लोकशाही संपादकीय लेख
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार एकनाथराव खडसे यांच्या फार्म हाऊसवर 28 सप्टेंबर रोजी ड्रोन कॅमेऱ्याच्या घिरट्या घातल्या जात होत्या आणि त्या ड्रोन कॅमेऱ्याद्वारे बहुतेक रेकी केली जात होती, असा अंदाज एकनाथ खडसे यांनी केला आणि तशी रीतसर तक्रार पोलिसांना दिली. पण पोलिसांनी त्याची विशेष दखल घेतली नाही. पाहून घेऊ, असे म्हणून त्याला उत्तर देऊन ते मोकळे झाले. परंतु त्यानंतरही त्या ड्रोन कॅमेऱ्याच्या घिरट्या घोडसगाव परिसरात तसेच हतनूर धरण परिसरात घातल्या जात होत्या. कदाचित हतनूर धरणाचीही रेकी करत असावेत. हतनूर धरणाचे डेप्युटी इंजिनियर चौधरी यांना ही माहिती दिली. तेव्हा त्यांनी सावदा पोलीस स्टेशनला त्याची माहिती दिली. दरम्यानच्या काळात सात-आठ दिवस झाले, तरी त्यांच्या घिरट्या चालूच आहेत. भुसावळ ऑर्डनन्स फॅक्टरी तसेच वरणगाव ऑर्डनन्स फॅक्टरी आणि दीपनगरचे थर्मल पॉवर स्टेशन जवळ आहे. अशा महत्त्वाच्या ठिकाणांची रेकी जर केली, तर पुढे काही बरे-वाईट परिणाम झाले, तर त्याला कोण जबाबदार राहील? याबाबत जळगाव पोलिसांत तक्रार देऊनही काना डोळा केला आहे. पण आपले जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी तर तो चेष्टेचा विषय बनवला आहे. नाथाभाऊंच्या फार्म हाऊसवर ड्रोन कॅमेऱ्याच्या घिरट्या म्हणजे गंभीर विषय आहे, असे उचितपणे जलसंपदा मंत्र्यांनी म्हटले आहे. त्यांच्याशी दाउदचा संबंधही जोडला गेला. म्हणजे एका जबाबदार मंत्र्यांनी जे काही आहे, ते ऐकून घेऊन त्याविषयी गंभीरपणे भाष्य करणे ऐवजी त्याला चेष्टेचा विषय बनवला, ही शोकांतिका आहे.
मंत्रीच जर चेष्टेचा विषय बनविला गेला, तर पोलीस खाते काय गंभीरतेने त्याची दखल घेतील, असा विषय आहे. त्याबाबत स्थानिक मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी तर कहरच केला. ते म्हणाले की, हा केवळ पब्लिसिटी स्टंट आहे. एक आमदार एवढ्या खालच्या थराला जाऊन त्यांचं विश्लेषण करतो, ही फार गंभीर बाब आहे. त्यावर एकनाथ खडसे म्हणाले की, मी 45 वर्षे झाले आमदार, मंत्री राहिलेलो आहे. मला पब्लिसिटी स्टंट करण्याची काय गरज आहे? एखादी माहिती मिळाल्यानंतर त्याचा अभ्यास करून योग्य तो निर्णय घेण्याऐवजी पब्लिसिटी स्टंट आहे, असा शेरा मारणे, याला काय म्हणावे? हे आमदार अपघाताने झाले आहेत. आमदार आहेत, त्यांना अभ्यास करण्याची काही गरज वाटत नाही. केवळ राजकीय विरोधाला विरोध करायचा, हे आमदाराचे धोरण आहे. त्या आमदाराला मी कवडीची किंमत देत नाही. तसे त्यांच्या सल्ल्याची मला गरज नाही. एकंदरीत आमदार एकनाथ खडसे यांच्या फार्म हाऊसवरील ड्रोन कॅमेऱ्याच्या घिरट्या हा रेकीचा विषय, त्यांना काय कळणार? हतनूर धरण, वरणगाव व भुसावळ ऑर्डनन्स फॅक्टरी आणि दीपनगरचे थर्मल पॉवर स्टेशन यांची ड्रोनद्वारे रेकी केली गेली आणि त्याचे परिणाम भोगावे लागले, तर कळेल. त्यामुळे एकनाथ खडसे यांची कुठलीही गोष्ट, त्यांची टिंगल-टवाळी करायची. जे काही तुम्हाला टिंगल-टवाळी करायची असेल, तर त्याला राजकारणाच्या भरपूर जागा आहेत. अशा महत्त्वाच्या वेळेला थोडी सहानुभूती दाखवली, तर बरे झाले असते. किमान घोडसगाव, हतनूर धरण, ऑर्डनन्स फॅक्टरी परिसर, दीपनगर थर्मल पॉवर स्टेशन परिसर येथील जनतेची विचारपूस करून योग्य तो निर्णय घ्यावा. हे सर्व राजकीय नेते करू शकले नाही, तर पोलीस खात्याच्या वतीने त्याची गंभीर दखल घ्यावी. पण पोलीस खात्याच्या वतीने देखील काहीही विचारपूस न करता दुर्लक्ष केले गेले. पोलीस खाते काही करत नाही, याचेच वाईट वाटते.

