अवैध वाळू वाहतुकीने आणखी किती बळी घेणार ?

0

जळगाव जिल्ह्यासाठी अवैध वाळू वहातूक आणि वाळू माफिये ही डोकेदुखी ठरतेय. काल मोहाडी रोडवर 13 वर्षाच्या सुजय सोनवणे या बालकाच्या हृदयद्रावक मृत्यूने मन सुन्न झाले. सुजय सोनवणे हा मृत बालक मोहाडीचे उपसरपंच गणेश सोनवणे यांचा मुलगा आहे. मोहाडी गावापासून अवघ्या काही अंतरावर वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरने त्याला चिरडले. बुधवारी सकाळी ठिक 11.20 वाजता सेंट टेरेसा इंग्लिश मिडियममध्ये चौथ्या इयत्तेत शिकणारा सुजय नेहमीप्रमाणे मोहाडीतील राजू गवळींबरोबर दुचाकीवर बसून मोहाडीला घरी येत होता.

जळगाव – मोहाडी रोडवर लांडोरखोरी उद्यानाजवळ उतारावर खराब रस्त्यावर दुचाकी स्लिप झाली आणि 13 वर्षाचा सुजय रस्त्यावर फेकला गेला तो समोरून येणाऱ्या भरधाव वाळू डंपरच्या मागच्या चाकाखाली सापडून चिरडला गेला. दुचाकी स्वार सुदैवाने थोडक्यात बचावला. सुजयच्या अपघाताचे वृत्त वाऱ्यासारखे पसरले. सर्वत्र हाहाकार माजला. सुजयच्या नातेवाईक महिलांनी तर अक्षरश: हंबरडा फोडला. ही घटना पाहून लोकांनी वाळू वाहतुकीच्या डंपरवर दगडफेक केली. डंपरच्या काचा फोडल्या. डंपरचालकास पोलिसांनी अटक केली आहे. त्याचेवर पोलिस कारवाई होईल.

मृत सुजय मात्र पुन्हा मिळणार नाही. मृत बालक सुजय याची कौटुंबिक पार्श्‍वभूमी राजकीय घराण्याची आहे. जि.प. सदस्य प्रभाकर सोनवणे आणि नगरसेविका अंजना सोनवणे यांचा तो नातू आहे. मोहाडीचे उपसरपंच गणेश सोनवणे यांचा तो मुलगा आहे. या दुर्घटनेमुळे संपूर्ण मोहाडी गावात हळहळ व्यक्त होत होती. परंतु याची गंभीरपणे दखल घेणारी यंत्रणा हवी. अन्यथा असे अनेक सुजय अपघातात मरण पावतील. अवैध वाळू वाहतूक मात्र चालूच राहील.

चोपड्याचे माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांचा मुलगा सुध्दा खराब रस्त्याचा बळी ठरला. महामार्गावरील खड्ड्यांमुळे दुचाकीच्या अपघातात त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे खराब रस्ते आणि अवैध वाहतूक यावर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा कुचकामी ठरतेय.

जळगाव शहरातून मोहाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर प्रचंड प्रमाणात वाहतूक वाढलेली आहे. वाढती वाहतूक आणि रस्त्यावरून जाणारी मोठ्या प्रमाणातील वाहने लक्षात घेऊन एकतर रस्त्याचे रूंदीकरण होणे आवश्‍यक आहे. त्याचबरोबर या रस्त्यावरून अवजड वाहनांची होणारी वाहतूक लक्षात घेऊन त्या दृष्टीने रस्ता दुरूस्त करणे आवश्‍यक आहे.

 

 

अवघ्या तीन मिटर रस्त्यावरून होणारी प्रचंड वाहतूक, त्यातल्या रस्त्याच्या साईड पट्ट्यावर पडलेली खडी आणि दगड यामुळे वाहन चालकांना कसरतच करावी लागते. विशेषत: अवजड वाहनांना चुकवत दुचाकी चालविणे त्यापेक्षा जास्त कसरत करावी लागते. त्यामुळेच सुजय ज्या दुचाकीवर बसला होता ती दुचाकी स्लिप झाली आणि सुजयला वाळू डंपरने चिरडले. या अपघातानंतर तरी प्रशासनाला जाग येईल का ? का जाग येणार नाही. प्रशासनाच्या प्रत्येक विभागाने डोळ्यावर झापड लावलेली आहे.

 

जळगाव शहरातील आकाशवाणी चौकातील महामार्गावर रोटरी सर्कल बनविण्यात आले आहे. हे सर्कल बांधून झाल्यापासून अपघाताचे प्रमाण वाढले आहे. या सर्कलच्या आजुबाजूला जेवढी जागा हवी तेवढी जागा अतिक्रमणामुळे मिळत नाही. महामार्गावर असलेले तापी पाटबंधारे कार्यालयाचे अतिक्रमण काढले जावे असे हे सर्कल होण्याआधीपासून मागणी होत आहे. महामार्ग प्राधिकरणाने तशी मागणी केली. जिल्हाधिकाऱ्यांनी सुध्दा तसे आदेश पाटबंधारे विभागाला दिले गेले पण तापी पाटबंधारेेचे अतिक्रमण जैसे थे आहे. या प्रकाराला काय म्हणावे? अतिक्रमण हटविले गेले नसल्याने अरूंद रस्त्यामुळे जेव्हा अपघात होऊन काही जणांचा बळी जाईल तेव्हा तुम्ही ते अतिक्रमण काढणार आहात काय?

 

जिल्ह्याचे प्रशासन प्रमुख म्हणून जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी याबाबत तातडीने योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी होतेय त्याची दखल घ्यावी त्याचबरोबर जळगाव मोहाडी रोडवरून होणारी गिरणा नदीतील वाळू वाहतूक दुसरीकडून वळवता येईल का ? याबाबतीत तातडीने विचार विनिमय होऊन निर्णय घ्यावा अन्यथा असे अनेक सुजय या रोडवरील अपघातात बळी जातील. त्यासाठी योग्य प्रशासन आणि योग्य लोक प्रतिनिधी असणे आवश्‍यक आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.