ड्रग्स पेडलर अबरार अखेर जाळ्यात
दहा महिन्यांनंतर अटक; २९ पर्यंत पोलीस कोठडी
आंतरराज्यीय ड्रग्स कनेक्शन उघड होण्याची शक्यता
जळगाव : शहरातील शाहूनगर परिसरात झालेल्या एमडी ड्रग्स कारवाईतील मुख्य सूत्रधार म्हणून ओळखला जाणारा मास्टर कॉलनीतील शेख अबरार शेख मुक्तार उर्फ अबरार जिलानी अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. तब्बल दहा महिन्यांपासून पसार असलेल्या अबरारला मालेगावात ड्रग्स विक्री करताना अटक करण्यात आल्यानंतर, जळगाव उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या पथकाने त्याला नाशिक कारागृहातून ताब्यात घेतले. न्यायालयात हजर केले असता, त्याला दि. २९ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
शहर पोलिसांनी काही महिन्यांपूर्वी शाहूनगर परिसरात छापा टाकत सुमारे साडेपाच लाख रुपयांचे एमडी ड्रग्स जप्त केले होते. या प्रकरणात सर्फराज भिस्ती या ड्रग्स माफियाला अटक करण्यात आली होती. त्याच्या चौकशीतून या संपूर्ण प्रकरणाचे धागेदोरे अबरारपर्यंत पोहोचले. मात्र, अटकेची कुणकुण लागताच अबरार जळगावातून पसार झाला होता. तो दुबईला पळून गेल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केल्यानंतर हा तपास थंड बस्त्यात गेला होता.
दरम्यान, मालेगाव पोलिसांनी चंदनपुरी रस्त्यावरील मन्सूरा कॉलेज परिसरात ड्रग्स विक्री करणाऱ्यांवर छापा टाकला. या कारवाईत शेख अबरार शेख मुक्तार उर्फ अबरार जिलानी (वय २७, रा. मास्टर कॉलनी, आक्सानगर) याला रंगेहाथ अटक करण्यात आली. त्याच्याकडून सुमारे सहा लाख रुपये किमतीचे ६० ग्रॅम एमडी ड्रग्स जप्त करण्यात आले होते. पोलीस कोठडी संपल्यानंतर त्याला नाशिक येथील कारागृहात रवानगी करण्यात आली होती.
थंडावलेल्या तपासाला पुन्हा गती
जळगावातील ड्रग्स प्रकरणाच्या तपासात अबरारच्या संपर्कात पोलीस दलातील काही अधिकारी व कर्मचारी असल्याचेही उघड झाल्याने त्या काळात पोलीस यंत्रणेत खळबळ उडाली होती. मात्र अबरार सापडत नसल्याने तपास रखडला होता. आता त्याच्या अटकेमुळे या प्रकरणाच्या तपासाला पुन्हा गती मिळणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.
आंतरराज्यीय ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश होणार?
जळगावनंतर सुरत व भुसावळ येथे झालेल्या ड्रग्स कारवायांचे कनेक्शनही अबरारशी असल्याचे समोर आले आहे. त्याच्या शोधासाठी गुजरात पोलिसांनीही मास्टर कॉलनीत धडक दिली होती. आता जळगाव पोलिसांच्या ताब्यात आलेल्या अबरारकडून महाराष्ट्र व गुजरातमधील ड्रग्स माफियांचे आंतरराज्यीय नेटवर्क उघड होण्याची शक्यता असून, येत्या काळात या चौकशीतून अनेक धक्कादायक बाबी समोर येण्याची चिन्हे आहेत.

