लोकशाही न्यूज नेटवर्क
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इकबाल कासकरवर ईडीने मोठी कारवाई केली आहे. इकबाल कासकरचा ठाण्यातील फ्लॅट आता ईडीने ताब्यात घेतला आहे. ठाणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाकडे 2017 साली इकबाल कासकर विरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. ही प्रॉपर्टी खंडणीच्या माध्यमातून बळकावण्यात आली होती. दाऊद इब्राहिमचा भाऊ इकबाल कासकर आणि त्यांच्या इतर साथीदारांवर मनी लॉन्ड्रींग प्रकरणात ईडीने कारवाई केली होती.
या कारवाईत ठाण्यातील घोडबंदर रोडवर असलेल्या कासकरच्या फ्लॅटवर ईडीने जप्ती आणली होती. तो फ्लॅट आता ईडीने ताब्यात घेतला आहे, याबाबतची नोटीस देखील इडीने फ्लॅटच्या दारावर लावली आहे. घोडबंदर येथील कावेसर मधील नियोपोलीस टॉवरमध्ये कासकरने हा फ्लॅट घेतला होता. याची किंमत 75 लाख इतकी आहे. 2017 साली इकबाल कासकरने हा फ्लॅट बिल्डर सुरेश मेहता आणि त्याची फर्म दर्शन इंटरप्रायजेसला धमकावून घेतला होता.
याबाबत ठाणे गुन्हे शाखा आणि खंडणी विरोधी शाखेत गुन्हा दाखल होता. खंडणी, धमकावणे, मनी लॉन्ड्रिंग आणि विविध गुन्ह्यांमध्ये इकबाल कासकर सध्या कारागृहात शिक्षा भोगत आहे. धक्कादायक बाब म्हणजे ईडीने कासकरचा जो फ्लॅट सील केलाय, त्यात कासकरच्या फॅमिलीने 15 दिवसांपूर्वी सील तोडून घरात प्रवेश केला होता, अशी माहिती इमारतीच्या सदस्यांनी दिली आहे.
इकबाल कासकर आणि त्याचे सहकारी मुमताझ शेख आणि इसरार सईद यानी अनेक बिझनेसमनना धमकावून त्यांच्याकडून पैसे जमा केले होते तसेच त्यांची संपत्ती बळकावलेली. मुमताज शेखच्या नावावर प्रॉपर्टी करण्यासाठी बिल्डरवर दबाव टाकण्यात आला होता. तपास यंत्रणेने PMLA अंतर्गत आरोपपत्र दाखल केलं. खंडणीशी संबंधित अनेक आरोप होते.