फैजपूर, ता. यावल
येथील आदिवासी मुलांच्या शासकीय वसतिगृहात दारूच्या नशेत येऊन कर्मचाऱ्याला शिवीगाळ, धक्काबुक्की तसेच सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 23 जुलै 2026 रोजी दुपारी सुमारे 3.30 वाजता फैजपूर येथील आदिवासी मुलांच्या शासकीय वसतिगृहात ही घटना घडली. फिर्यादी विनोद सुकदेव तायडे (वय 45), कनिष्ठ लिपिक, हे शासकीय कामकाज करत असताना आरोपी साहील ऊर्फ संजय हमीद तडवी (रा. फैजपूर, ता. यावल) हा दारूच्या नशेत वसतिगृहात आला. फिर्यादीनुसार, आरोपीने गृहपालाबाबत विचारणा करत अश्लील शिवीगाळ सुरू केली.
दरम्यान कर्मचाऱ्यांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने फिर्यादीला धक्काबुक्की करून खांद्यावर मारहाण केली. तसेच शिवीगाळ करत सरकारी कर्मचाऱ्याला धमकावून शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमे तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रशीद तडवी करीत आहेत.

