फडणविसांचे वजन वाढले !

0

देशातील 5 राज्यांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. पंजाब वगळता उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूर आणि गोवा या चार राज्यांमध्ये भाजपने सत्ता काबीज केली आहे. पंजाबमध्ये अरविंद केजरीवालांच्या आम आदी पक्षाने निर्विवाद बहुमत प्राप्त केले आहे. आप आदमी पक्षाने निवडणुकीत मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून भगवंत मान यांना जाहीर केले होते. केजरीवालांनी केलेली पंजाबच्या मुख्यमंत्रीपदासाठीचे भगवंत मान हे उमेदवार योग्य असल्याचे या निवडणूक निकालाने सिध्द केले आहे. उत्तर प्रदेशात भाजपने पुन्हा बाजी मारली असून 30 वर्षानंतर पहिल्यांदाच दुसऱ्यावेळी सत्ता प्राप्त करणारे योगी आदित्यनाथ ठरले आहेत. तो मान त्यांनी भाजप पक्षाच्या माध्यमातून मिळविला आहे.

उत्तराखंड, मणिपूरमध्ये भाजप सत्ता प्राप्त करणार हे स्पष्ट होते. परंतु गोवा राज्यात मात्र भाजपने पूर्ण बहुमत प्राप्त केले. हे मात्र अपेक्षित नव्हते. परंतु गोवा राज्याचे भाजपचे निवडणूक प्रभारी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची व्यूहरचना यशस्वी ठरली. निवडणुकीआधी अनेक प्रकारच्या वल्गना विरोधकांकडून केल्या जात होत्या. गोव्याचे माजी मुख्यमंत्री कै. मनोहर पर्रीकर यांचे सुपूत्र उत्पल्ल पर्रिकवर यांनी केलेली बंडखोरी भाजपला भोवणार असे चित्र निर्माण झाले होते. उत्पल पर्रिकरांना विरोधी सर्व पक्षांनी निवडणुकीत पाठिंबा दिला होता. तथापि 800 मतांनी त्यांचा पराभव झाला. उत्पल पर्रिकरांना पणजीऐवजी इतर मतदार संघातून भाजपतर्फे तिकीटाची ऑफर दिली होती. त्यांनी ती नाकारली आणि पणजी विधानसभा मतदार संघातूनच उमेदवारी हवी असा हट्ट धरला. तो हट्ट पूर्ण झाला नसल्याने त्याने बंडखोरी करून पणजीतून आपण म्हणून निवडणूक लढविली आणि पराभूत झाले.

देशपातळीवर उत्तरप्रदेशसह चार राज्याच्या निवडणुका भाजपे जिंकून आपले देशातील स्थान पक्के केले असले तरी गोवा राज्याच्या निवडणुकीत भाजपने पूर्ण बहुमत प्राप्त करून काँग्रेसला मोठा धक्का दिला. त्यामुळे गोव्यात भाजपला तोडफोड करून सत्ता प्राप्त करण्याची गरज भासली नाही. त्याचे सर्व श्रेय गोवा राज्याचे भाजप प्रभारी देवेंद्र फडणवीस यांना द्यावे लागेल. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचे केंद्रातील भाजप गोटात वजन वाढले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ते विशेष मर्जितले आहेतच परंतु गोवा राज्याच्या निवडणूक निकालाने देवेंद्र फडणविसांनी पंतप्रधान मोदी यांची विशेष मर्जी प्राप्त केलीय. त्यामुळे महाराष्ट्रात आगामी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये केंद्रातील भाजप सरकारकडून विशेषत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून भक्कमपणे पाठिंबा मिळणार यात शंका नाही. गोवा विधानसभा निवडणुकीच्या निकालासंदर्भात बोलतांना देवेंद्र फडणविसांनी सूतोवाच केले की, 2024 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपतर्फे घवघवीत बहुमत प्राप्त करेल. त्यांच्या या विधानात जोश व आत्मविश्‍वास होता. तसेच महाराष्ट्रातील आघाडी सरकारला एकप्रकारे त्यांनी इशाराच दिलेला आहे.

देशातील चार राज्याच्या निवडणुकीत भाजपतर्फे सत्ता प्राप्त झाल्यानंतर महाराष्ट्रात ठिकठिकाणी भाजपतर्फे जल्लोष करण्यात आला. तो जल्लोष करणे क्रमप्राप्त होते. त्यांनी तो का करू नये. जळगाव जिल्ह्याच्या ठिकाणी जळगाव शहराचे आमदार राजू मामा भोळे यांचे नेतृत्वात जोरदार जल्लोष व शक्ती प्रदर्शन केले. भाजप कार्यालयासमोर जेसीबी आणून हा जल्लोष केला गेला. या जल्लोषचा जनतेवर एकप्रकारे मानसिक परिणाम होतो. जळगाव शहराचे भाजपचे आमदार राजूमामा भोळे यांच्या अकार्यक्षमतेविषयी लोकांमध्ये उलट सुलट चर्चा सुरू झाली होती. येत्या निवडणुकीत त्यांच्या उमेदवारीबाबत प्रश्‍नचिन्ह उपस्थित केला जात होता आणि केला जात आहे.

तथापि देशातील या चार राज्याच्या निवडणूक निकालामुळे भाजप उमेदवारांना बळ निर्माण झाले आहे. सुक्याबाहेर ओलेही जळते. म्हणतात तशी स्वप्ने ही मंडळी पहात आहेत. परंतु म्हणून निवडणुकीला दोन वर्षांचा कालावधी आहे. दरम्यान पुलाखालून बरेच पाणी वाहून जाणार आहे. त्यामुळे आपण काहीही विकास कामे केली नाही तरी निवडून येवूच अशी स्वप्ने त्यांनी पाहू नये. त्यांनी आपली कार्यक्षमता दाखविलीच पाहिजे. दे रे हरी पलंगावरी अशा प्रकारची स्वप्ने पहाणाऱ्यांची काही खैर नाही. कारण या चार राज्याच्या निवडणूक निकालानंतर आ. राजूमामा भोळे यांनी आपली जोशपूर्ण प्रतिक्रिया व्यक्त केली. असली तरी आगामी काळात जळगाव शहराच्या विकासावर जर स्वत:चा ठसा उमटविला नाही तर जळगाववासीय तुम्हाला तुमची जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही. त्याचबरोबर महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांचा आदर्श घ्यावा. दिल्लीमध्ये आम आदमी पार्टीने रचनात्मक काम करून पंजाबमध्ये मुसंडी मारली आहे. केवळ सत्ताधाऱ्यांवर आदळआपट करून किंवा केंद्राच्या दडपशाहीने दबाव आणण्याने सत्ता प्राप्त होईल या भ्रमात त्यांनी राहू नये.

Leave A Reply

Your email address will not be published.