अखेर केळीला मिळाला फळाचा दर्जा…!

0

खान्देश आणि विशेषत: जळगाव जिल्हा हा केळी पिकविणारा जिल्हा म्हणून महाराष्ट्रात नव्हे तर भारतात ओळखला जातो. देशातील एकूण केळी उत्पादनाच्या 30 टक्के केळीचे उत्पादन एकट्या जळगाव जिल्ह्यात होत असते. तथापि अलिकडे जळगाव जिल्ह्यातील केळीचे क्षेत्र कमी होत चालले आहे. केळी उत्पादक शेतकऱ्यांनी केळीऐवजी इतर पिके घेण्याकडे आपला मोर्चा वळविला आहे. जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादनाचे क्षेत्र कमी होण्याची कारणे आहेत. त्यापैकी केळी पिकासाठी पाणी फार लागते. तसेच वर्ष सव्वा वर्षे भर पाणी दिल्यानंतर केळीला मिळणारा भाव स्थिर नाही.

जळगावची केळी उत्तर भारतात प्रामुख्याने जाते आणि तेथील बाजारपेठेवर केळीला मिळणारे भाव अवलंबून असतात. उत्तर भारतात केळीची वाहतूक रेल्वेद्वारे आणि मालट्रकद्वारे या दोन मार्गाने केली जाते. रेल्वेने केळी वाहतूक स्वस्त पडते. परंतु रेल्वेचे वॅगन वेळेवर उपलब्ध होत नाही ही बाब गंभीर आहे. त्यातच रेल्वे वॅगनचे भाडे यात सवलत मिळावी ही खान्देशातील केळी उत्पादक शेतकऱ्यांची जुनी मागणी आहे. परंतु ती सवलत केळी उत्पादकांना मिळत नाही. त्याचबरोबर आता पर्यंत केळीला फळाचा दर्जा मिळाला नसल्याने केळी हे नाशवंत प्रकारात मोडते. हे रेल्वे खाते मान्य करायला तयार नव्हते.

जळगावची केळी एका रेल्वे धक्क्यावरून वॅगनमध्ये भरल्यानंतर त्या केळीने वॅगन अमूक इतक्या कालावधीत नियोजित स्थळी पोहोचण्याची शाश्‍वती नव्हती. कारण केळी फळाचा दर्जात बसत नव्हते. त्यामुळे केळी नाशवंत आहे. हे मानायला रेल्वे खाते तयार नव्हते. म्हणून नियोजित वेळेत केळी पोहोचली नाही तर ती केळी वॅगनमध्ये खराब व्हायची, खराब झाली. तिला भाव कमी मिळत असे. केळीला फळाचा दर्जा नसल्यामुळे केळी उत्पादकाला या दुष्टचक्राचा सामना करावा लागत असे. म्हणून गेल्या अनेक वर्षापासून केळीला फळाचा दर्जा मिळावा ही जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांची मागणी होती. ती आता पूर्ण झाली आहे. परंतु हे एक कारण जळगाव जिल्ह्यातील केळीचे क्षेत्र कमी होण्यामागे आहे.

रस्ते मार्गाने मालट्रकद्वारे केळी वाहतूक ही महाग पडते. दिवसेंदिवस पेट्रोल – डिझेलचे भाव वाढत असल्याने ट्रकचे भाडे वाढतच आहे. हे ट्रकचे भाडे शेतकऱ्यांना परवडणारे नसल्याने केळी उत्पादक त्रस्त झाले आहेत.

केळीचे पीक आतापर्यंत रोगमुक्त होते. तथापि गेल्या काही वर्षापासून ग्लोबल वार्मिंगमुळे केळीसुध्दा करपा आदि रोगाच्या प्रादुर्भावाने ग्रासली आहे. त्यामुळे केळीवर सुध्दा औषध फवारणी करावी लागत असल्याने केळीचा उत्पादन खर्चसुध्दा वाढला असल्याने केळी उत्पादक शेतकरी केळीचे पिक घेण्याऐवजी इतर पिके घेत आहेत. त्यामुळे सुध्दा केळीचे क्षेत्र घटत चालले आहे.

आता नवीन तंत्रज्ञानामुळे टिश्‍युकल्चरची रोपे वापरून आणि ठिबक सिंचनद्वारे पाणी देऊन केळीचे पीक महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यात तसेच भारतातील इतर राज्यात केळीचे उत्पादन घेतले जात आहे. त्यामुळे संपूर्ण भारतात आता केळीचे पीक घेतले जात असल्याने जळगावच्या केळीला इतर मार्केट मिळणे सुध्दा जिकरीचे झाले आहे.

गुजरात राज्यात गेल्या 15-20 वर्षात केळी उत्पादनाचे क्षेत्र झपाट्याने वाढले आहे. वाढत्या क्षेत्राबरोबर गुजरातच्या केळीचा दर्जासुध्दा उच्च प्रतिचा आहे. त्यामुळे गुजरातची केळी इतर देशात मोठ्या प्रमाणात निर्यात होत असल्याने गुजरातच्या केळी उत्पादक शेतकऱ्याची आर्थिक स्थिती झपाट्याने वाढली आहे, वाढत आहे. जळगाव जिल्ह्यातील केळी परदेशात निर्यात प्रमाण अत्यल्प आहे. त्यामुळे जळगावचा केळी उत्पादक शेतकरी आहे तसाच राहिला.

खान्देशातील विशेषत: जळगाव जिल्ह्यातील केळीची प्रत वाढविण्यासाठी गेल्या अनेक वर्षापासून केळी संशोधन केंद्र सुरू करण्यात आले असले तरी त्या केंद्राचे कार्य अत्यंत मर्यादित असून त्याचा शेतकऱ्यांना पाहिजे तसा फायदा होत नाही हे नाईलाजाने म्हणावे लागते. त्याचबरोबर टिश्‍युकल्चरची रोपे आणि ठिंबक सिंचनासाठी शासनातर्फे जेवढे अनुदान मिळायला हवे ते मिळत नसल्याने उच्च प्रतिची केळी आणि भारी उत्पादन देणारे केळीचे उत्पादन शेतकऱ्यांना मिळत नाही म्हणून केळीचे क्षेत्र कमी होत आहे.

जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादकांना केळीला पाणी देण्यासाठी जी मुबलक वीज स्वस्त दरात मिळाली पाहिजे ती सुध्दा मिळत नाही. म्हणून केळी उत्पादक शेतकरी कमी कालावधीत येणारी पिके घेण्याकडे वळत आहे. परंतु आता केळीला फळाचा दर्जा मिळाल्यामुळे फळासाठी जे फायदे मिळतात ते फायदे केळी उत्पादनाचे क्षेत्र वाढण्यास तसेच उच्च प्रतिच्या केळीची निर्मिती करण्यास जिल्ह्यातील शेतकऱ्याना प्रोत्साहन मिळेल.

Leave A Reply

Your email address will not be published.