
लोकशाही न्यूज नेटवर्क
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांनी ८ मे रोजी इयत्ता दहावीचा ऑनलाईन निकाल जाहीर केला. मात्र, निकाल जाहीर होऊन चार ते पाच दिवस उलटूनही राज्यातील अनेक विद्यार्थ्यांना आपला निकाल पाहता आलेला नाही. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली आहे.
पुणे विभागीय मंडळात तब्बल ११७ विद्यार्थ्यांचा निकाल राखून ठेवण्यात आला होता. या विद्यार्थ्यांना मोबाईलवर व्हॉट्सअॅपद्वारे ऑफलाइन पद्धतीने निकाल कळवावा लागला. परिणामी, निकालाच्या दिवशी मंडळाच्या कर्मचाऱ्यांना रात्री उशिरापर्यंत कार्यालयात थांबून काम करावे लागले.
सामान्यतः कॉपी प्रकरण, परीक्षेदरम्यान गैरप्रकार किंवा नियमभंग अशा कारणांमुळे निकाल राखीव ठेवला जातो. मात्र, कोणताही गैरप्रकार न करता देखील अनेक विद्यार्थ्यांचा निकाल प्रलंबित राहिल्याने पालक संतप्त झाले आहेत. शाळांकडे संपर्क साधूनही स्पष्ट माहिती मिळत नसल्याने विद्यार्थ्यांचे मानसिक तणावात दिवस जात आहेत.
पुण्यातील भोसरी येथील रहिवासी संदीप थोरात यांनी सांगितले की, “माझ्या मुलीचा निकाल अद्याप लागलेला नाही. चार दिवस झाले तरी बोर्डाकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. नातेवाईक आणि मैत्रिणी सतत निकालाबाबत विचारत असल्याने मुलगी तणावाखाली आहे.”
मुंबई विभागीय मंडळातून परीक्षा दिलेल्या आकांक्षा नाईक हिच्या वडिलांनी सांगितले की, “निकाल न दिसल्याने आमच्या मुलीने जेवणही सोडले आहे. बोर्डाकडून सोमवारी माहिती देऊ असे सांगण्यात आले आहे.” आकांक्षाला ९२ टक्क्यांहून अधिक गुण मिळण्याची अपेक्षा असल्याचेही त्यांनी नमूद केले.
जेजुरी येथील जिजामाता इंग्लिश मीडियम स्कूलची विद्यार्थिनी श्रेया वाईकर हिचा निकालही अद्याप जाहीर झालेला नाही. बोर्डाकडून कोणतेही स्पष्ट उत्तर मिळत नसल्याने पालक संभ्रमात आहेत. श्रेयाचा भाऊ श्रीनाथ वाईकर यांनी सांगितले की, “बोर्ड अधिकाऱ्यांना भेटून आलो. दोन दिवसांत निकाल लागेल असे सांगितले होते. मात्र आता पाचवा दिवस उजाडला तरी निकाल लागलेला नाही.”
दरम्यान, या संदर्भात मुंबई मंडळाचे प्रमुख दीपक माळी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र त्यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया मिळू शकली नाही. यंदाचा दहावीचा राज्य निकाल ९२.०९ टक्के लागला असून, मागील वर्षाच्या तुलनेत निकालात सुमारे २ टक्क्यांची घसरण झाली आहे. कोकण विभागाने ९७.६२ टक्क्यांसह राज्यात अव्वल स्थान मिळवले, तर छत्रपती संभाजीनगर विभागाचा निकाल सर्वात कमी म्हणजे ८८.४१ टक्के लागल्याची माहिती राज्य मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी दिली.

