा चौफुली पर्यंत महामार्गाचे काम अत्यंत कासवगतीने सुरू आहे. त्यामुळे रेमंड चौफुली ते अजिंठा चौफुली दरम्यान होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे वाहनधारक त्रस्त झाले आहेत.

एक तास वाहनधारकांना थांबून राहावे लागते. सध्या पेट्रोल डिझेलचे दर आकाशाला भिडले आहेत. अशात वाहनधारकांच्या होणाऱ्या कोंडीमुळे पेट्रोल डिझेलचा भुर्दंड वाहनधारकांना सहन करावा लागत आहे. सोबत जनतेचा अमूल्य वेळ जातो, त्याचे काय ? या रस्त्याचे काम सुद्धा खटोड कंपनीने घेतल्याचे कळते. या रस्त्याच्या कामाला जेव्हा शुभारंभ झाला तेव्हा, विहित वेळेत काम पूर्ण होईल अशी गर्जना करणारे कंत्राटदार, लोकप्रतिनिधी आता गप्प का ? एकीकडे केंद्रीय रस्ते महसूल मंत्री नितिन गडकरी यांनी भारतात दररोज 38 किलो मीटर सरासरी रस्ते तयार होतात, हे जगात रेकॉर्डब्रेक असल्याचे सांगतात आणि दुसरीकडे कासवाच्या गतीने रस्ता जळगाव मध्ये होतो.

तो ही रेकॉर्ड ब्रेक म्हणावा का ? अजिंठा चौफुली पासून रेमंड चौफुली पर्यंत दुचाकी आणि सायकलने जाणाऱ्यांचे तर हाल पहावत नाहीत. या सर्व प्रकारच्या संदर्भात जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी लक्ष घालण्याची गरज आहे. त्यांनी पुढाकार घेतला तरच अशा कामांना गती मिळेल आणि जनतेचे हाल थांबतील. खोटे नगर ते कालिंका माता या शहरातून जाणाऱ्या आठ किलोमीटर महामार्गाचे चौपदरीकरणाची कथाही अशीच आहे. या चौपदरीकरणारत सुद्धा विलंब झाला आहे, यात वाद नाही.

तथापि या महामार्गावर आकाशवाणी चौक, इच्छादेवी चौक आणि अजिंठा चौफुलीत बनवण्यात आलेली रोटरी सर्कल सदोष असल्याने अपघाताला निमंत्रण देणारे आहेत. तिन्ही रोटरी सर्कलच्या ठिकाणी अपघात होत आहेत. वाहतुकीची कोंडी होतेच आहे. यापुढे या सर्कलच्या ठिकाणी वाहतूक कोंडी बनणार आहे. अपघात वारंवार होत असतील तर स्थानिक खासदाराच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीने तसा अहवाल पाठवला तर त्यावर केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री मंत्रालयातर्फे तातडीने उपाय योजना केली जाईल, असे केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी लोकसभेत नुकतेच भाषणात सांगितले. परंतु आमच्या लोकप्रतिनिधींकडून ही अपेक्षा पूर्ण होत नाही हे दुर्दैवाने म्हणावे लागते.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या