पॉर्न कंटेंट निर्मितीत सहभागी कंपनीचा पर्दाफाश; संचालक दाम्पत्य अटकेत, ईडीची मोठी कारवाई
नोएडा वृत्तसंस्था
ईडीने (अंमलबजावणी संचालनालय) पॉर्न साईट्ससाठी कंटेंट तयार करणाऱ्या एका कंपनीचा पर्दाफाश करत, संबंधित कंपनीचे संचालक दाम्पत्याला अटक केली आहे. या कारवाईनंतर चौकशीत अनेक धक्कादायक बाबी उघड झाल्या असून, विदेशी आर्थिक व्यवहारांचा सखोल तपास सुरु आहे. नोएडाच्या सेक्टर 105 मधील एका भाड्याच्या बंगल्यात ही सर्व शुटिंग प्रक्रिया पार पडत असल्याचे समोर आले आहे.
बंगल्यात ‘स्टुडिओ सेटअप’, अॅडल्ट कंटेंटचे चित्रीकरण
ईडीच्या तपासात असे स्पष्ट झाले आहे की, या दुमजली बंगल्याचा एक भाग स्टुडिओमध्ये रूपांतरित करण्यात आला होता. येथे दररोज सकाळी 11 ते दुपारी 12 च्या सुमारास मॉडेल्स येत असत आणि दुपारी 3-4 वाजेपर्यंत शूटिंग पूर्ण करून निघून जात असत. या शूटिंगमध्ये अॅडल्ट वेबकॅम कंटेंट तयार केला जात होता. दररोज अशा प्रकारचे एक किंवा अधिक व्हिडीओ तयार केले जात असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
स्थानिक पोलीस अनभिज्ञ; ईडीकडून थेट कारवाई
या प्रकरणाची माहिती नोएडा पोलिसांना पूर्वीपासून देण्यात आलेली नव्हती. सेक्टर 39 पोलीस ठाण्यात यासंदर्भात कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नसल्याचे अधिकृत सूत्रांनी स्पष्ट केले. मात्र, डीसीपी रामबदन सिंह यांनी स्थानिक पोलीस यंत्रणाही आपल्यापातळीवर तपास करत असल्याची माहिती दिली.
व्हिडीओ शुटिंग आणि फिल्म मेकिंगमध्ये अनुभव असलेल्या जाणकारांनी सांगितले की, अॅडल्ट व्हिडीओ तयार करताना सरासरी 20 ते 45 मिनिटांपर्यंत शूटिंग चालते. सेट तयार करणे, कलाकारांचे सज्ज होणे, आणि इतर तयारीसाठी सुमारे 3 ते 5 तास लागू शकतात.
ईडीच्या चौकशीत या कंपनीच्या परकीय आर्थिक व्यवहारांची सखोल छाननी करण्यात आली असून, अंदाजे 22.66 कोटी रुपयांच्या अवैध निधीचा वापर या उद्योगात झाल्याची माहिती समोर आली आहे. अटक करण्यात आलेल्या दाम्पत्याचा संबंध कथितपणे सायप्रस येथील टेक्टनीऊस लिमिटेड या कंपनीशी असल्याचंही समोर आलं आहे. या नावावरूनच नोएडामध्ये शूटिंगसाठी सुविधा उभारण्यात आल्या होत्या.
या प्रकरणात सहभाग असलेल्या तीन मॉडेल्सचे जबाब ईडीकडून नोंदवण्यात आले आहेत. तसेच, शुटिंगमधून कमावलेल्या पैशांचे आर्थिक स्रोत, त्यांचा वापर आणि संभाव्य परकीय लिंक यांची चौकशी सुरू आहे.