धर्माबाद, लोकशाही न्यूज नेटवर्क
निराधार योजनेतील लाभार्थ्यांना आता डीबीटीद्वारे थेट आधार लिंक असलेल्या बँक खात्यात अनुदान जमा होणार आहे. त्यामुळे तालुक्यातील सर्वच निराधार योजनेतील लाभार्थ्यांना ई-केवायसी करून घेण्यासाठी कर्मचारी, सुविधा केंद्र व सामाजिक कार्यकर्ते यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन धर्माबादच्या तहसीलदार श्रीमती सुरेखा स्वामी यांनी केले आहे.
संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांना मंत्रालयातून डिसेंबर २०२४ पासून थेट डीबीटी द्वारे आधार कार्ड संलग्नित असलेल्या बँक खात्यात अनुदान जमा होणार आहे. त्यामुळे लाभार्थ्यांनी आधार बँक खात्याला लिंक करणे आवश्यकच आहे तरच लाभमिळणार आहे.
संजय गांधी निराधार विभाग शहर व तालुक्यातील बहुतांशी लाभार्थ्यांनी ई केवायसी केली आहे. ज्यांचे ज्यांचे ई-केवायसी राहिलेले आहेत त्यांनी आधार कार्ड, आधार संलग्न मोबाईल क्रमांक बँक खाते दर्शवणारे पासबुक आदी सर्व कागदपत्रे जमा करून ई-केवायसी करून घ्यावी तरच यापुढे मिळणाऱ्या अनुदानाचा लाभ लाभार्थ्यांच्या खातात जमा होणार असल्याची माहिती तहसीलदार श्रीमती सुरेखा स्वामी यांनी दिली.
संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांची ई-केवायसी करून घेण्यासाठी सर्वत्रच झुंबड उडत आहे. पण बरेच लाभार्थी वयोवृद्ध व निरक्षर असल्यामुळे त्यांची कुचंबना होत आहे. त्यामुळे संबंधित विभागाच्या विभाग प्रमुख श्रीमती फिरदोस यांनी स्वतः केवायसी करून देण्याचा उपक्रम तहसीलमध्येच चालू केला आहे.