‘ईडी’कडून जप्त केलेल्या मालमत्ता देण्यास सुरुवात

फसवणूक झालेल्या बँकांना आधार

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

आर्थिक फसवणूक झालेल्या ‘पीएनबी’ व ‘आयसीआयसीआय’ यांसारख्या बँकांना सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) मदतीचा हात मिळणार आहे. मेहुल चोक्सी व मनी लाँड्रिंग प्रकरणांमध्ये जप्त केलेली कोट्यवधींची मालमत्ता ‘ईडी’कडून संबंधित बँकांसह अन्य संस्थांना देण्यात येणार आहे. यामुळे बँकांसह खातेधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

सन 2014 ते 2017 कालावधीत चोक्सीने पंजाब नॅशनल बँकेच्या (पीएनबी) सहयोगी आणि अन्य बँक अधिकाऱ्यांशी संगनमत करत सहा हजार 97 कोटींची फसवणूक केली. याचा तपास करताना ‘ईडी’ने चोक्सीशी संबंधित 2,565.60 कोटींची मालमत्ता जप्त केली होती. ती संबंधित बँकांना देण्यासाठी ‘ईडी’ने विशेष पीएमएलए न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्याला मान्यता मिळाल्यानंतर 125 कोटींहून अधिक किंमतीची मालमत्ता मेसर्स गीतांजली जेम्स लिमिटेडच्या अवसायनकर्त्याकडे (लिक्विडेटर) सुपूर्द करण्यात आली आहे.

बँक घोटाळ्याचा तपास करताना ‘ईडी’ने देशभरात 136हून अधिक ठिकाणी छापे टाकत शोधमोहीम राबवली होती. यात मौल्यवान दागिने, विविध कंपन्यांचे समभाग, स्थावर मालमत्ता, वाहने, बँक खाती, कारखाने, सदनिका, गोदाम यांचा समावेश होता. आत्तापर्यंत सांताक्रूझमधील खेनी टॉवरमधील सदनिका, सीप्झमधील भूखंड आणि इमारती अशी मालमत्ता हस्तांतरित करण्यात आली आहे. उर्वरित मालमत्ताही संबंधित सर्व अवसायनकर्ते व बँकांकडे सुपूर्द करण्यात येत आहे, अशी माहिती ‘ईडी’कडून देण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.