उडीद,तूर कापसाच्या दरात वाढ !

0

मुंबई , लोकशाही न्यूज नेटवर्क

देशाच्या आणि राज्याच्या बाजार समितीमध्ये उडीद , तूर , कापूस आणि सोयाबीनच्या भावात आज वाढ झाल्याचे दिसून आले.

सोयाबीन दर स्थिरावले

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन, सोयातेल आणि सोयापेंडच्या दरात सध्या चढ उतार सुरु आहेत. तर सरासरी दरपातळी कायम होती. सोयाबीनचे वायदे १४.२४ डाॅलर प्रतिबुशेल्स तर सोयातेल ५३.६४ सेंट प्रतिपाऊंड आणि सोयापेंडचे वायदे ४४३ डाॅलर प्रतिटनावर आहेत.

तर देशातील बाजारात सोयाबीनचे दर ५ हजार ते ५ हजार ३०० रुपयांवर टिकून आहेत. देशातील बाजारात सोयाबीन जास्त दिवस दबावात राहणार नाही. दरात सुधारणा दिसू शकते, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

कापसाला ७ हजार ७०० ते ८ हजार १०० रुपये भाव

देशातील बाजारात कापसाचे भाव नरमलेल्या पातळीवर कायम आहेत. देशात मार्च महिन्यात कापसाची आवक वाढल्यानंतर दर दबावात आले. तर आंतरराष्ट्रीय बाजारात बॅंकिंग क्षेत्रातील संकटामुळं कापूस दर कमी झाले.
सध्या कापसाचे वायदे ७७ सेंट प्रतिपाऊंडच्या दरम्यान आहेत. तर देशात कापसाला ७ हजार ७०० ते ८ हजार १०० रुपये भाव मिळतोय.
देशातील घटते उत्पादन आणि वाढलेला वापर यामुळं आकेचा दबाव कमी झाल्यानंतर दर सुधारु शकतात, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

उडदाच्या भावात तेजी

तुरीनंतर देशात आता उडदाचे भाव तेजीत आले आहेत. देशात यंदा उडदाच्या उत्पादनात मोठी घट झाली. तर आयातही मर्यादीत राहीली. पण दुसरीकडे उडदाला उठाव चांगला आहे. त्यामुळे उडदाच्या दरात तेजी आली.
सध्या उडदाला सरासरी ७ हजार ५०० ते ८ हजार रुपये भाव मिळतोय. तसेच उडीद दरातील तेजी पुढील काळातही कायम राहील, असा अंदाज उडीद बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

गवारच्या दरात मोठी वाढ

देशातील बाजारात मागील काही दिवसांपासून गवारचे दर तेजीत आहेत. बाजारातील गवारची आवक कमी असून उठाव मात्र चांगला मिळतो. सध्या राज्यातील मोठ्या बाजारांमध्ये गवारची सरासरी आवक १०० क्विंटलपेक्षा कमीच आहे.
त्यामुळं गवारला सध्या प्रतिक्विंटल सरासरी ६ हजार ते ७ हजार रुपये भाव मिळतोय. पुढील काही दिवस गवारची आवक मर्यादीत राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळं दरही तेजीत राहतील, असा अंदाज भाजीपाला बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

तुरीने ९ हजार रुपयांचा टप्पा गाठला.

देशातील बाजारात तुरीचे दर चांगलेच तेजीत आहेत. बाजार समित्यांमध्ये सध्याचा काळ तसा आवकेचा आहे. पण सध्याची आवक खूपच आहे. त्यातच लग्न सराईमुळे तुरीला चांगला उठाव मिळतोय. देशातील स्थिती लक्षात घेऊन व्यापारीही तुरीची खरेदी करत आहेत.
स्टाॅकीस्टही काही प्रमाणात सक्रिय दिसत आहेत. त्यामुळं तुरीच्या दरात मोठी तेजी आली. सध्या देशातील काही बाजारांमध्ये तुरीने ९ हजार रुपयांचा टप्पा गाठला. मध्य प्रदेश, महाराष्ट्र, आणि कर्नाटकातील काही बाजारांमध्ये तुरीचे दर या पातळीवर पोचले. हा कमाल भाव होता.
===========

Leave A Reply

Your email address will not be published.